रत्नागिरी : चिपळूण-गुहागर विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महायुती आणि महाआघाडी यांच्यात चांगलीच चुरस होणार आहे. महाआघाडीकडून ठाकरे गटाचे आमदार भास्कर जाधव यांची उमेदवारी निश्चित मानली जात आहे. तर भाजपाच्या या जागेवर महायुतीच्या शिंदे गटाने देखील दावा सांगितल्याने तिढा निर्माण होण्याची शक्यता आहे. माजी आमदार सदानंद चव्हाण हेदेखील या निवडणुकीच्या रिंगणात उतरण्याची तयारी करत असल्याने महायुतीत वाद होण्याची शक्यता नाकारता येत नाही.
चिपळूण-गुहागर विधानसभा मतदारसंघात महाविकास आघाडीतर्फे विद्यमान आमदार भास्कर जाधव यांचे पहिल्यापासून वर्चस्व आहे. यावेळीही त्यांची उमेदवारी निश्चित मानली जात आहे. मात्र त्यांच्या विरोधात महायुतीला तगडा उमेदवार उभा करावा लागणार आहे. या निवडणुकीच्या रिंगणात महायुतीकडून माजी आमदार विनय नातू यांनी तयारी सुरू केली आहे. दुसरीकडे शिंदे गटाच्या शिवसेनेकडून चिपळूणचे माजी आमदार सदानंद चव्हाण उमेदवारी मिळवण्यासाठी प्रयत्न करत आहेत. त्यामुळे भास्कर जाधव यांच्या विरोधात महायुतीकडून विनय नातू उमेदवार असणार की, सदानंद चव्हाण याची उत्सुकता कार्यकर्त्यांना लागली आहे.
हेही वाचा – सुधारित वक्फ कायद्याला कडाडून विरोध; भाजप सरकार समाजात फूट पाडत असल्याचा आरोप
या विधानसभा निवडणुकीत २००९ सालासारखीच परिस्थिती पुन्हा निर्माण होण्याची शक्यता आहे. आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यामध्ये सर्वच राजकीय पक्षांनी आपली मोर्चेबांधणी करण्यास सुरुवात केली आहे. या पार्श्वभूमीवर मंत्र्यांचेही दौरे वाढले आहेत. मागील पाच वर्षे गायब झालेले नेतेही डोकं वर काढू लागले असल्याने जोरदार राजकीय हालचालींना वेग येण्यास सुरुवात झाली आहे. शिवसेनेचे निरीक्षक रवींद्र फाटक यांनी नुकताच चिपळूणचा दौरा केला. यावेळी माजी आमदार सदानंद चव्हाण यांना उमेदवारी देण्याविषयी कार्यकर्त्यांनी मागणी केली. मात्र याविषयी आपण पक्षश्रेष्ठींकडे बोलू असे आश्वासन रवींद्र फाटक यांनी दिल्याचे बोलले जात आहे.
चिपळूण-गुहागर विधानसभा मतदारसंघात येथील परिस्थितीचा अंदाज घेण्यासाठी पक्षाचे निरीक्षक रवींद्र फाटक आले होते. त्यावेळी कार्यकर्त्यांनी आपल्या मागण्या त्यांच्याकडे मांडल्या. मात्र, २००९ च्या विधानसभा निवडणुकीत भाजपाची जागा शिवसेनेने घेतली. त्यावेळी नातू यांनी बंडखोरी केल्यामुळे राष्ट्रवादीचे भास्कर जाधव निवडून आले होते. नंतर झालेल्या विधानसभा निवडणुकीत शिवसेना-भाजप एकत्र निवडणूक लढून देखील भास्कर जाधव यांचा पराभव करणे शक्य झाले नाही. नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडीचे अनंत गीते यांना गुहागर मतदारसंघातून २७ हजारपेक्षा जास्त मताधिक्य मिळाले. त्यामुळे या मतदारसंघात महाविकास आघाडीचेच वर्चस्व असल्याचे दिसून आले आहे. त्यामुळे विधानसभा निवडणुकीत देखील याचा परिणाम दिसणार आहे.
हेही वाचा – विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर राजकीय यात्रांचा हंगाम सुरू
गुहागर भाजपचा परंपरागत मतदारसंघ असल्याने विधानसभा निवडणुकीसाठी माजी आमदार डॉ. विनय नातू यांचीही तयारी सुरू झाली आहे. काही महिन्यांपूर्वी भाजपा पक्षाचे राज्य सरचिटणीस नीलेश राणे यांनी डॉ. नातू यांनी निवडणुकीची तयारी करावी, असे जाहीर केले होते. मात्र या विधानसभेसाठी ही जागा मुख्यमंत्री शिंदे यांच्या शिवसेनेला पाहिजे असल्याने या जागेवरून महायुतीत वाद होण्याची शक्यता आहे. मात्र ही जागा कोणाच्या वाट्याला येणार हे लवकरच कळणार आहे. महायुतीकडून हा तिढा न सोडवला गेल्यास याचा फायदा भास्कर जाधव यांनाच होणार आहे. त्यामुळे या जागेबाबत महायुतीकडून कोणता निर्णय घेतला जातो याकडे आता सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे.