Mahayuti : विधानसभा निवडणुकीत महायुतीला ( Mahayuti ) प्रचंड बहुमत मिळालं आहे. महायुतीची ( Mahayuti ) सत्ता आली आहे, अशात भाजपाचे दोन प्रमुख मित्र पक्ष असलेले राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) आणि शिवसेना (एकनाथ शिंदे) यांच्यासह महाराष्ट्राला प्रश्न पडला आहे की मुख्यमंत्री नेमकं कोण होणार?
भाजपामध्ये काय चाललं आहे?
महायुतीचं Mahayuti जोरदार कमबॅक झालं आहे. एकट्या भाजपाने १३२ जागा जिंकल्या आहेत. २३९ पैकी १३२ जागा भाजपाच्या नावावर आहेत त्यामुळे भाजपा हा महायुतीतला (Mahayuti ) आणि महाराष्ट्रातला सर्वात मोठा पक्ष ठरला आहे. देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री झाले पाहिजेत ही कार्यकर्ते पदाधिकाऱ्यांची भावना आहे. मात्र भाजपाकडून याबाबत अधिकृत घोषणा झालेली नाही. सूचक मौन बाळगत भाजपाने सस्पेन्स वाढवला आहे. आम्हाला सत्तास्थापन करताना कुठलेही अडथळे, नाराजी हे नकोय त्यामुळे त्या अनुषंगाने आम्ही दोन्ही मित्र पक्षांना बरोबर घेऊन सरकार स्थापन कसं करता येईल यावर भर देत आहोत असं एका वरिष्ठ भाजपा नेत्याने इंडियन एक्स्प्रेसला सांगितलं.
हे पण वाचा- …विकास हाच आमचा अजेंडा, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे स्पष्ट प्रतिपादन
चंद्रशेखर बावनकुळे काय म्हणाले?
भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले, “महायुतीचा (Mahayuti ) मुख्यमंत्री कोण होणार हे नाव आमच्या संसदीय मंडळाकडून तसंच एकनाथ शिंदे, अजित पवार यांच्यात चर्चा होऊन ठरवलं जाईल.” असं असलं तरीही दुसरीकडे एकनाथ शिंदे हे पुन्हा मुख्यमंत्री व्हावेत अशी अपेक्षा शिंदेंच्या शिवसेनेला आहे. महायुतीने एकनाथ शिंदेंच्या नेतृत्वात अभूतपूर्व यश मिळवलं आहे. कारण ही विधानसभा निवडणूक एकनाथ शिंदेंच्या नेतृत्वात लढली गेली त्यामुळे पुन्हा एकदा त्यांनाच मुख्यमंत्री केलं जावं अशी अपेक्षा शिवसेनेला आहे. एकनाथ शिंदे हेच गटनेते असतील अशी निवड रविवारी झालेल्या बैठकीत करण्यात आली आहे. तर दुसरीकडे अजित पवार यांची निवड राष्ट्रवादीने गटनेता म्हणून केली आहे. दरम्यान अजित पवारांच्या राष्ट्रवादीने देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असण्याला काही आक्षेप नाही असं म्हणत एक प्रकारे त्यांचा पाठिंबा दर्शवला आहे.
छगन भुजबळ नेमकं काय म्हणाले?
“देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असतील तर त्यावर हरकत घ्यायचं काही कारण नाही. आमचा त्यांना विरोध नसेल.” असं छगन भुजबळ यांनी माध्यमांशी बोलताना जाहीर केलं आहे. भाजपाला मात्र कुठल्याही घाईत निर्णय घ्यायचा आहे, चर्चा न करता निर्णय घ्यायचा आहे असं दिसत नाहीये. त्यामुळे भाजपाने शांत राहून त्यांची आखणी सुरु केली आहे.
अनंत कळसे यांनी नेमकं काय म्हटलं आहे?
विधीमंडळाचे माजी प्रधान सचिव अनंत कळसे यांनी म्हटलं आहे की, १५ वी विधानसभा २६ नोव्हेंबरच्या आत स्थापन झाली पाहिजे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आता राजीनामा दिला पाहिजे आणि महायुतीने सत्तास्थापनेसाठी योग्य ती पावलं उचलली पाहिजेत. एकदा का १५ वी विधानसभा स्थापन झाली की मुख्यमंत्री कुणाला करायचं याचा निर्णय घेण्याची वेळ महायुतीला वाढवता येईल. तोपर्यंत प्रभारी मुख्यमंत्री म्हणून एकनाथ शिंदे यांचा कार्यकाळ राज्यपाल वाढवू शकतील.
संघाच्या मनातही देवेंद्र फडणवीस हेच नाव
महायुतीतल्या सगळ्याच पक्षांनी, कार्यकर्त्यांनी जशी निवडणुकीसाठी मेहनत घेतली त्याप्रमाणेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघानेही मेहनत घेतली. भाजपाचा पाठिंबा कसा वाढेल? यासाठीची तयारी त्यांनी लोकसभेच्या निकालानंतरच सुरु केली होती. आता याच संघाने मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस यांच्या नावाला पसंती दर्शवली आहे. संघाच्या एका ज्येष्ठ नेत्याने सांगितलं की राष्ट्रीय स्वयंसेवक संघ कधीही राजकीय गोष्टींमध्ये पडत नाही, ढवळाढवळ करत नाही. मात्र एक उत्तम क्षमता असलेला माणूस मुख्यमंत्री झाला पाहिजे असं आमचं मत आहे. देवेंद्र फडणवीस यांनी २०१४ ते २०१९ या पाच वर्षांच्या कालावधीत उत्तम काम केलं आहे. त्यामुळे आमच्याही मनात त्यांचं नाव आहे असं संघाने म्हटलं आहे. या सगळ्या अंतर्गत घडामोडी महायुतीत घडत आहेत. आता भाजपाची संसदीय समिती काय निर्णय घेणार आणि महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रिपदाची माळ कुणाच्या गळ्यात पडणार हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे.