३ मे २०२३ रोजी ईशान्येकडील मणिपूर राज्यात वांशिक हिंसाचार उसळला. तेव्हापासून राज्यात तणावाची परिस्थिती आहे. राज्यातील स्थिती अजूनही सुधारलेली नाही. यावरून मणिपूरचे मुख्यमंत्री एन. बिरेन सिंह यांच्यावर अनेकदा टीकाही करण्यात आली. रविवारी (९ फेब्रुवारी) मणिपूरचे मुख्यमंत्री एन. बिरेन सिंह यांनी दिल्लीला जाऊन गृहमंत्री आणि भाजपाचे ज्येष्ठ नेते अमित शाह यांची भेट घेतली.
दोन तासांच्या बैठकीनंतर सिंह यांना राजीनामा देण्यास सांगण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली. त्यांच्या भेटीनंतर सिंह रविवारी दुपारी २ च्या सुमारास इम्फाळला परतले आणि त्यानंतर ५.३० च्या सुमारास त्यांनी नवनियुक्त राज्यपाल अजय कुमार भल्ला यांच्याकडे राजीनामा सुपूर्द केला. परंतु, मणिपूरमध्ये उसळलेल्या वांशिक हिंसाचाराबद्दल टीका आणि विरोधाचा सामना केल्यानंतर तब्बल दीड वर्षांनी मुख्यमंत्र्यांनी राजीनामा का दिला, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. त्यामागील कारणे जाणून घेऊ.
बिरेन सिंह यांचा राजीनामा
रविवारी बिरेन सिंह यांनी इम्फाळ येथील राजभवनात राज्यपाल अजय कुमार भल्ला यांच्याकडे राजीनामा सुपूर्द केला. राज्यपालांनी सिंह यांचा राजीनामा स्वीकारला. राजीनाम्याच्या पत्रात सिंह यांनी लिहिले की, “आतापर्यंत मणिपूरच्या लोकांची सेवा करणे ही सन्मानाची गोष्ट राहिली आहे. प्रत्येक मणिपुरीच्या हिताचे रक्षण करण्यासाठी वेळोवेळी केलेल्या कृती, हस्तक्षेप, विकासात्मक कार्ये आणि विविध प्रकल्पांच्या अंमलबजावणीसाठी मी केंद्र सरकारचा अत्यंत आभारी आहे.” त्यांनी पुढे म्हटले, “केंद्र सरकारला माझी प्रामाणिक विनंती आहे की त्यांचे कार्य त्यांनी असेच चालू ठेवावे.” सिंह यांनी त्यांच्या राजीनाम्याच्या पत्रात केंद्राला सीमेवरील घुसखोरीवर कारवाई सुरू ठेवण्याची आणि बेकायदा स्थलांतरितांच्या हद्दपारीसाठी, तसेच ड्रग्ज व नार्को दहशतवादाविरुद्धच्या लढाईसाठी धोरण तयार करण्याची विनंती केली आहे.
![](https://www.loksatta.com/wp-content/uploads/2025/02/biren-singh-resignation-.jpg?w=830)
बिरेन सिंह यांनी राजीनामा का दिला ?
बिरेन सिंह सिंह यांनी राज्यातील हिंसाचार ज्या पद्धतीने हाताळला, त्यामुळे भाजपा आमदारांचा पाठिंबा गमावला होता. सिंह यांना त्यांच्या पक्षातूनच विरोधाचा सामना करावा लागत आहे; ज्यामुळे काही असंतुष्ट आमदारांनी वारंवार आपली नाराजी व्यक्त केली आहे. उदाहरणार्थ बिरेन सिंह यांचे जोरदार टीकाकार असलेले स्पीकर थोकचोम सत्यब्रत सिंह यांनी गेल्या आठवड्यात दिल्लीला भेट दिली आणि भाजपा अध्यक्ष जेपी नड्डा यांची भेट घेतली. बैठकीत थोकचोम सत्यब्रत सिंह यांनी अविश्वास प्रस्तावाची माहिती दिली, हा प्रस्ताव काँग्रेस मुख्यमंत्र्यांच्या विरोधात आणणार होता. इंडियन एक्स्प्रेसने एका सूत्राने दिलेल्या माहितीनुसार सांगितले की, हा प्रस्ताव ते फेटाळून लावतील का असे सत्यब्रत सिंह यांना विचारले असता ते म्हणाले की, ते हा प्रस्ताव थांबवू शकणार नाहीत.
पण, बिरेन सिंह यांच्या विरोधात मत व्यक्त करणारे थोकचोम सत्यब्रत सिंह एकटे नव्हते. याआधी ३ फेब्रुवारीला मणिपूरचे ग्रामीण विकास आणि पंचायती राज मंत्री युमनम खेमचंद सिंह यांनीदेखील मुख्यमंत्र्यांविरोधात नाराजी व्यक्त केली होती. बिरेन सिंह यांची बदली न झाल्यास सरकार कोसळेल, असा इशारा त्यांनी भाजपाच्या सर्वोच्च नेतृत्वाबरोबरच्या बैठकीत दिला होता. सोमवारी अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू होताच काँग्रेसने अविश्वास प्रस्ताव आणला तेव्हा भाजपाचे आमदार बिरेन सिंह यांना पाठिंबा देणार नाहीत हे लक्षात आल्याने भाजपाने सिंह यांना पायउतार होण्यास सांगितले.
