Congress : काँग्रेस पक्ष हा देशातला सर्वात जुना पक्ष आहे. या पक्षातील अनेक कार्यकर्ते गांधी घराण्याशी निष्ठावान आहेत. इतिहास बघितला तर याची अनेक उदारणं आपल्याला बघायला मिळतील. यापैकीच एक निष्ठावान कार्यकर्ता म्हणजे भोलानाथ पांडे. त्यांचं नुकतंच २३ ऑगस्ट रोजी निधन झालं. भोलानाथ पांडे यांनी इंदिरा गांधींसाठी थेट एअर इंडियाचं विमान हायजॅक केलं होतं. दरम्यान, हा किस्सा नेमका काय होता? आणि भोलानाथ पांडे यांची राजकीय कारकीर्द नेमकी कशी राहिली आहे? जाणून घेऊया.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

कोण होते भोलानाथ पांडे?

भोलानाथ पांडे यांना गांधी कुटुंबीयांचे विश्वासू म्हणून ओळखलं जात होतं. ते दोन वेळा काँग्रेसचे आमदारसुद्धा होते. याशिवाय भोलानाथ पांडे यांनी काँग्रेस पक्षात राष्ट्रीय महासचिव पदासह अनेक जबाबदाऱ्या सांभाळल्या. अवघ्या २७ वर्षांचे असताना ते १९८० मध्ये उत्तर प्रदेशच्या बलिया जिल्ह्यातून काँग्रेसच्या तिकिटावर आमदार म्हणून निवडून आले. पुढे १९८९ मध्ये ते पुन्हा एकदा याच मतदारसंघातून आमदार झाले. त्यानंतर त्यांनी अनेकदा निवडणूक लढवली, पण त्यांना यश मिळालं नाही. मात्र, ते गांधी घराण्याचे निष्ठावान म्हणून ओळखले जाऊ लागले.

हेही वाचा – National Conference : काश्मीरमध्ये काँग्रेस अन् ‘एनसी’ची युती, मात्र दोन्ही पक्षांतील संबंधांमध्ये इतिहासात अनेक चढ-उतार; जाणून घ्या…

इंदिरा गांधींच्या सुटकेसाठी केलं होतं विमान हायजॅक

भोलानाथ पांडे यांनी इंदिरा गांधी यांच्यासाठी चक्क एअर इंडिया विमान हायजॅक केलं होतं. ते वर्ष होतं १९७८ चं. आणीबाणी रद्द झाल्यानंतर दोन वर्षांनी तत्कालीन पंतप्रधान मोरारजी देसाई यांची लोकप्रियता कमी होऊ लागली होती. काँग्रेसच्या कार्यकर्त्यांकडून देशभरात निदर्शने करण्यात येत होती. अशात १९ डिसेंबर १९७८ रोजी सभागृहाचा अवमान केल्याप्रकरणी इंदिरा गांधी यांचं संसद सदस्यत्व रद्द करण्यात आलं. तसेच त्यांना अधिवेशन संपेपर्यंत तिहार तुरुंगात टाकण्यात आलं. त्यामुळे काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये मोठा असंतोष होता.

तुरुगांत जाण्यापूर्वी इंदिरा गांधी यांनी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांसाठी एक भावनिक संदेश दिला होता. ही वेळ दुःखाची किंवा राग मानून घेण्याची नाही, तर शांतता राखण्याची आहे; हीच काँग्रेस पक्षाची परंपरा राहिली आहे, असं त्यांनी त्यांच्या संदेशात म्हटलं होतं. मात्र, एक दिवसानंतर २५ वर्षीय भोलानाथ पांडे यांनी इंदिरा गांधी यांच्या सुटकेसाठी विमान हायजॅक केलं. पांडे हे लखनौ विमानतळावरून एअर इंडियाच्या बोईंग ७३७ या विमानात बसले. त्यांच्याबरोबर देवेंद्र पांडे नावाने अन्य काँग्रेस कार्यकर्ताही होता. हे विमान कोलकात्यावरून दिल्लीला जाणार होतं.

इंडियन एक्स्प्रेसच्या रिपोर्टनुसार, त्यावेळी या विमानात १२६ प्रवासी आणि सहा क्रू मेंबर्स होते. यावेळी भोलानाथ पांडे आणि त्यांच्या अन्य सहकाऱ्याने नकली पिस्तूल आणि हातगोळ्याचा धाक दाखवत हे विमान हायजॅक केलं. सुरुवातीला त्यांनी हे विमान नेपाळ किंवा बांगलादेशला नेण्याची मागणी केली. मात्र, तेवढं इंधन नसल्याने त्यांनी वाराणसी येथे विमान उतरवण्याचं मान्य केलं.

हेही वाचा – Jammu Kashmir Election : जम्मू काश्मीरच्या निवडणुकीत नवा खेळाडू! प्रतिबंधित जमात-ए-इस्लामी संघटना अपक्ष उमेदवार उभे करणार

वाराणसीत विमान उतरताच एस. के. सोढी नावाचे एक प्रवासी इमर्जन्सी एक्झिटमधून उडी मारून बाहेर पडले आणि अधिकाऱ्यांजवळ पोहोचले. त्यांनी अधिकाऱ्यांना भोलानाथ पांडे यांच्या मागणीबाबत सांगितले. भोलानाथ पांडे यांनी इंदिरा गांधी यांची तुरुंगातून सुटका करण्याची मागणी केली होती. जवळपास १३ तास चाललेल्या या अपहरणाच्या नाटकानंतर अखेर दुसऱ्या दिवशी सकाळी ६ च्या सुमारास त्यांनी आत्मसमर्पण केलं.

आत्मसमर्पण केल्यानंतर भोलानाथ पांडे आणि त्यांच्या अन्य सहकाऱ्याला सरकारी विमानातून लखनौ येथे नेण्यात आलं. विमानातून उतरताच त्यांनी इंदिरा गांधी जिंदाबाद, अशा घोषणाही दिल्या. इंडियन एक्स्प्रेसच्या रिपोर्टनुसार, चौकशीदरम्यान, विमान हायजॅक करण्यासाठी उत्तर प्रदेश काँग्रेसच्या दोन नेत्यांनी अनुक्रमे ४०० आणि २०० रुपये दिल्याचं त्यांनी सांगितले. त्यापैकी ३५० रुपयांचं त्यांनी विमानाचं तिकीट काढलं होतं. २६ डिसेंबर १९७८ रोजी इंदिरा गांधी या तुरुंगातून बाहेर आल्या. त्यानंतर त्यांनी तुरुंगात जाऊन भोलानाथ पांडे यांची भेटही घेतली.

काही महिन्यांनी इंदिरा गांधी या पुन्हा सत्तेत आल्या. त्यानंतर भोलानाथ पांडे यांची तुरुंगातून सुटका करण्यात आली. पुढे १९८० मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीत भोलानाथ पांडे यांना बलियामधून काँग्रेस पक्षाकडून उमेदवारी देण्यात आली. ते दोन वेळा बलिया मतदारसंघाचे आमदार होते.

मराठीतील सर्व सत्ताकारण बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Who was congress leader bholanath pandey hijack air india flight for indira gandhi spb