अयोध्येतील बहुप्रतिक्षित राम मंदिराचे उदघाटन पुढील वर्षी जानेवारी महिन्यात होणार आहे. आगामी लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने भाजपासाठी मंदिराच्या उदघाटनाचे अनन्यसाधारण महत्त्व आहेच, पण त्याआधीच उत्तर प्रदेशच्या शेजारी असलेल्या मध्य प्रदेश राज्यातही राम मंदिराचा मुद्दा कामी येत आहे. मध्य प्रदेशमध्ये १७ नोव्हेंबर रोजी विधानसभेसाठी मतदान होणार आहे. सत्ताधारी भाजपाच्या विरोधात जनतेची नाराजी (अँटी-इन्कम्बन्सी) आणि काँग्रेसचे मोठे आव्हान उभे राहिले आहे. अशा परिस्थितीत भाजपाने निवडणूक प्रचारात पुन्हा एकदा राम मंदिराचा विषय आणला आहे.
मागच्या आठवड्यात श्री राम जन्मभूमी तीर्थक्षेत्राकडून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना मंदिराच्या अभिषेक कार्यक्रमासाठी निमंत्रित करण्यात आले होते. हा कार्यक्रम पुढील वर्षी २२ जानेवारी रोजी नियोजित होता. कार्यक्रमाचे निमंत्रण मिळाल्याच्या दुसऱ्याच दिवशी मध्य प्रदेशच्या अनेक भागांत ‘भव्य राम मंदिर’ निर्माणाचे मोठे होर्डिंग्ज लागले. या होर्डिंग्जवर भाजपा सरकार पुन्हा सत्तेत येणार असल्याचे सांगण्यात आले. राम मंदिराची प्रतिमा, त्यासोबत पंतप्रधान नरेंद्र मोदी, भाजपा अध्यक्ष जे. पी. नड्डा, मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान आणि मध्य प्रदेश भाजपाचे अध्यक्ष व्ही. डी. शर्मा यांचेही फोटो होर्डिंग्जवर दिसत होते.
हे वाचा >> मध्य प्रदेशमध्ये नेत्यांच्या राजीनामा अस्रामुळे भाजपा आणि काँग्रेस हैराण; तिकीट नाकारल्यामुळे नाराजी
फक्त होर्डिंग्जवरच नाही, भाजपा नेत्यांच्या भाषणातही राम मंदिराचा विषय चर्चेत आहे. शुक्रवारी (दि. २७ ऑक्टोबर) पंतप्रधान मोदी यांची चित्रकूट येथे सभा झाली. आमच्या काळात राम मंदिराचे बांधकाम पूर्णत्वास जात असल्याचा आणि अभिषेक करण्यासाठी मला निमंत्रित केल्याबद्दल आनंद वाटत आहे, असे यावेळी मोदी म्हणाले. दुसऱ्याच दिवशी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी काँग्रेसने राम मंदिराच्या निर्माणात अडथळे आणल्याचा आरोप केला.
“२०१९ साली मध्य प्रदेशच्या जनतेने पंतप्रधान मोदी यांना दुसऱ्यांदा मोठ्या फरकाने जिंकून दिले आणि त्यानंतर मोदींनी राम मंदिराची पायाभरणी केली. २२ जानेवारी रोजी मंदिराचे उदघाटन होणार आहे. मी जेव्हा भाजपाचा अध्यक्ष होतो, तेव्हा राहुल बाबा (काँग्रेस नेते राहुल गांधी) यांनी ‘मंदिर वही बनायेंगे, पर तिथी नही बतायेंगे’ असा नारा देऊन मंदिर निर्माणाची हेटाळणी केली होती. आता आम्ही मंदिरही बांधले आहे आणि उदघाटनाची तारीखही सांगितली आहे. आता राहुल गांधी यांनी तिथे जाऊन दर्शन घ्यावे”, अशी टिप्पणी अमित शाह यांनी छिंदवाडा जिल्ह्यातील जुन्नरदेव येथे भाषण करताना केली. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष कमलनाथ यांचा हा बालेकिल्ला समजला जातो. अमित शाह यांनी उज्जैन येथेही याच मुद्द्यावर आपल्या भाषणाचा रोख ठेवला.
