२२ एप्रिल २००६ चा तो दिवस. भाजपाचे जेष्ठ नेते प्रमोद महाजन यांच्यावर त्यांचाच भाऊ प्रवीण महाजन यांनी गोळ्या झाडल्या आणि राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली. त्यानंतर १३ दिवस प्रमोद महाजन यांच्यावर हिंदूजा रुग्णालयात उपचार सुरू होते. मात्र, ३ मे २००६ रोजी उपाचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. प्रमोद महाजन यांच्या मृत्यूला आता १८ वर्ष पूर्ण झाली आहेत. पण, प्रवीण महाजन यांनी त्यांच्यावर गोळ्या का झाडल्या? याचं कारण फारसं पुढे आलेलं नाही. अशातच आता प्रमोद महाजन यांची मुलगी पूनम महाजन यांनी एका मुलाखतीत बोलताना प्रमोद महाजन यांच्या मृत्यूमागे षड्यंत्र असल्याचा संशय व्यक्त केला आहे. त्यामुळे आता राजकीय वर्तुळात पुन्हा एकदा प्रमोद महाजन यांच्या नावाची चर्चा सुरू आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

एक पत्रकार, उत्तम वक्ते आणि आपल्या संघटन कौशल्यासाठी ओळखले जाणारे प्रमोद महाजन महाराष्ट्रातीलच नव्हे तर देशाच्या राजकारणातील एक मोठं नाव. अटलबिहारी वाजपेयींचं पंतप्रधान होणं असो किंवा लालकृष्ण अडवाणींची रथयात्रा असो, महाराष्ट्रात शिवसेनेबरोबर झालेली युती असो किंवा शायनिंग इंडियाचा मंत्र असो, प्रमोद महाजन यांच्या उल्लेखाशिवाय हे सगळंच अपूर्ण आहे.

अटल बिहारी वाजपेयी आणि लालकृष्ण अडवाणी यांच्या अगदी जवळचे मानले जाणारे प्रमोद महाजन हे कधीकाळी भाजपाच्या दुसऱ्या फळीतील प्रमुख नेत्यांपैकी एक होते. खरं तर ज्यावेळी अटलबिहारी वाजपेयी यांनी राजकारणातून निवृत्ती घेतली, तेव्हा प्रमोद महाजन आणि लालकृष्ण आडवाणी यांनी राम-लक्ष्मणाच्या जोडीप्रमाणे हा पक्ष सांभाळावा, असं त्यांनी म्हटलं होतं. यावरून प्रमोद महाजन यांचं पक्षातील स्थान अधोरेखित होतं. कधीकाळी प्रमोद महाजन यांना पतंप्रधानपदाचे दावेदारही मानलं जात होतं.

प्रमोद महाजन यांचा जन्म तत्कालीन आंध्रप्रदेशात झाला असला, तरी त्यांचं कुटुंब लवकरच महाराष्ट्रात स्थायिक झालं, त्यामुळे प्रमोद महाजन यांचे शालेय शिक्षण महाराष्ट्रातच झालं. शालेय आणि पुढे महाविद्यालयीन काळात त्यांनी वत्कृत्व शैलीच्या जोरावर अनेक वादविवाद स्पर्धा गाजवल्या. याच काळात त्यांचा संबंध राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या स्वयंसेवकांशी आला. त्यांच्या विचारांनी प्रेरित होऊन त्यांनी आरएसएससाठी काम करण्यास सुरुवात केली.

पुढे प्रमोद महाजनांनी पुण्यातील रानडे इन्स्टिट्यूटमधून पत्रकारितेची पदवी प्राप्त केली. नोकरी न मिळाल्याने त्यांनी काही काळ विद्यार्थ्यांना इंग्रजीही शिकवलं. दरम्यानच्या काळात त्यांच्या वडिलांचे निधन झालं, त्यामुळे घरातील मोठा मुलगा या नात्याने घराची संपूर्ण जबाबदारी प्रमोद महाजन यांच्या खांद्यावर आली.

राजकारण आणि वक्तृत्वावर असलेली पकड आणि आरएसएसशी असलेले संबंध यातून त्यांनी तरुण भारत या मराठी वृत्तपत्रात उपसंपादक म्हणून काम करण्यास सुरुवात केली. तसेच उरलेल्या वेळात ते संघाचं काम करू लागले. ज्यावेळी आणीबाणी लागू झाली, त्यावेळी देशभरात इंदिरा गांधींच्या विरोधात रोष वाढत होता. आरएसएसनेही आणीबाणीच्या या निर्णयाला जोरदार विरोध केला. प्रमोद महाजन यांनी संघाच्या वतीने या आंदोलनाचे नेतृत्व केले. १९७४ मध्ये त्यांची संघाचे प्रचारक म्हणून नियुक्ती करण्यात आली. आणीबाणीच्या काळात त्यांना तुरुंगातही जावं लागलं.

आणीबाणीच्या काळातील काम बघता त्यांना आधी जनसंघ आणि पुढे भाजपामध्ये काम करण्याची संधी मिळाली. १९८३ ते १९८५ दरम्यान त्यांनी भारतीय जनता पक्षाचे महासचिव म्हणून काम केलं. १९८६ मध्ये त्यांना भारतीय जनता युवा मोर्चाचा अध्यक्ष म्हणून नियुक्त करण्यात आलं. ते जवळपास तीन वेळा भारतीय जनता युवा मोर्चाचे अध्यक्ष राहिले.

पक्षाच्या संघटनावर असलेली पकड, पक्षासाठी निधी गोळा करण्याचं कौशल्य आणि इतर राजकीय पक्षातील नेत्यांशी असलेले संबंध, या गुणांमुळे प्रमोद महाजनांना भाजपात लवकरच मोठं स्थान मिळालं. ज्या काळात हिंदुत्ववादी राजकारणामुळे कोणताही पक्ष भाजपाशी हातमिळवणी करण्यास तयार होत नसे, अशा काळात प्रमोद महाजन यांनी अनेक पक्षांबरोबर भाजपाची युती करून दाखवली. यापैकी एक युती म्हणजेच महाराष्ट्रातील भाजपा आणि शिवसेना. राष्ट्रीय पातळीवर आपण ज्या एनडीएबाबत बोलतो, ती एनडीए स्थापन करण्यात प्रमोद महाजन यांनी महत्त्वाची भूमिका बजावली.

१९९० च्या दशकात जेव्हा राम मंदिराचं आंदोलन जोर धरू लागलं, तेव्हा लालकृष्ण आडवाणींनी पदयात्रा काढण्याचा निर्णय घेतला. त्यापूर्वी १९८३ साली चंद्रशेखर यांनी देशभरात अशाप्रकारच्या पदयात्रा काढल्या होत्या, त्याला जनतेचं समर्थनही मिळालं होत. त्याच पार्श्वभूमीवर आपण अयोध्येपर्यंत पदयात्रा काढावी, अशी भूमिका लालकृष्ण आडवाणी यांनी घेतली. असं म्हणतात की, या यात्रेला अटलबिहारी वाजपेयी यांच्यासह काही नेत्यांचा विरोध होता. मात्र, प्रमोद महाजन यांनी लालकृष्ण आडवाणी यांच्या पदयात्रेचं समर्थन केलं. तसेच ही यात्रा पायी न काढता, रथातून करावी, अशी सूचना त्यांनी केली. या यात्रेला ‘रथयात्रा’ हे नावही प्रमोद महाजन यांनी दिलं. लालकृष्ण आडवाणींची ही रथयात्रा यशस्वी करण्यात प्रमोद महाजन यांनी मोठी भूमिका पार पाडली.

प्रमोद महाजन यांनी त्यांच्या राजकीय कारकिर्दीत फारश्या निवडणुका लढवल्या नाहीत. त्यांचा बराचसा कार्यकाळ हा राज्यसभेतच गेला. १९९६ मध्ये प्रमोद महाजन हे पहिल्यांदा लोकसभा निवडणूक जिंकले. त्यावेळी वाजपेयी यांच्या सरकारमध्ये ते संरक्षण मंत्री होते. मात्र, हे सरकार केवळ १३ दिवस चाललं. पुढे १९९८ मध्ये देशात पुन्हा एकदा वाजपेयी यांचे सरकार स्थापन झालं. मात्र, त्यापूर्वीच्या निवडणुकीत प्रमोद महाजन यांचा पराभव झाला होता, त्यामुळे त्यांना राज्यसभेवर पाठवण्यात आलं.

अटलबिहारी वाजपेयींच्या या सरकारमध्ये ते सूचना व प्रसारण मंत्री होते. या खात्याचे मंत्री असताना त्यांनी अनेक महत्त्वाचे निर्णय घेतले. मात्र, त्यांचे काही निर्णय वादग्रस्तही ठरले. मंत्री असताना त्यांच्यावर आर्थिक घोटाळ्याचा, तसेच एका विशिष्ट कंपनीला फायदा पोहोचवण्याचा प्रयत्न केल्याचाही आरोप झाला.

प्रमोद महाजन हे त्यांच्या राजकीय कारकिर्दीच्या शिखरावर असताना एक दिवस अचानक त्यांच्यावर त्यांच्याच भावाने गोळ्या झाडल्या आणि त्यांची हत्या केली. मीडिया रिपोर्टनुसार त्यांची हत्या कौटुंबिक आणि संपत्तीच्या वादातून झाल्याचं सांगितलं जातं. मात्र, अनेकांनी त्यांच्या मृत्यूमागे षड्यंत्र असल्याचाही दावा केला आहे. अशात आता खुद्द पूनम महाजन यांनी असा संशय व्यक्त केल्याने राजकीय वर्तुळात विविध चर्चांना उधाण आलं आहे.

मराठीतील सर्व सत्ताकारण बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Who was pramod mahajan bjp leader political career mudered reason know in details spb