बाबरी मशिदीत २२-२३ डिसेंबर १९४९ मध्ये राम लल्लाची मूर्ती ठेवण्यात आली होती. त्यानंतर भारताचे तत्कालीन पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांनी ही मूर्ती हटवण्याचा आदेश दिला होता. मात्र या आदेशाला नंतर अनेकांनी विरोध केला होता. या विरोधानंतर नेहरुंनी राम लल्लाची मूर्ती हटवण्याचा आदेश मागे घेतला होता. नेहरुंच्या या निर्णयाला विरोध करणाऱ्यांमध्ये काँग्रेसचे नेते तथा फैजाबाद मतदारसंघाचे तत्कालीन आमदार बाब राघव दास यांचादेखील समावेश होता.
नेहरुंच्या निर्णयाला केला होता विरोध
राम लल्लाच्या मूर्तीबाबत कोणताही निर्णय घेणे योग्य होणार नाही अशी भूमिका घेणाऱ्यांनमध्ये तत्कालीन जिल्हा अध्यक्ष के के नायर तसचे शहर दंडाधिकारी गुरु दत्त सिंह यांचा समावेश होता. बाबा राघव दास यांनीदेखील विरोध करत राम लल्लाच्या मूर्तीबाबत काही निर्णय घेतल्यास मी माझ्या आमदारकीचा राजीनामा देईन, अशी भूमिका घेतली होती.
हेही वाचा >>>रामरायाच्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्याच्या दिवशी ‘इंडिया’ आघाडीतील नेतेमंडळी काय करणार आहेत? जाणून घ्या..
आमदारकीचा राजीनामा देण्याचा इशारा
पत्रकार निलांजन मुखोपाध्याय यांनी ‘द डेमोलिशन अँड द व्हर्डिक्ट’ नावाचे पुस्तक लिहिलेले आहे. या पुस्तकात मुखोपाध्याय यांनी राघव दास यांच्याबाबत सविस्तर लिहिले आहे. “१९५० साली केंद्र सरकार राज्य सरकारला राम लल्लाच्या मूर्तीबाबत कारवाई करण्याचा आदेश देत होते. त्यावेळी मात्र राघव दास यांनी आमदारकीचा तसेच काँग्रेसच्या सदस्यत्वाचाही राजीनामा देण्याचा इशारा दिला होता,” असा उल्लेख या पुस्तकात आहे.
फैजाबाद येथून लढवली पोटनिवडणूक
राघव दास यांनी १९४८ साली फैजाबाद येथून पोटनिवडणूक लढवली होती. या निवडणुकीत त्यांनी समाजवादी विचाराचे आचार्य नरेंद्र देव यांना १३०० मतांच्या फरकाने पराभूत केले होते. नरेंद्र देव यांच्यासह इतर १३ आमदारांनी काँग्रेसच्या सदस्यत्वाचा राजीनामा देत वेगळ्या सोशालिस्ट पार्टीचा स्थापना केली होती. त्यामुळे फैजाबाद येथे पोटनिवडणूक घ्यावी लागली होती.
हेही वाचा >>>समाजवादी पक्षाच्या बालेकिल्ल्यातही योगी-मोदींची चर्चा; राम मंदिराबद्दल नागरिकांचं मत काय? जाणून घ्या…
नरेंद्र देव यांना पराभूत करण्यासाठी राघव दास यांना तिकीट
उत्तर प्रदेशचे तत्कालीन मुख्यमंत्री तथा काँग्रेसचे नेते गोविंद वल्लभ पंत यांनीच राघव दास यांची फैजाबादची पोटनिवडणूक लढवण्यासाठी निवड केली होती. राघव दास हे धार्मिक आणि आध्यात्मिक होते. याबाबत मुखोपाध्याय यांनी आपल्या पुस्तकात लिहिलेले आहे. पंत यांनी स्वत: राघव दास यांच्या विजयासाठी प्रचार केला होता. आपल्या प्रचारादरम्यान नरेंद्र देव हे प्रभू रामावर विश्वास ठेवत नाहीत, असे म्हणत पंत यांनी राघव दास यांना मत देण्याचे जनतेला आवाहन केले होते.
