देवेश गोंडाणे

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

नागपूर : विधान परिषदेच्या पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुुका जाहीर झाल्याने शैक्षणिक क्षेत्रातील राजकीय घडामोडींना वेग येणे सुरू होणार आहे. नागपूर शिक्षक मतदारसंघातून सलग दोनवेळा विजय मिळवणारे विद्यमान आमदार नागो गाणार यांना भाजपकडून उमेदवारी मिळणार की, नव्या चेहऱ्यांना संधी मिळणार याबाबत उत्सूकता आहे. भाजप शिक्षक आघाडीचे अनिल शिवणकर आणि माजी महापौर व शिक्षण मंचाच्या प्रमुख डॉ. कल्पना पांडे यांनीही भाजपकडून उमेदवारीसाठी दावा केला आहे. गाणार यांची उमेदवारी शिक्षक परिषदेने भाजपशी सल्लामसलत न करता यापूर्वीच जाहीर केल्याने भाजपची कोंडी झाली आहे. दुसऱ्या नावांची चर्चाच होऊ नये म्हणून गाणारांनी ही खेळी खेळली, अशीही चर्चा कार्यकर्त्यांमध्ये आहे.

हेही वाचा… Maharashtra Assembly Winter Session 2022 Live : हिवाळी अधिवेनाचा आज शेवटचा दिवस विधानसभा अध्यक्षांविरोधातील अविश्वास ठरावामुळे गाजणार; राज्यभरातील विविध घडामोडी

नागपूर विभाग शिक्षक मतदारसंघ हा एकेकाळी विदर्भ माध्यमिक शिक्षक संघाचा गड होता. डी.यू. डायगव्हाणे या मतदारसंघातून दोन वेळा निवडून आले. त्यानंतर २०११ मध्ये प्रथमच महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषदेचे नागो गाणार यांनी माध्यमिक शिक्षक संघाच्या गडाला भगदाड पाडत विजय मिळवून विधानपरिषद गाठली होती. त्यानंतर २०१७ मध्येही गाणार विजयी झाले. मात्र यावेळी त्यांना भाजपचा अधिकृत पाठिंबा होता. सध्या राज्यात व केंद्रात भाजप सत्तेत आहे. त्यामुळे भाजपला ही निवडणूक जड जाणार नाही, अशी चर्चा आहे. परिणामी भाजपच्या विविध शिक्षक संघटनांमध्ये इच्छुकांची संख्या वाढली आहे. शिक्षक परिषदेचे कार्यवाह योगेश बन हे अनेक वर्षांपासून उमेदवारीची आस लावून आहेत. तर भाजप शिक्षक आघाडीचे अनिल शिवणकर यांच्या उमेदवारीला कार्यकर्त्यांची पसंती आहे.. माजी महापौर डॉ. कल्पना पांडे उमेदवारीसाठी इच्छुक असून नागपूर विद्यापीठाच्या विविध प्राधिकरणांवर त्यांच्या नेतृत्वातील संघटनेने विजय मिळवल्याने त्यांचा दावा प्रबळ झाला आहे. परंतु, भाजपच्या विविध संघटनांमधील अनेक पदाधिकारी उमेदवारीसाठी रांगेत असताना अचानक महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषदेने नागो गाणार यांची उमेवारी घोषित करत पाठिंब्यासाठी भाजपच्या प्रदेशाध्यक्षाला पत्र पाठवून पक्षाची चांगलीच कोंडी केली. परिषद आणि भाजप शिक्षक आघाडीने आपले अस्तित्व सिद्ध करण्यासाठी आणि नेत्यांचे लक्ष वेधण्यासाठी जास्तीत जास्त मतदार नोंदणीचे लक्ष्य ठेवले आहे. त्यामुळे भाजप नेते परिषदेला समर्थन देतात की भाजप शिक्षक आघाडीचा उमेदवार घोषित करतात हे बघणे महत्त्वाचे आहे.

हेही वाचा… देवेंद्र भुयार : शेतकरी आंदोलक ते आमदार

दुसरीकडे नागपूर विभाग पदवीधर मतदारसंघातील निवडणुकीच्या ऐतिहासिक विजयानंतर महाविकास आघाडीचे लक्ष आता भाजपच्या ताब्यातील शिक्षक मतदारसंघावर आहे. मात्र ही जागा जिंकण्यासाठी त्यांना मोठी कसरत करावी लागणार आहे. शिक्षक भारतीने पुन्हा एकदा राजेंद्र झाडे यांच्यावर विश्वास दाखवून उमेदवारी जाहीर केली. तर विदर्भ माध्यमिक शिक्षक संघातर्फे सरकार्यवाह सुधाकर अडबाले रिंगणात असणार आहेत. मात्र, शिक्षक मतदारसंघात सलग दोनवेळा विजय मिळवणारी भाजप कुणाला उमेदवारी देणार याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे.

मराठीतील सर्व सत्ताकारण बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Who will be the candidate from bjp in nagpur teachers constituency election print politics news asj