भारतीय जनता पार्टीचे पुढचे राष्ट्रीय अध्यक्ष कोण असतील याबाबतची उत्सुकता सर्व राजकीय मंडळींना आहे. अशात ही निवड लांबणीवर पडत असली तरी या पदासाठी कोणते नेते दावेदार असू शकतात याबाबत काही शक्यता वर्तवल्या जात आहेत.
बिहार, पश्चिम बंगाल, आसाम, तमिळनाडू व केरळ या राज्यांतून कोणाची निवड राष्ट्रीय अध्यक्षपदी होणार हे मार्च किंवा एप्रिलमध्ये स्पष्ट होईल. सध्याचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा यांचा कार्यकाळ आता संपुष्टात येणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांच्या कारकि‍र्दीत अध्यक्षपदाबाबत भाकीत करणं तसं कठीणच आहे. मग ते मुख्यमंत्री पदाबाबत असो वा राष्ट्रीय अध्यक्ष पदाबाबत. या पदासाठीचे मोठे दावेदार आणि त्यासाठी कोणते घटक लक्षात घेतले जातील ते जाणून घेऊ…

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

जी. किशन रेड्डी, धर्मेंद्र प्रधान, भूपेंद्र यादव, मनोहर लाल खट्टर, शिवराज सिंह चौहान, डी. पुरंदरेश्वरी व वनथी श्रीनिवासन अशी अनेक नावं शर्यतीत आहेत.

पहिला घटक म्हणजे प्रदेश. हा कदाचित सर्वांत महत्त्वाचा घटक असू शकतो. कारण- येत्या काळात केरळ आणि तमिळनाडू या दक्षिणेकडील दोन महत्त्वाच्या लढायांमध्ये पक्ष उतरणार आहे.

दुसरा घटक म्हणजे महिला की पुरुष. पक्षाला आतापर्यंत महिला राष्ट्रीय अध्यक्ष मिळालेली नाही. मोदी सरकारनं महिला आरक्षण विधेयक आणलं. तसंच दिल्लीत काही दिवसांपूर्वीच महिला मुख्यमंत्री आल्या आहेत. तर पक्ष यावेळी याबाबत काही वेगळी भूमिका घेईल का?

तिसरा घटक म्हणजे निष्ठा आणि संघटनात्मक अनुभव. पक्षाच्या बारकाव्यांबद्दल माहिती असलेला, महत्त्वाच्या निवडणुकांमध्ये स्वत:ची जागा सिद्ध केलेला आणि पंतप्रधान मोदी व गृहमंत्री अमित शहा यांच्या विश्वासतला असा उमेदवार अपेक्षित असू शकतो.

चौथा घटक राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या मर्जीतला. भाजपाची वैचारिक संघटना आता पुन्हा एकदा मैदानात परतली आहे. महाराष्ट्र, हरयाणा व दिल्लीमध्ये पक्षाला विजय मिळवून देण्यात मदत केल्यानंतर आणि मुख्यमंत्र्यांच्या निवडीबाबत आपलं मत मांडल्यानंतर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा होकार हा भाजपा अध्यक्षपदाच्या अंतिम निर्णयासाठी महत्त्वाचा ठरेल.

राष्ट्रीय अध्यक्षपदाच्या दावेदारांच्या नावांबाबत जाणून घेऊ…

पहिलं नाव आहे जी. किशन रेड्डी यांचं. दक्षिण भारतातून निवड करण्यात आली, तर रेड्डी हे आघाडीवर आहेत. दोन दशकांपूर्वी आंध्र प्रदेशातील व्यंकय्या नायडू यांच्याकडे राष्ट्रीय अध्यक्षपद सोपवण्यात आलं होतं. त्यानंतर साधारण वर्षभरापूर्वी बंगारू लक्ष्मण व जना कृष्णमूर्ती हे या पदावर होते.
तेलंगणाचे रेड्डी हे केंद्रीय मंत्री आहेत. गेली ४५ वर्षे ते भाजपात कार्यरत आहेत. भारतीय कनाता युवा मोर्चाचे अध्यक्ष ते आमदार, पक्षाचे प्रदेशाध्यक्ष व मग खासदार, असा रेड्डी यांचा प्रवास आहे. ते तेलंगणा भाजपाचे प्रदेशाध्यक्ष आहेत.

आधी अध्यक्षपदी असलेले बंदी संजय कुमार हेदेखील राष्ट्रीय अध्यक्षपदाचे दावेदार मानले जातात. दक्षिणेत भाजपा विस्तार करू पाहत असल्यानं तिथला चेहरा राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून निवडणं कदाचित योग्यही ठरेल. त्याशिवाय रेड्डी यांना फायदा मिळू शकत असल्याचंही दिसून येतं. कारण- रेड्डी यांचं पंतप्रधान मोदींशी जुनं नातं आहे. त्याशिवाय ते दोघेही तीन दशकांपूर्वी १९९३ मध्ये एकत्र अमेरिकेच्या दौऱ्यावर होते.

दुसऱ्या व तिसऱ्या क्रमांकाचे दावेदार हे धर्मेंद्र प्रधान व भूपेंद्र यादव आहेत. विद्यमान केंद्रीय मंत्री असलेले हे दोघेही पंतप्रधान मोदी आणि अमित शहा यांचे निकटवर्तीय आहेत.

भाजपाला पूर्वेकडून आतापर्यंत अध्यक्ष मिळालेला नाही. केंद्रीय मंत्री धर्मेंद्र प्रधान यांचं पारडंही जड आहे. कारण- ते ओडिशाचे आहेत. ओडिशात २०२४ मध्ये भाजपानं पहिल्यांदाच विजय मिळवला. त्या विजयात धर्मेंद्र यांनी मोठी भूमिका बजावली होती; मात्र ते मुख्यमंत्री झाले नाहीत. गेल्या वर्षी ते हरयाणा आणि २०२२ मध्ये उत्तर प्रदेशचे प्रभारी होते. कधीही कोणतंही श्रेय न मागणारे धर्मेंद्र प्रधान नक्कीच राष्ट्रीय अध्यक्षपदासाठी योग्य असू शकतात.

भाजपाला ऐतिहासिक विजय मिळवून देणाऱ्या भूपेंद्र यादव यांची कार्यपद्धतीही काहीशी अशीच आहे. २०१७ मध्ये यादव यांनी उत्तर प्रदेशचे प्रभारी म्हणून नेतृत्व केलं. देशातल्या सर्वाधिक लोकसंख्या असलेल्या राज्यातून निवडून आल्यानं हा त्यांचा ऐतिहासिक विजय मानला जातो. यादव हे मूळचे राजस्थानचे आहेत आणि त्यांनी अजमेर येथून लोकसभेत प्रवेश केला आहे. धर्मेंद्र यांच्याप्रमाणे संघटनेसाठी योग्य आणि सर्वांना सोबत घेऊन जाण्याची क्षमता त्यांच्यात आहे. अनुभवाच्या मुद्द्यावर ६४ वर्षीय रेड्डी यांना झुकतं माप मिळू शकतं.

यावेळी महिला उमेदवारही शर्यतीत असतील?

पक्षाला राष्ट्रीय अध्यक्षपदी महिलेचं नेतृत्व हवं असल्यास भाजपाच्या महिला मोर्चाच्या प्रमुख वनथी श्रीनिवासन यांचा विचार केला जाऊ शकतो. श्रीनिवास या तमिळनाडूतील कोईम्बतूर दक्षिणच्या आमदार आहेत. २०२१ च्या विधानसभा निवडणुकीत त्यांनी कमल हसन यांचा पराभव केला होता. पुढच्या वर्षी होणाऱ्या दक्षिणेकडील राज्यांच्या महत्त्वाच्या निवडणुकांमध्ये श्रीनिवासन यांचा सहभाग महत्त्वपूर्ण असणार आहे.

अध्यक्षपदाच्या शर्यतीत आणखी एक महत्त्वाचं नाव म्हणजे डी. पुरंदरेश्वरी. त्या लोकसभा खासदार व आंध्र प्रदेशातील भाजपा प्रदेशाध्यक्ष आहेत. त्यांना दक्षिणच्या ‘सुषमा स्वराज’ असंही म्हटलं जातं. त्या आंध्र प्रदेशचे माजी मुख्यमंत्री एन. टी. रामाराव यांच्या कन्या आणि आंध्राचे मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू यांच्या मेव्हण्या आहेत. राज्यात एनडीएच्या त्या प्रमुख सहयोगी आहेत. भाजपाच्या या दोन्ही महिला नेत्या दक्षिणेकडील आहेत.

केंद्रीय मंत्री मनोहरलाल खट्टर आणि शिवराज सिंह चौहान हेदेखील संघाचा पाठिंबा असलेले प्रमुख संभाव्य उमेदवार आहेत. खट्टर हे पंतप्रधानांचे निकटवर्तीय आहेत. खट्टर आणि पंतप्रधान मोदी हे संघप्रचारक असताना त्यांनी मोटरसायकलवरून हरयाणामध्ये प्रवास केला होता ही आठवण मोदींनी एकदा सांगितली होती. खट्टर यांचं साधं राहणीमान आणि प्रामाणिकपणा यांमुळे हरयाणाचे मुख्यमंत्री म्हणून मोदींची त्यांनाच पसंती होती. सध्या ते केंद्रीय मंत्री आहेत. भाजपानं मुख्यमंत्री म्हणून अलीकडेच केलेल्या निवडींमध्ये आता आरएसएसनं लक्ष घातलं आहे. तेव्हा खट्टर हे एक मजबूत दावेदार असू शकतात. खट्टर यांच्यासाठी अनुकूल नसलेला मुद्दा म्हणजे त्यांचं वय. ते आता ७० वर्षांचे आहेत.

शिवराज सिंह चौहान यांच्याकडेही संभाव्य मुख्यमंत्री म्हणून पाहिलं जातं. याआधी त्यांनी बराच काळ मुख्यमंत्रिपदी काम केलं आहे. २०२३ मध्ये मध्य प्रदेशातून विजयी झालेल्या शिवराजसिंग चौहान यांच्याकडे मुख्यमंत्रिपद सोपवण्यात आलं नाही; मात्र केंद्रीय कृषfमंत्री म्हणून त्यांची निवड करण्यात आली. अवघ्या १३ व्या वर्षी ते उजव्या विचारसरणीच्या संघटनेत सामील झाले. त्याशिवाय त्यांचे संघाशी जुने संबंध आहेत. पंतप्रधानांनी अलीकडेच चौहान यांना केंद्रीय योजनांवर देखरेख करण्यासाठी प्रभारीपदी नेमले.

या संभाव्य नावांची चर्चा जरी आता सुरू असली तरी भाजपाकडून अध्यक्षपदासंदर्भात आश्चर्याचा धक्का दिला जाऊ शकतो. मार्च किंवा एप्रिलमध्ये याबाबतचा निर्णय होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.