महेश सरलष्कर
नवी दिल्ली : नव्या राष्ट्रपतींची निवड बिनविरोध व्हावी, यासाठी भाजप प्रयत्नशील असून त्यासाठी केंद्रीय संरक्षणमंत्री राजनाथ सिंह व भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा यांनी विरोधी पक्षांच्या नेत्यांशी संपर्क साधला. पण, या संवाद प्रक्रियेतून राष्ट्रपती पदाची निवडणूक जिंकणे भाजपसाठी सहजसोपे नसल्याचे चित्र निर्माण झाले आहे. विरोधी पक्षांनी वादग्रस्त नसलेला व सर्वसंमत उमेदवार रिंगणात उतरवला तर, कुंपणावर बसलेले प्रादेशिक पक्ष भाजपच्या बाजूने कौल देतीलच असे नाही, यांची जाणीव भाजप नेत्यांना होत असल्यानेच बिनविरोधसाठी धडपड सुरू झाली आहे.
तृणमूल काँग्रेसने बोलावलेल्या बैठकीला तेलंगणा राष्ट्र समिती (टीआरएस), आम आदमी पक्ष, वायएसआर काँग्रेस, शिरोमणी अकाली दल आणि बिजू जनता दल हे पक्ष गैरहजर राहिले. त्यापैकी चार पक्षांनी काँग्रेसविरोधामुळे बैठकीला न येण्याचा निर्णय घेतला होता. नवीन पटनायक यांच्या बिजू जनता दलाने ‘’मन की बात’’ अजून उघड केलेली नाही. हा पक्ष कदाचित भाजपला मत देईल असे मानले जाते. पण, काँग्रेसने राष्ट्रपतीपदासाठी उमेदवार न देण्याचे ठरवले असून शरद पवार आणि मल्लिकार्जुन खरगे यांच्याशी चर्चा करून विरोधकांचा सर्वसंमत उमेदवार निवडला जाणार आहे. त्यामुळे आता असलेला काँग्रेसविरोध मावळू शकतो. शिवाय, आपापल्या राज्यांमध्ये एकमेकांच्या विरोधात लढलो पण, देशहितासाठी सहमतीचा उमेदवार निवडण्याचे आवाहन काँग्रसने टीआरएस, आप आदी पक्षांना केले आहे.
शरद पवारांनी विरोधकांची विनंती मान्य केली असती तर, भाजपसाठी राष्ट्रपतीपदाची निवडणूक चुरशीची झाली असते. तरीही, गोपालकृष्ण गांधी किंवा भाजपलाही मान्य होईल असा उमेदवार विरोधकांनी निवडला तर, भाजपच्या राष्ट्रीय लोकशाही आघाडीत (एनडीए) असलेला नितीश कुमार यांचा जनता दल (सं) व अण्णा द्रमुक या प्रादेशिक पक्षांकडूनही बिगरभाजप पक्षांच्या उमेदवाराला विरोध होण्याची शक्यता कमी होते. बिजू जनता दल व वायएसआर काँग्रेस या दोन पक्षांच्या ३०-३५ हजार मतमूल्यांच्या आधारे भाजपचा उमेदवार सहज जिंकून येऊ शकतो. पण, विरोधकांच्या सर्वसंमत उमेदवाराला या दोन पक्षांचा विरोध नसेल तर, त्यांची मते भाजपला मिळणारच असे नाही. मग, टीआरएस व आपसारख्या पक्षांवरही विरोधकांच्या उमेदवाराला मत देण्याचा दबाव वाढू शकतो.
भाजपकडे बहुमतासाठी दोन ते अडीच टक्के मतमूल्यांची गरज लागेल. पण, भाजप आणि नितीशकुमार यांच्यातील मतभेद चव्हाट्यावर आलेले आहेत. नितीशकुमार यांची मनधरणी करण्यासाठी स्वतः राजनाथ सिंह यांनी फोन केला होता. ओडिशामध्ये बिजू जनता दलाच्या सत्तेला भाजप धक्का देऊ लागला आहे. तिथे काँग्रेस नव्हे तर, भाजप प्रमुख विरोधक असेल. वायएसआर काँग्रेसचे प्रमुख जगनमोहन रेड्डी यांचा प्रखर काँग्रेसविरोध जगजाहीर असला तरी, ममता बॅनर्जी तसेच शरद पवार हे दोघे ज्येष्ठ नेते प्रादेशिक पक्षांशी संवाद साधून त्यांचे मन वळवण्याचा प्रयत्न करणार आहेत. विरोधकांच्या बैठकीला कधी नव्हे ते समाजवादी पक्ष, पीडीपी असे प्रादेशिक पक्ष एकाच व्यासपीठावर आले होते. त्यामुळे विरोधकांनी भाजपला तगडी टक्कर देण्याचा निर्धार केल्याचे दिसते.
जनता दल (सं), अण्णा द्रमुक हे एनडीएतील घटक पक्ष तसेच, वायएसआर काँग्रेस, बिजू जनता दल आणि तेलंगण राष्ट्र समिती यांच्यासारख्या प्रादेशिक पक्षांच्या मदतीने राष्ट्रपतीपदाची निवडणूक जिंकण्याचे भाजपचे गणित आहे. तरी, केंद्रातील सत्ताधारी पक्षाला प्रादेशिक पक्षांसंदर्भात धोका पत्करून निवडणूक अवघड करायची नाही. त्यामुळे शक्य झाल्यास प्रमुख विरोधी पक्षांच्या नेत्यांशी संवाद साधून राष्ट्रपतीपदावर बिनविरोध निवड करण्यासाठी भाजपने पाऊल उचलले आहे. पण, भाजपने ‘’एनडीए’’चा उमेदवार गुलदस्त्यात ठेवल्यामुळे विरोधकांनी अपेक्षित प्रतिसाद दिलेला नाही.