Congress vs AAP Gujarat: दिल्ली विधानसभा निवडणुकीत आम आदमी पक्ष आणि काँग्रेस या दोहोंचा पराभव झाला असला तरी गुजरातमधील काँग्रेससाठी ही आनंदाची बातमी आहे. मागच्या पाच वर्षांत गुजरातमधील राजकारणात उलथापालथ झाली. आम आदमी पक्षाने २०२० साली दिल्ली निवडणुकीत यश मिळवल्यानंतर गुजरात आणि गोव्यात गेल्या काही काळात त्यांनी आपला जनाधार वाढवला आहे. २०२२ सालच्या गुजरातच्या विधानसभा निवडणुकीत ‘आप’ने काँग्रेसला चांगलाच झटका दिला. त्याआधी २०२१ साली ‘आप’ने गुजरातच्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लढवून भाजपाला फायदा मिळवून दिला. सुरत महानगरपालिका निवडणुकीत १२० जागांपैकी ‘आप’ने २७ ठिकाणी विजय मिळविला; मात्र उर्वरित जागा भाजपाने जिंकल्या. काँग्रेसला स्वतःचे खातेही उघडता आले नाही.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

२०२२ च्या गुजरात विधानसभा निवडणुकीत ‘आप’चे राष्ट्रीय संयोजक अरविंद केजरीवाल यांनी जोरदार प्रचार केला होता. त्यांच्या पक्षाने राज्यातील १८२ जागांपैकी पाच जागा जिंकल्या आणि त्यांना १२.९२ टक्के मते मिळाली. काँग्रेसने १७ जागा जिंकल्या आणि त्यांना २७.२८ टक्के मते मिळाली. २०१७ च्या तुलनेत काँग्रेसच्या मतांमध्ये यावेळी मोठी घसरण झाली.

आप आणि काँग्रेसमध्ये मतांचे विभाजन झाल्यामुळे भाजपाच्या आमदारांची संख्या १५६ वर पोहोचली. २०१७ पेक्षा केवळ ३.४५ टक्के मते वाढूनही भाजपाला तब्बल ५७ अधिक जागा जिंकण्यात यश मिळाले. दुसरी विशेष बाब म्हणजे आम आदमी पक्षाच्या १२८ आणि काँग्रेसच्या ४१ उमेदवारांना आपले डिपॉझिटही गमवावे लागले. गुजरातमध्ये ‘आप’च्या एंट्रीमुळे काँग्रेसची ताकद इतकी घटली की, २०२२ च्या निवडणुकीनंतर गुजरातमधील विधानसभेत पुरेसे संख्याबळ नसल्यामुळे विरोधी पक्षनेतेपदही देण्यात आले नाही. तसेच मागच्या दोन वर्षांत ‘आप’चा एक आणि काँग्रेसच्या पाच आमदारांनी भाजपामध्ये प्रवेश केला.

२०२२ मधील विधानसभा निवडणुकीत काँग्रेसचा पराभव तर झालाच, त्याशिवाय मुस्लीम आणि आदिवासी समाजाच्या मतांमध्येही मोठी घट झाली. आम आदमी पक्षाचे गुजरातमधील आमदार चैतर वसावा हे आदिवासी समाजातील एक लोकप्रिय नेते असून ते देडीयापाडा मतदारसंघातून निवडून येतात. या मतदारसंघासह ते आजूबाजूच्या पाच मतदारसंघांवरही प्रभाव टाकतात. गुजरात काँग्रेसच्या सूत्रांच्या माहितीनुसार, २०२२ च्या विधानसभा निवडणुकीनंतर २०२४ च्या लोकसभा निवडणुकीत परिस्थिती आणखी चिघळली. लोकसभा निवडणुकीत आप आणि काँग्रेसची आघाडी झाली होती. भरूच आणि भावनगर हे दोन लोकसभा मतदारसंघ जागावाटपात ‘आप’कडे गेले. मात्र, दोन्ही ठिकाणी त्यांचा पराभव झाला.

भरूचमधील काँग्रेसच्या एका ज्येष्ठ नेत्याने सांगितले की, लोकसभेत काँग्रेस आणि आपची आघाडी झाली असली तरी मते मात्र एकमेकांकडे वळली नाहीत. उदाहरणच घ्यायचे झाल्यास, भरूच लोकसभा मतदारसंघासाठी आम्ही आपचे उमेदवार चैतर वसावा यांच्यासाठी प्रचार केला आणि १० महिन्यांनंतर आम्ही स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत ‘आप’विरोधात निवडणुका लढविणार आहोत. त्यामुळे मतदारांमध्ये गोंधळाची परिस्थिती निर्माण होते.

२०२० साली दिल्ली विधानसभा निवडणुकीत घवघवीत यश मिळविल्यानंतर आम आदमी पक्षाने गुजरातमध्ये जोरदार मुसंडी मारत पाटीदार समाजातील तरुणांना पक्षात प्रवेश दिला. काँग्रेस आणि भाजपाला पर्याय शोधणारे अनेक तरुण त्यावेळी ‘आप’मध्ये सामील झाले. पाटीदार अनामत आंदोलन समितीमधील जवळपास डझनभर नेत्यांना आपने प्रवेश दिला. पाटीदार आंदोलनाची चळवळ हार्दिक पटेलने सुरू केली होती. २०२० साली हार्दिक पटेल काँग्रेसचा कार्याध्यक्ष होता. त्यानंतर त्याने भाजपामध्ये प्रवेश केला. मागच्या तीन वर्षांत पाटीदार समाजातील प्रमुख नेत्यांनी भाजपाची वाट धरली आहे.

गुजरातमध्ये पारंपरिकरीत्या दोन पक्षांमध्ये प्रमुख स्पर्धा पाहायला मिळते. समाजवादी पक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष व बहुजन समाज पक्ष यांनी अनेक वेळा प्रयत्न करूनही त्यांना जम बसवता आलेला नाही. तर दुसरीकडे ‘आप’ला जमिनीवरील कार्यकर्ते आणि संघटनबांधणीमध्ये म्हणावे तसे यश आलेले नाही. तथापि, दिल्लीमधील पक्षाच्या यशामुळे काही नेत्यांना राष्ट्रीय पातळीवर प्रसिद्धी मिळाली. या प्रसिद्धीचा फायदा गुजरातमध्येही झाला. दिल्लीमधील सत्ता गेल्यानंतर आता पंजाबमध्येही आप सरकार डळमळीत असल्याचे बोलले जाते. त्यामुळे ‘आप’ला आगामी काळात गुजरातमध्येही अपयश मिळेल, असे काँग्रेसला वाटते.