१९८५ च्या विधानसभा निवडणुकीत नगर जिल्ह्यातील संगमनेर मतदारसंघातून बाळासाहेब थोरात यांनी काँग्रेसकडे उमेदवारी मागितली होती. पण, पक्षाने पुण्यातील शंकुतला थोरात यांना उमेदवारी दिली. या विरोधात बाळासाहेब आणि त्यांचे वडिल भाऊसाहेब थोरात यांनी मुंबई गाठली. तत्कालीन मुख्यमंत्री वसंतदादा पाटील यांनी दिल्लीत प्रयत्न करतो, असे सांगितले. शेवटी दोघांच्या उमेदवारीचा प्रश्न शिल्लक राहिला. वर्ध्याच्या बापूसाहेब देशमुख यांना उमेदवारी मिळाली. बाळासाहेब थोरात यांना उमेदवारी मिळाली नाही. वडील भाऊसाहेब थोरात यांनी पक्षाचा आदेश पाळत माघार घेण्याची सूचना केली. पण, मतदारसंघातील कार्यकर्त्यांचा आग्रह कायम राहिल्याने बाळासाहेब अपक्ष लढले आणि निवडून आले. लगेचच काँग्रेसमध्ये सहभागी झाले. तेव्हापासून बाळासाहेबांनी काँग्रेसविरोधात हू की चू केलेले नाही.
१९९९ मध्ये शरद पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेसची स्थापना केली. तेव्हा राज्यातील बडे काँग्रेस नेते पवारांबरोबर गेले. बाळासाहेब थोरात यांच्या नावाची चर्चा होती. पण, शरद पवार यांच्याबरोबर वैयक्तिक संबंध उत्तम असले, तरी काँग्रेस पक्ष सोडला नाही. कायम काँग्रेस पक्षाशी एकरूप झालेल्या बाळासाहेबांनी कधीच काँग्रेस विचारापासून फारकत घेतली नाही. पक्षाने सोपविलेली जबाबदारी विनातक्रार पार पाडली. कधी वाद नाही वा कधी गोंधळ नाही. २०१७ मध्ये राहुल गांधी यांनी गुजरातमधील काँग्रेस उमेदवार निवडण्याच्या छाननी समितीचे अध्यक्षपद बाळासाहेबांकडे सोपविले होते. बाळासाहेबांनी सर्वेक्षण व विविध पातळ्यांवर आढावा घेऊन उमेदवारांची यादी तयार करून पक्षाला सादर केली होती. गुजरातमध्ये तेव्हा पक्षाचे ८१ आमदार निवडून आले. उमेदवार निश्चित करताना जास्त गोंधळ झाला नाही, याबद्ल राहुल गांधी यांनी जाहीरपणे बाळासाहेबांच्या कामगिरीचे कौतुक केले होते.
हेही वाचा – “…तर घुमट आणि निजामाच्या सर्व वास्तू नष्ट करू”, भाजपा नेत्याचं खळबळजनक विधान
नगर जिल्ह्याच्या राजकारणात थोरात आणि विखे-पाटील यांच्यातील वाद जगजाहीर होता. उभयता परस्परांवर कुरघोडी करण्याची संधी सोडत नसतात. विखे-पाटील हे तर थोरात यांच्या मागे हात धुवून लागले होते. पण, थोरात यांनी या वादावर कधीही जाहीरपणे वाच्यता केली नाही. आपण काम करीत राहायचे, असे त्यांचे नेहमी म्हणणे असायचे. १९९९ मध्ये राज्यमंत्री म्हणून निवड. २००३ मध्ये मंत्रिमंडळातून वगळण्यात आले, पण त्याबद्दल काहीही चकार शब्द नाही. अन्य काही मंत्र्यांनी वगळल्याबद्दल नाराजी व्यक्त केली होती. २००४ ते २०१४ आणि २०१९ ते जून २०२२ कायम मंत्रिपदी. महसूल, कृषी, शालेय शिक्षणसारखी महत्त्वाची खाती वाट्याला आली. खात्यावरून कधी तक्रार नाही.
नाशिक पदवीधर मतदारसंघातील गोंधळावरून पक्षाच्या नेत्यांनी व विशेषतः प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी बाळासाहेबांना अडचणीत आणण्याची जी खेळी केली त्यामुळे थोरात चांगलेच संतापले. त्यांनी पटोले यांच्याबरोबर काम करणे शक्य नसल्याचे पक्षाध्यक्ष खरगे यांना पत्र पाठवून विधिमंडळ पक्षनेतेपदाचा राजीनामा सादर केला. थोरात यांची नाराजी दूर करण्याकरिता पक्षाचे राज्याचे प्रभारी एच. के. पाटील हे उद्या, रविवारी मुंबईत दाखल होत आहेत. थोरात यांचा एकूण स्वभाव लक्षात घेता ते फारसे ताणणार नाहीत, अशी चिन्हे आहेत.
नाशिक पदवीधर मतदारसंघातील निवडणुकीवरून थोरात कुटुंबियात बेबनाव निर्माण झाला. बाळासाहेबांचे भाचे आणि प्रदेश युवक काँग्रेसचे माजी अध्यक्ष सत्यजित तांबे हे इच्छुक होते. परंतु, पक्षाने तांबे यांचे वडील आणि विद्ममान आमदार सुधीर तांबे यांनाच उमेदवारी दिली. आमदार तांबे माझ्याऐवजी मुलाला उमेदवारी द्या, असे सांगत असतानाही पक्षाने त्यांनाच उमेदवारी दिली. तेथूनच सारे रामायण घडले. पक्षांतर्गत घडामोडींवर कधीही व्यक्त न होणाऱ्या बाळासाहेबांनी एकदम टोकाची भूमिका का घेतली असावी, असा पक्षांतर्गत नेत्यांनाही प्रश्न पडला आहे.
नगर जिल्हा काँग्रेस अध्यक्षावर, तसेच कार्यकारिणीवर कारवाई केल्याने बाळासाहेब थोरात अधिकच दुखावले. सत्यजित यांनी अपक्ष अर्ज भरल्यावरही त्यांनी दिलगिरी व्यक्त करून काँग्रेसने पाठिंबा जाहीर करायचा हे ठरले असतानाही सुधीर तांबे यांना पक्षातून निलंबित करण्यात आल्याने पक्ष नेतृत्वावर थोरात संतापले. आता त्यांची नाराजी दूर करण्याचा प्रयत्न होत आहे. थोरात यांची नाराजी चहाच्या पेल्यातील वादळ ठरेल, अशीच पक्षात प्रतिक्रिया व्यक्त केली जाते.