Congress and AAP Alliance, Haryana Assembly Election: हरियाणा विधानसभा निवडणुकीला आता अवघे २५ दिवस उरले असताना इंडिया आघाडी एकत्रितपणे निवडणुकीला सामोरे जाणार नसल्याचे स्पष्ट झाले आहे. अनेक दिवस जागावाटपावर खलबते झाल्यानंतर अखेर आम आदमी पक्षाने सोमवारी (दि. ९ सप्टेंबर) २० उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली. ‘आप’ पक्षातील सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी आघाडीसाठी आग्रही असतानाही राज्यातील काँग्रेसच्या प्रभावशाली नेत्यांनी आघाडी होऊ नये, यासाठी आटोकाट प्रयत्न केले. तर काँग्रेसमधील सूत्रांनी सांगितले की, ‘आप’ला हव्या असलेल्या मतदारसंघावरून मतभेद असल्यामुळे आघाडीची चर्चा पुढे सरकू शकली नाही.

काँग्रेसचे ते प्रभावशाली नेते कोण?

हरियाणा विधानसभेचे विरोधी पक्षनेते भूपिंदरसिंह हुड्डा हे राज्यातील काँग्रेसचे प्रभावशाली नेते समजले जातात. हुड्डा हे सुरुवातीपासून काँग्रेस-‘आप’ आघाडीच्या विरोधात आहेत. एकाबाजूला काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी आघाडी करण्यासाठी अनुकूलता दाखवूनही राज्यातील नेत्यांनी आघाडी होऊ नये, यासाठी प्रयत्न केले. एवढेच नाही तर काँग्रेस पक्षश्रेष्ठींनी एक-दोन जागा समाजवादी पक्षाला देण्यास सांगितले होते, मात्र समाजवादी पक्षाशीही आघाडी होऊ शकलेली नाही.

हरियाणा विधानसभेसाठी आघाडीची चर्चा निष्फळ ठरल्यानंतर आता पुढील वर्षी होणाऱ्या दिल्ली विधानसभेसाठी इंडिया आघाडीतील दोन प्रमुख पक्ष आघाडी करणार का? असा प्रश्न आता निर्माण झाला आहे. हरियाणा विधानसभेसाठी काँग्रेस तिसरी तर ‘आप’ दुसरी यादी जाहीर करण्याची तयारी करत आहे.

‘आप’ने जाहीर केलेल्या पहिल्या यादीवर काँग्रेसने ठरवून मौन बाळगले आहे. काँग्रेसचे सरचिटणीस आणि हरियाणा निवडणुकीचे प्रभारी दीपक बाबरीया हे ‘आप’बरोबर आघाडीची चर्चा करत होते. ‘आप’ने यादी जाहीर केल्यापासून बाबरीया प्रकृती खालावल्यामुळे रुग्णालयात दाखल झाले आहेत.

‘आप’ने किती जागांचा प्रस्ताव दिला होता?

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, ‘आप’ने सुरुवातीला काँग्रेसकडे १० ते १५ जागांसाठीचा प्रस्ताव दिला होता. मात्र त्यानंतर पाच ते सात जागांवर लढण्याची तयारी दर्शविली होती. मात्र या जागा ‘आप’पक्षातर्फे ठरविल्या जातील, अशी त्यांची मागणी होती. मात्र पेहोवा, कलायत, जिंद, गुहला आणि सोहना हे ‘आप’ला हवे असलेले मतदारसंघ काँग्रेस सोडण्यास तयार नव्हते. काँग्रेसकडून आम्हाला तुलनेने दुबळ्या जागा देण्याचा प्रयत्न केला जात होता, असा दावा ‘आप’च्या नेत्यांनी केला आहे.

‘आप’कडून जागावाटपाची चर्चा राज्यसभेचे खासदार राघव चड्ढा यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळ करत होते. पण या चर्चेतून मार्ग निघू शकला नाही.

काँग्रेसच्या राज्यातील नेत्यांकडून आघाडीत खोडा

‘आप’नेत्याने नाव न उघड करण्याच्या अटीवर द इंडियन एक्सप्रेसशी बोलताना सांगितले की, राज्यातील काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांनी आघाडी होऊ नये यासाठी पुरेपूर प्रयत्न केले. आम्हाला हव्या असलेल्या जागा देण्यास त्यांनी पहिल्या दिवसापासून विरोध दर्शविला. त्यामुळे आम्हाला इतर जागांवरही तडजोड करता आली नाही. ते म्हणाले की, पेहोवा, कलायत आणि गुहला हे तीन मतदारसंघ कुरुक्षेत्र या लोकसभेच्या अंतर्गत येतात. जिथे आमच्या पक्षाची चांगली ताकद आहे. लोकसभा निवडणुकीत आमच्या उमेदवाराने या तीनही मतदारसंघात मताधिक्य मिळविले होते.