संतोष प्रधान
महानगरपालिका, नगरपालिका, नगरपंचायती, जिल्हा परिषदा आणि पंचायत समित्यांच्या ‘मिनी विधानसभा’ म्हणून गणल्या जाणाऱ्या निवडणुकांत भाजप की महाविकास आघाडी वर्चस्व प्रस्थापित करते यावर भविष्यातील राजकीय समीकरणे अवलंबून असतील. पाच वर्षांपूर्वी झालेल्या निवडणुकांमध्ये तेव्हा सत्तेत असलेल्या भाजपने पहिला क्रमांक पटकविला होता. हाच प्रथम क्रमांक कायम राखण्याचे भाजपपुढे मोठे आव्हान असेल.
१४ महानगरपालिका, २१६ नगरपालिका आणि नगरपंचायती, २५ जिल्हा परिषदा आणि २८४ पंचायत समित्यांमधील २,४८६ जागांसाठी निवडणूक होणार आहे. या निवडणुकांमधील कौल काय असेल यावर सारी राजकीय भिस्त असेल. महाविकास आघाडीचा निम्मा कालावधी आता पूर्ण होत आहे. करोनामुळे आघाडी सरकारचा निम्मा कालावधी हा निर्बंध आणि टाळेबंदीतच गेला. आता कुठे अर्थचक्र गतिमान होऊ लागले आहे. भाजपकडून दररोज महाविकास आघाडी सरकारवर होणारे आरोप, महाविकास आघाडीच्या दोन मंत्र्यांना झालेली अटक, अनेक नेत्यांवर असलेली कारवाईची टांगती तलवार यातून महाविकास आघाडी सरकारच्या प्रतिमेवर परिणाम झाला आहे. भाजपने आघाडी सरकारला चांगलेच घेरले आहे. दररोज होणाऱ्या आरोप-प्रत्यारोपांमुळे सत्ताधारी आणि विरोधकांच्या विश्वासार्हतेचा प्रश्न निर्माण झाला आहे. राज्यासमोर पाणी, महागाई, रस्ते असे विविध प्रश्न असताना मशिदींवरील भोंगे, हनुमान चालीसाचे पठण अशा मुद्द्यांना प्राधान्य दिले जात असल्याने सामान्य नागरिकही त्याला फारसे महत्त्व देत नाहीत. मशिदींवरील भोंगे हटविण्याची मागणी करण्यासाठी मनसेचे प्रमुख राज ठाकरे यांना तीन जाहीर सभा घ्यावा लागल्या, पण सामान्य नागरिकांवर त्याचा फारसा परिणाम झालेला दिसत नाही. करोनातून आता कुठे बाहेर पडून आर्थिक गाडी रुळावर येत असताना भोंगे वा अन्य मुद्दयांना नागरिक फारसा प्रतिसाद देत नाहीत हेच दिसून आले.
आगामी निवडणुकांमध्ये महाविकास आघाडी आणि भाजपमध्ये चुरशीची लढत अपेक्षित आहे. महाविकास आघाडीतील शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेस हे तीन पक्ष काही ठिकाणी आघाडी किंवा स्वतंत्रपणे लढणार आहेत. जेथे भाजपचा प्रभाव आहे तेथे तीन नाही तरी दोन पक्षांनी आघाडी करावी, असा मतप्रवाह आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेस या तीन पक्षांनी आघाडी केल्यास त्यातून बंडखोरी मोठ्या प्रमाणावर होईल व त्याचा फायदा भाजपला होऊ शकेल. यामुळेच तिघांनी स्वतंत्रपणे लढावे आणि नंतर महापौर किंवा अध्यक्षपदाच्या निवडणुकीत एकत्र यावे, अशी महाविकास आघाडीच्या नेत्यांची भूमिका आहे. काहीही कतरून भाजपला या निवडणुकांमध्ये डोके वर काढण्यास संधी मिळू नये, यावर राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांचे एकमत झाले आहे.
