संतोष प्रधान

राज्यसभेपाठोपाठ विधान परिषदेचे दहा आमदार जुलैच्या पहिल्या आठवड्यात निवृत्त होत आहेत. विधानसभेतील संख्याबळानुसार भाजपचे चार, शिवसेना आणि राष्ट्रवादीचे प्रत्येकी दोन तर काँग्रेसचा एक उमेदवार पहिल्या पसंतीच्या मतांच्या आधारे निवडून येऊ शकतात. दहाव्या जागेसाठी चुरशीची लढत अपेक्षित आहे. काँग्रेसला दहाव्या जागेसाठी किमान १२ मतांची व्यवस्था करावी लागेल. 

विधान परिषदेच्या दहा जागांसाठी निवडणूक होणार असल्याने निवडून येण्याकरिता पहिल्या पसंतीच्या २७ मतांची आवश्यकता असेल. विधान परिषदेसाठी गुप्त मतदान पद्धतीने मतदान होत असल्याने मतांची फाटाफूट होण्याची शक्यता असते. यापूर्वी राज्यात विधान परिषद निवडणुकीत मतांची फाटाफूट झाली होती. त्यात तेव्हा सत्ताधारी असलेल्या काँग्रेस पक्षाचा एक उमेदवार पराभूत झाला होता. यामुळेच सर्व राजकीय पक्ष अधिक खबरदारी घेतील. तसेच २७ मतांचा कोटा असला तरी एक – दोन जास्त मतांची व्यवस्था करावी लागते. 

विधानसभेतील संख्याबळानुसार भाजपचे चार उमेदवार निवडून येऊ शकतात. भाजपेच १०६ आमदार असून काही अपक्षांचा पाठिंबा आहे. यामुळे भाजपचे चार उमेदवार पहिल्या फेरीत निवडून येण्यात काहीच अडचण येणार नाही. शिवसेनेचे ५६ आमदार आहेत. दोन उमेदवार निवडून येण्यासाठी शिवसेनेकडे पुरेशी मते आहेत. राष्ट्रवादीचे ५३ आमदार असले तरी काही अपक्ष राष्ट्रवादीबरोबर आहेत. यामुळे राष्ट्रवादीचे दोन आमदार पहिल्या फेरीत निवडून येऊ शकतात. काँग्रेसचा एक उमेदवार सहजपणे निवडून येऊ शकतो. पहिल्या उमेदवाराला मतांचा कोटा दिल्यावर काँग्रेसकडे १५ अतिरिक्त मते उरतात. दहावा उमेदवार निवडून आणण्याकरिता काँग्रेसला १० ते १२ मतांची बेगमी करावी लागेल. त्यासाठी आर्थिकदृष्ट्या तगडा उमेदवार रिंगणात उतरवावा लागेल. छोटे पक्ष व अपक्षांनी साथ दिली तर काँग्रेसचा दुसरा उमेदवार निवडून येऊ शकतो.

दहाव्या जागेसाठी एखादा आर्थिकदृष्ट्या तगडा उमेदवार रिंगणात उतरल्यास मात्र सारे चित्र बदलू शकते. भाजपकडून तशी खेळी केली जाण्याची शक्यता नाकारता येत नाही. अपक्ष व छोट्या पक्षाच्या आमदारांना वश केल्यास बड्या उमेदावाराचा निभाव लागू शकतो.

सभापती, मंत्री, विरोधी पक्षनेत्यांचे भवितव्य काय ?

सभापती रामराजे नाईक निंबाळकर हे निवृत्त होत आहेत. १९९५ पासून सतत आमदार असलेले निंबाळकर हे २०१० पासून विधान परिषदेचे सदस्य आहेत. राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्या निकटवर्तीयांमध्ये त्यांची गणना होते. उद्योगमंत्री सभाष देसाई हे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे जवळचे मानले जातात. उद्योगमंत्री म्हणून त्यांनी गेले सात वर्षे चांगले काम केले आहे. शिवसेनेत ज्येष्ठ असल्याने देसाई यांना आणखी एक संधी दिली जाईल अशी शक्यता आहे. विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांच्या विरोधात मुंबै बँक घोटाळ्यात गुन्हा दाखल झाला असला तरी देवेंद्र फडणवीस यांचे ते निकटवर्तीय मानले जातात. तसेच दरेकर यांच्या विरोधात आरोप झाल्यावर भाजपने त्यांचे समर्थन केले होते. भाजप बहुधा पुन्हा दरेकर यांना उमेदवारी देईल, अशीच चिन्हे आहेत.

भाजपच्या दोन जागा कमी होणार

भाजपचे सध्या सहा सदस्य होते. यापैकी रामनिवास सिंह यांचे अलीकडेच निधन झाल्याने ती जागा रिक्त आहे. भाजपचे पाच आमदार निवृत्त होत असून, चार उमेदवार निवडून येऊ शकतात. सुजितसिंह ठाकूर, विनायक मेटे, प्रसाद लाड आणि सदाभाऊ खोत यापैकी पुन्हा कोणाला संधी दिली जाते याची पक्षात उत्सुकता आहे. भाजपमध्ये चित्रा वाघ यांच्या नावाची चर्चा आहे.

निवृत्त होणारे सदस्य :

सभापती रामराजे नाईक निंबाळकर (राष्ट्रवादी)

उद्योगमंत्री सुभाष देसाई (शिवसेना)

विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर (भाजप)

दिवाकर रावते (शिवसेना)

सदाशिव खोत (भाजप)

विनायक मेटे (भाजप)

सुजितसिंह ठाकूर (भाजप)

प्रसाद लाड (भाजप)

संजय दौंड (राष्ट्रवादी)

एक जागा रिक्त

Story img Loader