मोहन अटाळकर
अमरावती : विधान परिषदेच्या अमरावती पदवीधर मतदार संघातील निवडणुकीत राजकीय पक्षांमध्ये लढाईचे चित्र असले, तरी शिक्षक, पदवीधर, कर्मचारी संघटनांच्या भूमिका यावेळी महत्वाच्या ठरणार असून वाढती बेरोजगारी, शिक्षकांचे प्रलंबित प्रश्न, जुनी पेन्शन योजना हेही विषय केंद्रस्थानी आले आहेत. भाजपाचे उमेदवार डॉ. रणजित पाटील यांच्यासमोर प्रस्थापित विरोधी कौल ( अँटी इन्कबन्सी) रोखण्याचे आव्हान असणार आहे. भाजप आणि कॉंग्रेसमध्ये थेट सामना आहे.
पाच जिल्ह्यांमध्ये विखुरलेल्या मतदार संघात प्रत्यक्ष मतदारापर्यंत पोहचणे कठीण असताना मतदार नोंदणीच्या वेळी संघटनांनी घेतलेले परिश्रम निकालात दिसून येतील, असे सांगितले जात आहे. सलग दोन वेळा प्रतिनिधित्व करणारे भाजपचे उमेदवार डॉ. रणजित पाटील, कॉंग्रेसचे उमेदवार धीरज लिंगाडे, वंचित बहुजन आघाडीचे प्रा. अनिल अमलकार, भाजपाचे बंडखोर उमेदवार शरद झांबरे, काँग्रेसचे बंडखोर श्याम प्रजापती, अपक्ष उमेदवार किरण सरनाईक यांच्यासह २३ उमेदवारांचे भवितव्य २ लाख ६ हजार १७२ मतदार ठरवणार आहेत.
हेही वाचा… नगर : पदवीधर निवडणूक प्रचारात महाविकास आघाडीच्या आमदारांची दांडी
अमरावती पदवीधर मतदार संघावर सलग ३० वर्षे ‘नुटा’ या संघटनेचे वर्चस्व होते. २०१० मध्ये झालेल्या निवडणुकीत भाजपचे डॉ. रणजित पाटील यांनी सलग पाच वेळा या मतदार संघाचे प्रतिनिधीत्व करणारे बी टी देशमुख यांचा पराभव केला. त्यानंतर व्यावसायिक संघटनांची शक्ती क्षीण होत राजकीय पक्षांचा प्रभाव वाढत गेल्याचे चित्र दशकभरात दिसून आले.
हेही वाचा… आज लोकसभेची निवडणूक झाली तर कोणाची येणार सत्ता? जनतेचा पाठिंबा नेमका कोणाला? जाणून घ्या
‘नुटा’ या संघटनेने अजूनही कुणालाही पाठिंबा घोषित केलेला नाही. गेल्या निवडणुकीत देखील नुटाने मतदारांनी स्वविवेकाने मतदान करावे असे आवाहन केले होते. दुसरीकडे, विदर्भ माध्यमिक शिक्षक संघ, विज्युक्टा, यासारख्या संघटनांची भूमिका देखील महत्वाची ठरणार आहे. मराशिप, शिक्षक आघाडीचा डॉ रणजित पाटील यांना पाठिंबा असल्याने त्यांना आधार मिळालेला आहे, पण त्यांना पक्षांतर्गत नाराजी दूर करण्यासाठी परिश्रम घ्यावे लागत आहेत.
हेही वाचा… भाजपाच्या पडळकरांना शिंदे गटाच्या आमदाराने सुनावले
कॉंग्रेसचे उमेदवार धीरज लिंगाडे यांच्यासाठी महाविकास आघाडीतील घटक पक्ष किती परिश्रम घेतात आणि अपक्ष उमेदवारांची मतविभागणी कुणाच्या पथ्यावर पडणार, याचे आडाखे बांधले जात आहेत. सर्वाधिक ६४ हजार ३४४ मतदार हे अमरावती जिल्ह्यात तर त्या खालोखाल ५० हजार ६०६ मतदार हे अकोला जिल्ह्यात आहेत. या दोन जिल्ह्याचा कौल महत्वाचा ठरणार आहे. बुलढाणा जिल्ह्यात ३७ हजार ८९४, यवतमाळ जिल्ह्यात ३५ हजार २७८ तर वाशीम जिल्ह्यात १८ हजार ५० मतदार आहेत.
भाजपसाठी आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासाठी ही निवडणूक प्रतिष्ठेची ठरली आहे. गेल्या निवडणुकीच्या वेळी डॉ. रणजित पाटील हे राज्यमंत्री होते. तत्कालीन मुख्यमंत्र्यांकडील सर्व खाती त्यांच्याकडे होती. पण, आता त्यांच्याकडे मंत्रिपद नाही. पक्षसंघटनेवरच त्यांची भिस्त आहे. दुसरीकडे, सरकारविरोधी मतांची एकजूट करणे हे धीरज लिंगाडे यांचे लक्ष्य आहे. या निवडणुकीत भाजप आणि कॉंग्रेसमध्ये थेट लढतीची शक्यता वर्तवली जात असतानाच अन्य उमेदवारांचे उपद्रवमूल्य कुणासाठी नुकसानकारक ठरणार याचे औत्सुक्य आहे.