![](https://www.loksatta.com/wp-content/uploads/2025/02/manipur-violence.jpg?w=830)
मणिपूर विधानसभेत भाजपाकडे ३७ आमदार असून त्यांचा मित्रपक्ष नागा पीपल्स फ्रंट (५) आणि जेडीयूकडे एक आमदार आहे. दरम्यान, विरोधी पक्षाकडे १६ जागा आहेत. त्यात नॅशनल पीपल्स पार्टीकडे सहा, काँग्रेसकडे पाच, तीन अपक्ष आणि दोन जागा केपीएकडे. पक्षाच्या अंतर्गत सूत्रांचा असा विश्वास होता की, ३७ पैकी सुमारे १२ आमदार सिंह यांच्या हकालपट्टीसाठी दबाव आणत होते. त्यामुळे भाजपाची स्थिती असुरक्षित होईल, असे लक्षात येताच पक्षाने त्यांना पायउतार होण्यास सांगितले. परंतु, मणिपूर भाजपाच्या प्रमुख ए. शारदा देवी यांनी पत्रकारांना सांगितले की, मुख्यमंत्र्यांचा निर्णय राज्याच्या अखंडतेचे रक्षण करण्यासाठी आणि सार्वजनिक कल्याण लक्षात घेऊन घेण्यात आला आहे. “२०१७ पासून, बिरेन सिंह मणिपूरच्या विकासासाठी अथक परिश्रम करत आहेत. त्यांचा राजीनामा राज्याच्या अखंडतेचे रक्षण करण्याची त्यांची सखोल वचनबद्धता दर्शवितो,” असे त्या म्हणाल्या.
परंतु, बिरेन सिंह यांना राजीनामा देण्यास भाग पाडण्यामागे त्यांच्या पक्षाचा पाठिंबा कमी होणे हे एकमेव कारण नाही. सर्वोच्च न्यायालयाने सेंट्रल फॉरेन्सिक सायन्स लॅबोरेटरी (CFSL) कडून लीक झालेल्या ऑडिओ टेप्सचा अहवालदेखील मागवला आहे; ज्यामध्ये राज्यातील चालू असलेल्या वांशिक हिंसाचारात बिरेन सिंह यांचा कथित सहभाग असल्याचे सांगण्यात आले आहे. कुकी ऑर्गनायझेशन फॉर ह्युमन राइट्स ट्रस्टने दाखल केलेल्या रिट याचिकेच्या आधारे ही कारवाई करण्यात आली आहे; ज्यामध्ये २०० हून अधिक लोकांचा मृत्यू झाला आहे. अशा हिंसाचारात सिंह यांच्या कथित भूमिकेची स्वतंत्र चौकशी करण्याची मागणी करण्यात आली आहे; यामुळे सिंह यांच्या मणिपूरच्या मुख्यमंत्रिपदाच्या भवितव्याबाबतही प्रश्नचिन्ह निर्माण झाल्याचे सांगितले जाते.
काँग्रेसचे आरोप
बिरेन सिंह यांनी राजीनामा दिल्यानंतर काही वेळातच काँग्रेसचे जयराम रमेश म्हणाले की, काँग्रेस अविश्वास प्रस्ताव आणणार आहे आणि वातावरण लक्षात घेऊन बिरेन सिंह यांनी राजीनामा दिला. विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनीही यावर बोलताना मणिपूरचे मुख्यमंत्री बिरेन सिंह यांनी जनता, सर्वोच्च न्यायालय आणि काँग्रेस यांच्या वाढत्या दबावामुळे राजीनामा दिल्याचे सांगितले. त्यांनी पुढे बिरेन सिंह यांच्यावर मणिपूरमधील वातावरण भडकावल्याचा आरोप केला. “मुख्यमंत्री बिरेन सिंह यांच्या राजीनाम्यामुळे हे दिसून येते की वाढता सार्वजनिक दबाव, सर्वोच्च न्यायालयाचा तपास आणि काँग्रेसच्या अविश्वास प्रस्तावामुळे त्यांनी राजीनामा दिला,” असे गांधी पुढे म्हणाले.
पुढे काय?
बिरेन सिंह यांनी मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा दिल्यानंतर लगेचच मणिपूरमध्ये राष्ट्रपती राजवट लागू होईल अशी अटकळ पसरली होती. परंतु, राज्यपालांच्या सचिवालयाने सांगितले की बिरेन सिंह यांना पर्यायी व्यवस्था होईपर्यंत पदावर राहण्यास सांगितले आहे. मणिपूर विधानसभेचे अधिवेशन सोमवार (१० फेब्रुवारी) पासून सुरू होणार होते, ते तात्काळ स्थगित करण्यात येत असल्याचे घोषित करण्यात आले होते. “भारतीय राज्यघटनेच्या कलम १७४ च्या कलम (१) द्वारे प्रदान केलेल्या अधिकारांचा वापर करून, मणिपूरचा राज्यपाल म्हणून मी अजय कुमार भल्ला, याद्वारे आदेश देतो की, १२ व्या मणिपूर विधानसभेचे सातवे अधिवेशन तात्पुरते स्थगित करण्यात येत आहे,” असे तात्काळ नोटीसद्वारे व्ही मीडियाद्वारे घोषित केले गेले.
मणिपूर २०२३ पासून हिंसाचाराच्या विळख्यात अडकले आहे. सरकारी आकडेवारीनुसार ३ मे २०२४ पर्यंत हिंसाचारात २२१ लोक मारले गेले आहेत आणि ६० हजार लोक विस्थापित झाले आहेत. बहुसंख्य मैतेई आणि अल्पसंख्याक कुकी गटांमधील हिंसाचार सुरू असताना सामूहिक बलात्कारानंतर दोन महिलांना नग्न करून परेड केल्याचा व्हिडीओ समोर आला होता. सिंह यांच्या राजीनाम्यामुळे राज्यात शांतता प्रस्थापित होण्याचा मार्ग मोकळा होईल का हे पाहणे आता महत्त्वाचे ठरणार आहे.