नागपूर: कधीकाळी कॉंग्रेसचा बालेकिल्ला असलेला नागपूर लोकसभा मतदारसंघ पुन्हा सर करण्यासाठी कॉंग्रेसने यावेळी येथून भाजप विरोधात तुल्यबळ उमेदवार देण्याचे ठरवले आहे. पक्षांतर्फे यावेळी विद्यमान आमदार विकास ठाकरे किंवा विधान परिषद सदस्य अभिजित वंजारी यापैकी एकाला लोकसभेच्या रिंगणात उतरवले जाण्याची शक्यता आहे. हे दोन्ही उमेदवार भाजपला टक्कर देण्यास सक्षम ठरू शकतात,असे पक्षाच्या नेत्यांचे मत आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

१०८० नंतर एकवेळ अपवाद सोडला तर सातत्याने नागपूची जागा लाखोंच्या मताधिक्याने जिंकणारी कॉंग्रेस २०१४ मध्ये भाजपकडून पराभूत झाली. नागपूरहून सलग अनेक वर्ष विजयी होणारे कॉंग्रेस नेते विलास मुत्तेमवार यांचा प्रथमच लोकसभा निवडणूक लढणारे भाजप नेते नितीन गडकरी यांनी २ लाख ६६ हजारांहून अधिक मतांनी पराभव केला होता. २०१९ ची निवडणूक गडकरी यांनी पुन्हा जिंकली असली तरी या निवडणुकीत कॉंग्रेसचे नाना पटोले यांनी भाजपच्या तोंडाला फेस आणला होता. पटोले यांची उमेदवारी ऐनवेळी जाहीर झाली होती. त्यांना पुरेसा वेळ मिळाला नव्हता, शिवाय ते बाहेरचे होतें. पुरेसा वेळ मिळाला असता तर नागपूरचे चित्र वेगळे असते, असे पटोले आताही सांगतात. यंदा पटोले त्यांच्या पारंपारिक भंडारा जिल्ह्यातून लढणार, असे सांगितले जाते. त्यामुळे कॉंग्रेस नवीन व प्रतिस्पर्धी भाजपला लढत देऊ शकेल अशा तुल्यबळ उमेदवारांच्या शोधात होती.

हेही वाचा… संभाजीनगरात भाजपचा हिंदुत्वावर भर, एमआयएएमच्या विरोधात अमित शहा आक्रमक

पश्चिम नागपूरचे आमदार विकास ठाकरे आणि नागपूर विभाग पदवीधर मतदारसंघात भाजपचे पराभव करणारे अभिजित वंजारी या दोन प्रमुख नेत्यांची नावे कॉंग्रेसपुढे होती. पक्षनिष्ठा, जातीय समीकरणे आणि भाजपशी दोन हात करण्याची क्षमता या निकषांच्या आधारावर या दोन नावांची निवड करण्यात आली. पक्षश्रेष्ठींनी या नेत्यांना याबाबत विचारणाही केली. त्यांच्याकडून होकार आल्यास यापैकी एकाला लोकसभेच्या रिंगणात उतरवले जाण्याची शक्यता आहे. मुंबईत यासंदर्भात मंगळवारी कॉंग्रेसची बैठक झाली. त्यातही नागपूरसाठी या दोन नावांवर चर्चा झाली हे येथे उल्लेखनीय.

हेही वाचा… वंचितबाबत संभ्रम वाढला

दरम्यान भाजपने अद्याप नागपूरसाठी उमेदवार म्हणून केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या नावाची अधिकृत घोषणा केली नाही. मात्र तेच या वेळी पुन्हा नागपूरहून लढणार, असे भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी स्पष्ट केले आहे. त्यामुळे कॉंग्रेसचा उमेदवार कोण अशी चर्चा राजकीय वर्तुळात होती.

मराठीतील सर्व सत्ताकारण बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Who will be congress candidate for nagaur lok sabha constituency print politics news asj