२६ जून रोजी नवीन लोकसभेच्या अध्यक्षाची निवड करण्यात येणार असल्याची शक्यता आहे. अध्यक्षपदाच्या निवडीवर सत्ताधारी एनडीए आणि विरोधी इंडिया आघाडीचे एकमत होण्याचीही शक्यता वर्तविली जात आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, एनडीए सर्वसहमती मिळेल अशाच उमेदवाराचे नाव पुढे करण्याच्या तयारीत आहे. एनडीएतील भाजपाच्या मित्रपक्षांना लोकसभेचे अध्यक्षपद हवे असल्याचे सूत्रांनी सांगितले होते. परंतु, लोकसभा अध्यक्षपदासाठी झुकणार नाही, उपाध्यक्षपद देऊ, मात्र अध्यक्षपद देणार नाही; अशी भाजपाची भूमिका असल्याचे पाहायला मिळाले आहे. दुसरीकडे विरोधक लोकसभा उपाध्यक्ष पदासाठी इच्छुक आहेत.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

लोकसभेच्या अध्यक्षपदावरून ‘एनडीए’त मतभेद?

लोकसभेचे उपाध्यक्षपद न दिल्यास अध्यक्षपदासाठी उमेदवार उभा करू, असा इशारा विरोधकांकडून देण्यात आला आहे. पाच वर्षांपासून उपाध्यक्षपद रिक्त आहे. एनडीएमधील सूत्रांनी सांगितले की, मित्रपक्ष भाजपाच्या निवडीला सहमती देतील, परंतु सल्लामसलत केल्यानंतरच. जेडी(यू) ने आधीच जाहीर केले आहे की, भाजपा जो काही निर्णय घेईल त्याला त्यांचा पाठिंबा असेल, तर टीडीपीनेही एनडीएच्या उमेदवाराला पाठिंबा देण्याचे ठरवले आहे. “एनडीएच्या बैठकीत ज्या नावाला सर्वांची सहमती असेल, त्याच नावाला टीडीपीचादेखील पाठिंबा असले,” असे टीडीपीच्या एका सूत्राने सांगितले. “आम्ही अध्यक्षपद किंवा उपाध्यक्षपदाची मागणी करणार नाही, ” असे जेडी(यू) च्या ज्येष्ठ नेत्यांनी सांगितले.

हेही वाचा : भाजपाला पसमांदा मुस्लिमांची मतं का मिळाली नाहीत?

रविवारी भाजपाच्या वरिष्ठ मंत्र्यांची एनडीएतील मित्रपक्षांबरोबर बैठक पार पडली. या बैठकीनंतर नवनियुक्त संसदीय कामकाज मंत्री किरेन रिजिजू यांनी काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांची भेट घेतली. मात्र, त्या बैठकीत लोकसभा अध्यक्षपदाबाबत कोणतीही चर्चा झाली नसल्याचे सूत्रांनी सांगितले. २०१४ आणि २०१९ मध्ये लोकसभेत भाजपाकडे पूर्ण बहुमत होते, त्यामुळे पक्षाच्या खासदार सुमित्रा महाजन आणि ओम बिर्ला यांची अध्यक्षपदी बिनविरोध निवड करण्यात आली. १६ व्या लोकसभेत एआयएडीएमकेचे एम. थंबी दुराई हे उपाध्यक्ष होते, परंतु १७ व्या लोकसभेत उपाध्यक्षपद रिक्त राहिले.

अध्यक्षपदासाठी कोणाच्या नावांची चर्चा?

काँग्रेसच्या नेतृत्वाखालील यूपीएच्या दोन कार्यकाळात, २००४ मध्ये उपाध्यक्षपद भाजपा खासदार चरणजित सिंह अटवाल आणि २००९ मध्ये कारिया मुंडा यांना देण्यात आले होते. सरकारमधील सूत्रांनी सांगितले की, त्यांना अध्यक्ष किंवा उपाध्यक्ष पदाच्या मुद्द्यावरून विरोधकांशी संघर्ष नको आहे. “परंतु, विरोधी पक्ष आमच्या प्रयत्नांना कसा प्रतिसाद देतो यावर सर्व काही अवलंबून आहे,” असे एका नेत्याने सांगितले. भाजपाला आधी एनडीएमधील नावांवर आणि नंतर विरोधी पक्षांशी चर्चा करावी लागत असल्याने, पक्षाच्या अनेक नेत्यांना बिर्ला यांना या पदासाठी पुन्हा उमेदवारी देण्यात येईल, अशी शक्यता दिसत आहे. २००४ नंतर ते पहिले लोकसभा अध्यक्ष आहेत, ज्यांनी अध्यक्षपद भूषवल्यानंतर लोकसभा निवडणूक यशस्वीपणे लढवली आहे.

पण, या शर्यतीत टीडीपीच्या डी. पुरंदेश्वरी आणि सात वेळा खासदार राहिलेले भर्तृहरी महताब यांचेही नाव चर्चेत आहे. एनडीए आघाडीचे नेतृत्व जे नाव निवडेल ते प्रथम आघाडीतील मित्रपक्षांसमोर ठेवले जाईल,” असे भाजपामधील एका सूत्राने सांगितले.

हेही वाचा : भाजपा आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघात नेमकी खदखद कसली?

संसदेचे पहिले अधिवेशन कधी?

लोकसभेचे पहिले अधिवेशन २४ जून रोजी होणार आहे. बुधवार, २६ जून रोजी लोकसभा अध्यक्षांच्या नावाची घोषणा केली जाईल. नावावर एकमत असल्यास, नवीन अध्यक्ष त्याच दिवशी पदभार स्वीकारतील. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू २७ जून रोजी संसदेच्या संयुक्त अधिवेशनाला संबोधित करतील. नवनिर्वाचित खासदारांना प्रोटेम स्पीकर शपथ देतील. अधिवेशनानुसार सर्वात ज्येष्ठ खासदाराची प्रोटेम स्पीकर म्हणून नियुक्ती केली जाईल. आठव्यांदा निवडून आलेले सर्वात ज्येष्ठ खासदार, काँग्रेसचे खासदार कोडीकुन्नील सुरेश यांच्याकडे कामकाजाची जबाबदारी सोपवली जाण्याची शक्यता आहे.

मराठीतील सर्व सत्ताकारण बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Who will be next loksabha speaker rac
First published on: 18-06-2024 at 13:35 IST