हे वाचा >> Madhya Pradesh : माजी संघ प्रचारकांनी केली ‘जनहित’ पक्षाची स्थापना, भाजपाविरोधात निवडणुकीत उतरणार
काँग्रेसकडूनही पलटवार
काँग्रेसने सौम्य हिंदुत्वाचा पुरस्कार करण्याची रणनीती आखल्यानंतर भाजपाकडून राम मंदिराचा विषय पुढे करण्यात येत आहे. काँग्रेसने १७ ऑक्टोबर रोजी आपला जाहीरनामा प्रसिद्ध केला, ज्यात काँग्रेसने “श्री राम वन गमन पथ” मार्गाचा विकास आणि श्रीलंकेतील सीता मंदिराचे निर्माण करण्याचे आश्वासन दिले आहे. चित्रकूट येथे श्रीराम यांचे मित्र निशाद केवताज यांचा पुतळा उभारण्याचेही आश्वासन काँग्रेसने जाहीरनाम्यात दिले आहे.
काँग्रेस नेते कमलनाथ यांनी विजयादशमीच्या दिवशी एक्स (जुने ट्विटर) या सोशल मीडिया साईटवर एका पोस्टमध्ये लिहिले, “जा पर क्रिपा राम की होई, ता पर क्रिपा करे सब कोई.” श्रद्धा आणि संस्कृतीच्या बाबतीत काँग्रेस सरकार कोणतीही कसर सोडणार नाही, हे जनतेला आश्वस्त करण्यासाठी काँग्रेसकडून हरएक प्रकारे प्रयत्न सुरू आहेत. छिंदवाडा येथून उमेदवारी अर्ज भरण्यासाठी जात असताना स्वतःला हनुमान भक्त म्हणवणाऱ्या कमलनाथ यांनी स्थानिक राम मंदिरात जाऊन दर्शन घेतले.
शनिवारी (दि. २८ ऑक्टोबर) रोजी व्ही. डी. शर्मा यांनी म्हटले की, राम, हिंदुत्व आणि सनातन धर्म यांच्या विरोधात काँग्रेसची रणनीती राहिली आहे आणि निवडणुकीच्या प्रचारात आता ही बाब समोर येत आहे. राम मंदिराच्या बाबत लावलेले होर्डिंग्ज काढून टाकण्यासाठी काँग्रेसने निवडणूक आयोगाकडे तक्रार दाखल केली आहे. हे काँग्रेसचे मूळ चरित्र आहे. तसेच शर्मा यांनी काँग्रेस नेते के. के. मिश्रा यांच्या एका वक्तव्याचा दाखला देऊन काँग्रेसवर टीका केली. मिश्रा यांनी बाबरी मशिदीच्या पतनावर भाष्य केले होते. या विधानाचा धागा पकडून शर्मा म्हणाले की, काँग्रेस पक्षाच्या नेत्यांची भाषा हे सिद्ध करते की, ते बाबर भक्तीमध्ये तल्लीन झाले आहेत.
आणखी वाचा >> मध्य प्रदेशात दोन दशकांचे वर्चस्व टिकवण्यासाठी भाजपची धडपड
काँग्रेस नेते मिश्रा यांनी सांगितले की, राम मंदिराबाबतच्या तक्रारी काँग्रेस पक्षाने केलेल्या नसून काही व्यक्तींनी या तक्रारी केलेल्या आहेत. भाजपाकडून राम मंदिराचे राजकारण होत असल्याचा आरोपही त्यांनी केला. आज बेरोजगारी, युवक, शेतकरी, महिला सुरक्षा, कायदा व सुव्यवस्था यांसारखे अनेक मूलभूत प्रश्न असताना भाजपाचे नेते अजूनही मंदिर, मशीद, स्मशान, कबरीस्तान, हमास आणि हिजाब याच मुद्द्यावर निवडणूक लढवत आहेत.