भाजपची कसोटी
देवेंद्र फडणवीस हे मुख्यमंत्री असताना २०१७ मध्ये झालेल्या महापालिका, नगरपालिका आणि जिल्हा परिषदांच्या निवडणुकांमध्ये भाजपने प्रथम क्रमांक पटकावला होता. महानगरपालिका निवडणुकांमध्ये मुंबई व ठाण्यात शिवसेनेची सत्ता आली होती. पुणे, पिंपरी-चिंचवड, नाशिक, अमरावती या सात महापालिकांमध्ये भाजपची सत्ता आली होती. नगरपालिकांमध्ये नगराध्यक्षपदाची थेट निवडणूक झाली होती. त्यात सर्वाधिक नगराध्यक्ष हे भाजपचे निवडून आले होते. ग्रामीण भागाचा कणा मानल्या जाणाऱ्या जिल्हा परिषदा आणि पंचायत समित्यांच्या निवडणुकांमध्ये भाजपने प्रथम क्रमांक पटकावला होता. एकूणच राज्याच्या शहरी तसेच ग्रामीण भागांतील सर्व स्थानिक स्वराज्य संस्था यंत्रणांमध्ये भाजपचे कमळ फुलले होते. राज्यात सत्ता नसताना पुन्हा पहिला क्रमांक राखण्याचे भाजपपुढे कडवे आव्हान असेल. सत्तेत असताना होणाऱ्या निवडणुका आणि सत्ता नसताना होणाऱ्या निवडणुका यात कमालीचा फरक असतो, अशी टिप्पणी भाजपच्या एका बड्या नेत्याने व्यक्त केली.
महाविकास आघाडीचे सरकार स्थापन झाल्यानंतरच्या १०५ नगरपंचायतींच्या निवडणुकांमध्ये भाजपला सर्वाधिक जागा मिळाल्या. पण शिवसेना., राष्ट्रवादी व काँग्रेसचे संख्याबळ एकत्रित केल्यास भाजपपेक्षा महाविकास आघाडीचे संख्याबळ जास्त होते. त्याच वेळी विधान परिषदेच्या पुणे, नागपूर पदवीधर या भाजपच्या पारंपारिक मतदारसंघांत महाविकास आघाडी एकत्र आल्याने भाजपचा पराभव झाला होता. विधानसभेच्या देलगूर आणि उत्तर कोल्हापूर मतदारसंघांतील पोटनिवडणुकांमध्ये महाविकास आघाडीने विजय संपादन केला. पंढरपूरमध्ये मात्र भाजपने राष्ट्रवादीवर मात केली होती.
भाजपच्या दृष्टीने मुंबई महानगरपालिकेत शिवसेनेचा पराभव करणे हे मुख्य ध्येय आहे. मुंबई महानगरपालिकेतून शिवसेनेला हद्दपार केल्यास शिवसेनेच्या अधोगतीस सुरुवात होईल, हे भाजपचे गणित आहे. याशिवाय पुणे कायम राखून राष्ट्रवादीला त्यांच्या प्रभाव क्षेत्रात दणका देण्याची योजना आहे. भाजपला काहीही करून यश मिळू नये हा शिवसेनेचा प्रयत्न असेल. कारण स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीत भाजपला यश मिळाल्यास राज्याच्या राजकारणातील समीकरणे बदलू शकतात. यामुळेच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये महाविकास आघाडी आणि भाजपमध्ये चुरशीची लढत होण्याची चिन्हे आहेत.
“भाजपाच पहिल्या क्रमांकावर”
राज्यात आजही भाजपच पहिल्या क्रमांकाचा पक्ष आहे. विधानसभा निवडणुकीत भाजपलाच सर्वाधिक जागा मिळाल्या. युती म्हणून बहुमत मिळाले होते. शिवसेनेने आमची साथ सोडली. घोटाळेबाज आघाडी सरकारला राज्यातील जनता महानगरपालिका, नगरपालिका आणि जिल्हा परिषदांच्या निवडणुकांमध्ये धडा शिकविल्याशिवाय राहणार नाही. भाजपच पहिल्या क्रमांकाचा पक्ष ठरेल.
– आशिष शेलार, भाजप नेते
“भाजपाला जनताच धूळ चारेल”
भाजपच्या राजकारणाला जनता विटली आहे. विधानसभा पोटनिवडणुका, विधान परिषद पदवीधर मतदारसंघ, नगरपंचायतींच्या निवडणुकांचा कौल लक्षात घेतल्यास राज्यातील जनता भाजपला पराभवाची धूळ चारेल.
– अतुल लोंढे, काँग्रेस प्रवक्ते
२०१७ महानगरपालिका निवडणूक निकाल (१६ महापालिका )
एकूण जागा – १७२१
भाजपा – ७८७
शिवसेना – ३०१
राष्ट्रवादी – १८१
काँग्रेस – २७४
जिल्हा परिषद ः
एकूण जागा १५०९
भाजपा – ४०६
राष्ट्रवादी – ३६०
काँग्रेस – ३०८
शिवसेना – २७१