उमाकांत देशपांडे, हृषीकेश देशपांडे
मुंबईवर असलेले उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेचे वर्चस्व आणि महापालिकेतील सत्ता संपुष्टात आणणार, अशा घोषणा भाजप गेली अनेक वर्षे करीत आहे. गेल्या महापालिका निवडणुकीत भाजपने शिवसेनेची घोडदौड रोखली, तरी राज्य सरकारमध्ये युती असल्याने सत्तेपासून रोखता आले नाही. मुंबईत भाजपची ताकद निश्चितच वाढली असून फुटीमुळे ठाकरे यांची शिवसेना पूर्वीपेक्षा कमजोर झाली आहे.

मात्र ठाकरे गट महाविकास आघाडीबरोबर असल्याने त्यांचा मोठा लाभ झाला आणि नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत महायुतीला धक्का बसला. महाआघाडीचे चार आणि महायुतीचे केवळ दोन खासदार निवडून आले. विधानसभेच्या ३६ जागांपैकी २१ विधानसभा मतदारसंघांत महाविकास आघाडीला मताधिक्य होते, तर महायुतीला केवळ १५ ठिकाणी आघाडी मिळविता आली. लोकसभा निवडणुकीतील विजयामुळे महाविकास आघाडीचा आत्मविश्वास वाढला असून विधानसभा निवडणुकीत महायुतीला विजय सोपा नाही.

हेही वाचा >>>बिहारमध्ये ११४ वर्षांनंतर भूमी सर्वेक्षण; नितीश कुमार सरकारच्या निर्णयावर विरोधकांची टीका कशासाठी?

जागावाटप अवघड

गेल्या निवडणुकीत भाजप-शिवसेना युती असताना मुंबईत भाजपने १६ तर शिवसेनेने १४ जागा जिंकल्या होत्या. तर काँग्रेसला चार आणि समाजवादी पक्ष व राष्ट्रवादी काँग्रेसला प्रत्येकी एक जागा मिळाली होती. आता नव्या राजकीय समीकरणांमुळे आणि लोकसभा निवडणुकीनंतर वातावरण बदलले आहे. शिवसेना व राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडली आहे. मुंबईत शिवसेनेबरोबरच भाजप आणि काँग्रेस या दोन राष्ट्रीय पक्षांची ताकद आहे. लोकसभा निवडणुकीत मुस्लीम मतदारांनी महाविकास आघाडीला एकगठ्ठा मतदान केल्याने ठाकरे गटाला त्याचा लाभ झाला. समाजवादी पक्षही इंडिया आघाडीत असल्याने त्यांचीही साथ मिळाली. मुंबईतील चार ते पाच मतदारसंघांत मुस्लीम मतदार तीस टक्क्यांच्या आसपास आहेत. तेथे तिसरी आघाडी किंवा अन्य पक्ष फारसे प्रभाव टाकतील असे दिसत नाही. त्यामुळे महायुतीपुढे विजयाचे मोठे आव्हान असून शिंदे गटाची ताकद फारशी नसल्याने भाजपवरच अधिक भिस्त आहे. लोकसभा निवडणुकीत महायुती आणि महाविकास आघाडीत जागावाटपावरून बराच वाद झाला. महाविकास आघाडीतही सारे काही आलबेल नसून मुख्यमंत्रीपदावरून वाद आहे. राष्ट्रवादी काँग्रेसमधील दोन्ही गटांची मुंबईत तीन-चार मतदारसंघ वगळता विशेष ताकद नाही. शिंदे गटाचे सहा आमदार असून या जागा भाजपला सोडाव्या लागतील. महायुती व महाविकास आघाडीत विधानसभा निवडणुकीत बंडखोरी मोठ्या प्रमाणावर होण्याची चिन्हे आहेत. त्यात भाजपचाही अपवाद नसून माजी मंत्री, खासदार व आमदार उमेदवारी न मिळाल्यास ठाकरे गट किंवा अन्य पक्षात जाऊन उमेदवारी मिळविण्यासाठी प्रयत्नशील आहेत.

हेही वाचा >>>Devendra Fadnavis: देवेंद्र फडणवीस यांचे राजकीय भवितव्य काय? दिल्ली की महाराष्ट्र? भाजपासमोर यक्ष प्रश्न

देशाच्या आर्थिक राजधानीत वर्चस्व मिळविण्यासाठी महाविकास आघाडी आणि महायुतीमध्ये चढाओढ असून दोघांमध्येही जागावाटप हा कळीचा मुद्दा असेल, तर बंडखोरीचे आव्हानही मोठे असणार आहे.

भाजप व ठाकरे गटाची भिस्त

मुंबईत गेल्या पाच वर्षांत मेट्रो, अटल सेतू किंवा अन्य पायाभूत सुविधांचे जाळे निर्माण झाले. मुंबईतील विकासकामे, पायाभूत सुविधा प्रकल्प, हिंदुत्व, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे नेतृत्व आणि केंद्र व राज्य सरकारची कामगिरी यावर भाजपची प्रामुख्याने भिस्त आहे. मुंबई महापालिकेत सध्या प्रशासकीय राजवट असली तरी, हे महत्त्वाचे सत्ताकेंद्र अनेक वर्षे शिवसेनेच्या ताब्यात आहे. मराठीच्या मुद्द्यावर त्यांना सहानुभूतीही लाभली. मात्र शहरातील मराठी टक्का कमी झाला असून उत्तर भारतीय, गुजराती, मारवाडी, दक्षिण भारतीय व मुस्लीम मतदारांची संख्या वाढली आहे. गेल्या पालिका निवडणुकीत भाजपने शिवसेनेला शेवटपर्यंत झुंजवले होते. पक्षफुटीनंतरही लोकसभा निवडणुकीत मुंबईत ठाकरे गटाची चांगली कामगिरी झाली. विशेषत: ईशान्य मुंबईत मराठीच्या मुद्द्यावर पक्षाला मतदारांची सहानुभूती मिळाली. विधानसभा निवडणुकीत त्याची पुनरावृत्ती करण्याचे प्रयत्न सुरू आहेत. भाजपने शिवसेना-राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष फोडले, भ्रष्टाचाराचे आरोप केलेल्या नेत्यांना बरोबर घेऊन दोषमुक्त केले आणि महापालिका निवडणूक घेण्याचे धाडस नाही, या मुद्द्यांवर भाजपचा प्रचार होण्याची शक्यता आहे.

मनसेबाबत उत्सुकता

मराठीच्या मुद्द्यावर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने काही वेळा आक्रमक भूमिका घेतली होती व लोकसभेसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पाठिंबा दिला होता. आता विधानसभेला सर्व जागा लढविण्याची घोषणा केली असून माहिम-दादर, वरळी, शिवडी या मराठीबहुल भागांमध्ये मनसेची कामगिरी कशी होईल, याविषयी उत्सुकता आहे. भाजप-मनसे जवळीक वाढली असली तरी महायुतीकडून काही जागा मनसेसाठी सोडल्या जाण्याची शक्यता कमी आहे. मात्र मनसे उमेदवारांचा उपयोग काही मतदारसंघांमध्ये ठाकरे गटातील उमेदवारांच्या मतांची फाटाफूट करण्यासाठी भाजपकडून केला जाऊ शकेल. मुंबईवर वर्चस्व कोणाचे, हा मुद्दा या निवडणुकीत निर्णायक ठरेल.