अखंड पाठात झाले सहभागी
आमदार म्हणून निवडून आल्यानंतर राघव दास हे लवकरच राम जन्मभूमी आंदोलनाशी जोडले गेले. अयोध्येत तेव्हा १० दिवसांसाठी रामचरीतमानसच्या अखंड पाठाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी शेवटच्या दिवशी म्हणजेच २० ऑक्टोबर १९४९ रोजी राघव दास यांनी या कार्यक्रमाला हजेरी लावली होती. या कार्यक्रमात त्यांच्यासोबत मंचावर हिंदू महासभेचे महंत दिग्विजयनाथ होते. दिग्विजयनाथ हे महंत अवैद्यनाथ यांचे गुरु होते. अवैद्यनाथ हे योगी आदित्यनाथ यांचे गुरू आहेत. योगी आदित्यनाथ सध्या उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री आहेत.
हेही वाचा >>>काँग्रेसचे ज्येष्ठ नेते सुशील कुमार शिंदे यांचा खळबळजनक दावा; म्हणाले, “भाजपाने मला दोनदा संपर्क साधला अन्… “
राघव दास पूर्वांचलचे गांधी
राघव दास हे फक्त पंडित नेहरुंना केलेल्या विरोधामुळेच ओळखले जात नाहीत. ते एक समाजसुधारक होते. भाजपाचे राज्यसभेचे खासदार बलीबर पुंज यांनी ‘Tryst With Ayodhya’ नावाचे पुस्तक लिहिलेले आहे. लोक राघव दास यांना पूर्वांचलचे गांधी म्हणायचे, असे या पुस्तकात सांगितलेले आहे. महात्मा गांधी यांनीच १९२१ मध्ये राघव दास यांना स्वातंत्र्यलढ्यात सहभागी व्हायला सांगितले होते. पुढे स्वातंत्र्यलढ्यात ते अनेकदा तुरुंगात गेले होते. त्यांनी १९३१ सालच्या दांडी यात्रेतही सहभाग नोंदवला होता. महात्मा गांधी यांनीच राघव दास यांना सर्वप्रथम बाबा म्हटले होते. तेव्हापासून राघव दास यांच्या नावापुढे आदराने बाबा असे लावले जात होते.
परमहंस आश्रमाची स्थापना
राघव दास हे देवरिया येथील बरहज येथील संत योगीराज अनंत महाप्रभू यांचे शिष्य होते. त्यांनी बरहज येथे परमहंस आश्रमाची स्थापना केली होती. या आश्रमात त्यांनी स्वातंत्र्यसैनिक रामप्रसाद बिस्मील यांचा पुतळा उभारला होता.
वयाच्या १७ व्या वर्षी घर सोडले
राघव दास हे समाजसुधारक होते. त्यांनी शिक्षण क्षेत्रात बरेच काम केलेले आहे. त्यांनी विनोबा भावे यांच्या भूदान चळवळीतही सहभाग नोंदवला होता. ते मुळचे महाराष्ट्रातील पुण्याचे होते. त्यांनी वयाच्या १७ व्या वर्षी घर सोडले. त्यानंतर ते राघवेंद्रचे राघव दास झाले. ते सत्याच्या शोधात घराबाहेर पडले होते. त्यांनी पुढे मौनी बाबा यांच्याकडून हिंदी शिकून घेतली. पुढे ते हिंदी भाषेचे पुरस्कर्ते झाले. त्यांनी बरहज येथे राष्ट्र भाषा विद्यालयाची स्थापना केली होती. त्यांनी कुष्ठरोग्यांसाठी कुष्ठरोग गृहाची सुरुवात केली होती. सध्या अनेक शैक्षणिक संस्थांना त्यांचे नाव आहे.
बाबा राघव दास यांच्या नावाने टपाल तिकीट
राघव दास यांचे १९५८ साली निधन झाले. वाजपेयी यांच्या सरकारने पुढे त्यांच्या नावाने १२ डिसेंबर १९९८ रोजी खास टपाल तिकीट जारी केले.