AAP defeat setback to Sharad Pawar and Uddhav Thackeray:आम आदमी पक्षाचा दिल्ली विधानसभा निवडणुकीत झालेला पराभव हा ‘आप’चे संयोजक अरविंद केजरीवाल यांच्यासह भाजपाच्या विरोधात लढण्याची तयारी करणाऱ्या शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांनाही धक्का मानला जातो. दिल्लीत भाजपाचा मोठा विजय झाल्यानंतर भाजपामध्ये आनंदाचे वातावरण तर आहेच, शिवाय महाराष्ट्र भाजपामध्येही आनंदोत्सव साजरा केला जात आहे. महाराष्ट्रात तशी ‘आप’ची फार ताकद नाही, पण शिवसेना (ठाकरे) पक्ष आणि राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) पक्षाला अरविंद केजरीवाल यांच्याकडून मोठी अपेक्षा होती. इंडिया आघाडीखाली तीनही पक्ष एकत्र आल्यानंतर केंद्रात आणि राज्यात भाजपाच्या विरोधात लढण्यासाठी त्यांनी एकजूट केली होती.
‘आप’चा महाराष्ट्राशी संबंध
अरविंद केजरीवाल यांचा २०११-१२ साली महाराष्ट्राशी संबंध आला. राळेगणसिद्धी येथील सामाजिक कार्यकर्ते अण्णा हजारे यांच्या नेतृत्वाखाली इंडिया अगेन्स्ट करप्शन या चळवळीची सुरुवात झाल्यानंतर अरविंद केजरीवाल त्याच्याशी जोडले गेले. दिल्लीतील रामलीला मैदानात आयोजित केलेल्या भ्रष्टाचार विरोधी आंदोलनातून लोकपाल विधेयकाचा मुद्दा पुढे करण्यात आला. या आंदोलनाच्या निमित्ताने अरविंद केजरीवाल, शांती भूषण, प्रशांत भूषण, किरण बेदी, मेधा पाटकर, स्वामी अग्निवेश, कर्नल देविंदर सेहरावत, हर्ष मंदार असे अनेक नेते एकत्र आले. एप्रिल २०११ मध्ये अण्णा हजारे यांनी लोकपाल विधेयकासाठी उपोषण सुरू केले.
अरविंद केजरीवाल आणि अण्णा हजारे यांनी एकेकाळी एकत्र काम केले असले तरी आज त्यांच्यात कोणतेही संबंध उरलेले नाहीत. एवढेच नाही तर अण्णा हजारेंनी २०२५ च्या निवडणुकीत ‘आप’विरोधात मतदान करण्याचे आवाहन केले होते. हरियाणा, महाराष्ट्र आणि आता दिल्लीमध्ये विजय मिळविल्यानंतर अण्णा हजारे यांनी केजरीवालांवर हल्लाबोल केला आहे. ते म्हणाले, राजकीय नेत्याने नेहमीच निस्वार्थी आणि प्रामाणिक असले पाहिजे. जर तुम्हाला जनतेचा पाठिंबा मिळवायचा असेल तर हे गुण असलेच पाहिजेत.
अरविंद केजरीवाल यांची वाटचाल
आयआयटी खरगपूर येथून पदवी संपादन केल्यानंतर अरविंद केजरीवाल यांनी भारतीय महसूल सेवेत प्रवेश केला. त्यानंतर नोकरी सोडून ते राजकारणात आले. भाजपाच्या राष्ट्रीय नेतृत्वाला आव्हान देणारा प्रादेशिक पक्ष अरविंद केजरीवाल यांच्या निमित्ताने पुढे आला. शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांनी अनेकदा अरविंद केजरीवाल यांना राजकीय सहकार्य केले, तर ‘आप’ने भाजपाविरोधी लढ्यात या दोघांची साथ दिली.
महाराष्ट्रात जेव्हा शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात फूट पाडली गेली तेव्हा भाजपावर हल्लाबोल करण्यासाठी ‘आप’चे दिल्ली आणि महाराष्ट्रातील नेते भाजपाविरोधात सरसावले होते. तसेच दिल्लीमधील प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या बदली आणि नियुक्तीचे अधिकार नायब राज्यपालांना देण्याचा अध्यादेश काढला गेला, तेव्हा अरविंद केजरीवाल यांनी मुंबईतील मातोश्री निवासस्थानी भेट देऊन उद्धव ठाकरेंचा पाठिंबा मागितला होता. तसेच शरद पवारांची भेट घेऊन त्यांचाही पाठिंबा मागितला. केंद्र सरकारकडून राज्य सरकारला नियंत्रित करण्याचा अध्यादेश काढण्यात आला आहे. याविरोधात सर्व भाजपाविरोधी पक्षांनी एकत्र येण्याचे आवाहन केजरीवाल यांनी केले होते.
अरविंद केजरीवाल यांना अटक झाल्यानंतर ‘आप’कडून दिल्ली येथे आयोजित केलेल्या आंदोलनात शिवसेना (ठाकरे) आणि राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) पक्षाने सहभाग नोंदविला होता. तसेच लोकसभा आणि महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीवेळी अरविंद केजरीवाल यांनी महाराष्ट्रात प्रचारसभा घेतल्या होत्या. इंडिया आघाडीच्या शिवाजी पार्कवरील सभेत ते सामील झाले होते. म्हणूनच दिल्लीमध्ये आम आदमी पक्षाचा पराभव झाल्यामुळे अरविंद केजरीवाल यांच्यासह शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांना धक्का बसला आहे.
दिल्लीतील निकालानंतर शिवसेनेचे (ठाकरे) नेते संजय राऊत म्हणाले, भाजपाने महाराष्ट्र पॅटर्न दिल्लीत राबविल्याचे दिसत आहे. केंद्रीय तपास यंत्रणांकडून अरविंद केजरीवाल यांना त्रास दिला गेला. त्यांच्या प्रमुख नेत्यांना तुरुंगात डांबले. तसेच दिल्लीत बनावट मतदार याद्या तयार केल्या गेल्या. मोदी आणि शाहांविरोधात उभ्या राहणाऱ्या प्रत्येक नेत्याला संपवायचे हाच त्यांचा फॉर्म्युला राहिला आहे, अशी टीका संजय राऊत यांनी केली होती.
यावर्षी महाराष्ट्रात मुंबई महानगरपालिकेसह स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होणार आहेत. या निवडणुका सोप्या असणार नाहीत याची उद्धव ठाकरेंना जाणी आहे. मुंबई आणि महाराष्ट्रात राजकीय नेतृत्व आणि पक्षाची छाप पुन्हा प्रस्थापित करण्यासाठी आगामी मुंबई मनपा निवडणूक ही शिवसेना (ठाकरे) गटासाठी करो या मरोची लढाई असणार आहे.