चंद्रशेखर बोबडे

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

नागपूर: स्वातंत्रपूर्व काळात म्हणजे २६ डिसेंबर १९२० मध्ये नागपूरमध्ये झालेल्या काँग्रेसच्या अधिवेशनाने पक्षाला नवचैतन्य मिळाले होते. त्यातून स्वातंत्र्याच्या चळवळीला बळ मिळत गेले. एका शतकाहून अधिक काळानंतर म्हणजे २८ डिसेंबर रोजी नागपूरमध्येच काँग्रेसच्या स्थापना दिनानिमित्त जाहीर सभा आयोजित करण्यात आली आहे. ही सभा काँग्रेसला नवचैतन्य देणार की तिचे स्वरुप गर्दी गोळा करण्या इतकेच राहणार हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.

एकेकाळी काँग्रेसचा बालेकिल्ला अशी ओळख असलेल्या विदर्भात २८ डिसेंबरला नागपुरात अ.भा. काँग्रेस समितीने पक्षाचा स्थापना दिन साजरा करण्याचे ठरवले असून यानिमित्ताने पक्ष जोरदार शक्तिप्रदर्शन करणार आहे. जाहीर सभेत पक्षाध्यक्ष मल्लिकार्जून खरगे यांच्यासह पक्षाच्या नेत्या सोनिया गांधी, राहुल गांधी यांच्यासह काँग्रेस शासीत राज्यांचे मुख्यमंत्री आणि देशभरातील सर्व प्रमुख नेते उपस्थित राहणार आहेत. काँग्रेस पक्षाने नागपूरची निवड करून लोकसभा निवडणुकीपूर्वी वेगळा संदेश दिला आहे.

हेही वाचा… अकोला जिल्ह्यात ‘वंचित’ची वीण अधिक घट्ट

स्वातंत्र्यपूर्व काळात नागपूरमध्ये झालेल्या अ.भा. काँग्रेस समितीच्या अधिवेशनाने पक्षाला नवी घटना दिली होती. त्यामुळे पक्षाचा गावपातळीवर विस्तार होऊन तळागाळापर्यंत पोहचण्यास मदत झाली होती. याचा परिणाम देशभर काँग्रेस मजबूत होण्यात झाला. तसाच विदर्भातही पक्षाची पाळेमुळे खोलवर पोहचली होती व त्यामुळे अनेक वर्षे विदर्भ हा काँग्रेसचा बालेकिल्ला म्हणून ओळखला जात होता. आणीबाणीनंतर झालेल्या निवडणुकीत देशभर इंदिरा काँग्रेसचा पराभव झाला तरी विदर्भात मात्र पक्ष इंदिरा गांधी यांच्या पाठीशी भक्कमपणे उभा राहिला होता. नव्वदच्या दशकानंतर हळूहळू काँग्रेसची पकड या भागात कमी होत गेली. २०१४ च्या विधानसभा निवडणुकीत तर काँग्रेसला ६२ पैकी फक्त दहा जागांवर समाधान मानावे लागले होते. भाजपने ४४ जागा जिंकून आपली पकड मजबूत केली होती. मात्र २०१९ च्या निवडणुकीत पुन्हा काँग्रेस (१५) – राष्ट्रवादी (०६) आघाडीने २१ जागा जिंकून या भागात पुन्हा उभारी घेतली. त्यानंतर विदर्भात झालेल्या विधान परिषदेच्या निवडणुकांमध्ये काँग्रेसने यश मिळवले. स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीतील पक्षाची कामगिरी उल्लेखनीय होती. सध्या प्रदेश काँग्रेसचे अध्यक्षपद (नाना पटोले) आणि विरोधी पक्षनेते (विजय वडेट्टीवार) ही दोन्ही महत्त्वाची पदे विदर्भाकडे आहेत. शेजारच्या तेलंगणामध्ये काँग्रेसने एकहाती बहुमत मिळवून सत्ताप्राप्त केली आहे. त्यामुळे काँग्रेसचे मनोबल वाढले आहे. आता पक्षाच्या स्थापना दिनाच्या कार्यक्रमासाठी विदर्भातील नागपूरची निवड करून काँग्रेसने आगामी लोकसभा व त्यानंतर होणाऱ्या विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर विदर्भाकडे अधिक लक्ष असल्याचे दर्शवून दिले आहे.

हेही वाचा… मराठा समाजाच्या कुणबी नोंदींच्या दाव्यांवरून वाद

पारंपरिक मतदारांवर डोळा

राहुल गांधी यांच्या भारत-जोडो यात्रेला पश्चिम विदर्भात उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला होता. गांधी यांनी सध्या ओबीसींचा मुद्दा हाती घेतला आहे. जातनिहाय जनगणना करावी ही मागणी लावून धरली आहे. राज्यात सध्या पेटलेल्या मराठा विरुद्ध ओबीसी संघर्षात विदर्भातील काँग्रेस नेत्यांनी ओबीसी व त्यांच्या आरक्षणाचा मुद्दा लावून धरला आहे. कापूस उत्पादक, संत्री उत्पादकांसह अवकाळी पावसामुळे विदर्भातील शेतकरी अडचणीत सापडला आहे. वाढती बेरोजगारी आणि थांबलेली नोकर भरती या सर्व मुद्यांवर विरोधी पक्ष म्हणून काँग्रेसने वेळोवेळी आंदोलने केली आहे. काँग्रेसपासून दुरावलेला पारंपरिक मतदार पुन्हा पक्षाकडे वळवण्याचे प्रयत्न केले जात आहे.

हेही वाचा… रामदास आठवलेंच्या शक्तीप्रदर्शनात सत्तासमृद्धीचे दर्शन

राजकीय समीकरणे अनुकूल

पश्चिम विदर्भात शिवसेनेचा जोर आहे, मात्र पक्ष विभाजित झाल्याने त्यांची ताकदही कमी झाली आहे. हीच बाब राष्ट्रवादीचीही आहे. या पक्षाचा विदर्भात जोर नसला तरी काँग्रेसच्या विरोधात बंडखोर उभे करण्याचा या पक्षाचा हातखंडा होता. आता हा पक्षही फुटल्याने काँग्रेस आणि भाजप असे दोनच तुल्यबळ पक्ष संपूर्ण विदर्भात आहेत. त्यामुळे आगामी निवडणुकीत या संधीचा फायदा घेण्याचा काँग्रेसचा प्रयत्न असून त्यादृष्टीने २८ तारखेची नागपूरची सभा महत्त्वाची ठरणार आहे. २६ डिसेंबर १९२० ला नागपुरात झालेल्या अधिवेशनातून काँग्रेसला स्वातंत्र्य चळवळीसाठी नवी दिशा मिळाली होती. २८ डिसेंबर २०२३ ला सोनिया व राहुल यांच्या उपस्थितीत होणाऱ्या जाहीर सभेतून आगामी लोकसभा व विधानसभा निवडणुकीसाठी कोणती दिशा मिळणार हे पाहणे उत्सुकतेचे आहे.

“सभेला दहा लाख लोकांची उपस्थिती राहील, अशी अपेक्षा आहे. त्यानुसार आम्ही तयारी करीत आहोत. नागपूर ही संघभूमी नव्हे तर डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचाराची नगरी आहे. येथून जाणारा संदेश हा संपूर्ण देशात परिणामकारक ठरणारा आहे. त्यामुळे ही सभा काँग्रेससाठीही तेवढीच महत्त्वाची आहे.” – नाना पटोले, अध्यक्ष प्रदेश काँग्रेस

मराठीतील सर्व सत्ताकारण बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Why congress celebrating foundation day anniversary in nagpur print politics news asj