J and K CM Omar Abdullah oath ceremony: जम्मू आणि काश्मीरमध्ये १० वर्षांनंतर विधानसभा निवडणुका पार पडल्या. या निवडणुकांमध्ये नॅशनल कॉन्फरन्स आणि काँग्रेस आघाडीने बहुमत प्राप्त केले. नॅशनल कॉन्फरन्सचे उपाध्यक्ष ओमर अब्दुल्ला यांनी आज (दि. १६ ऑक्टोबर) मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. मात्र, काँग्रेसने अनपेक्षित निर्णय घेत सरकारला बाहेरून पाठिंबा देण्याचा निर्णय घेतला, त्यामुळे आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे. जम्मू-काश्मीर काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष तारीक हमीद कर्रा यांनी सांगितले की, जम्मू-काश्मीरला राज्याचा दर्जा मिळावा अशी मागणी केंद्र सरकार आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे अनेकदा केली आहे, पण केंद्राकडून कोणताही सकारात्मक प्रतिसाद मिळालेला नाही. कर्रा म्हणाले, “आम्ही केंद्र सरकारवर नाराज आहोत, त्यामुळे सध्यातरी आम्ही सत्तेत सहभागी होणार नाही.”

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

जम्मू आणि काश्मीरच्या मंत्रिमंडळात मुख्यमंत्र्यांसह केवळ नऊ मंत्री आहेत. ओमर अब्दुल्ला हे काँग्रेसला एक जागा देऊ इच्छित होते. ९० जणांच्या विधानसभेत काँग्रेसने सहा जागा जिंकल्या आहेत. याशिवाय ओमर अब्दुल्ला यांच्यावर विविध समाज घटक आणि प्रांतांचाही दबाव आहे. मंत्रिमंडळात विविध वांशिक घटक आणि प्रांतांना त्यांना मंत्रिमंडळात सामावून घ्यावे लागणार आहे. सध्या तरी ओमर अब्दुल्ला हे पाच मंत्र्यांसह शपथ घेत आहेत, इतर मंत्र्यांचा निर्णय पुढे ढकलण्यात आला आहे.

हे वाचा >> Jammu and Kashmir Winner Losers List: भाजपाच्या खेळीमुळे चित्र बदलले; वाचा जम्मू-काश्मीर विधानसभेत किती मुस्लीम आणि हिंदू आमदार?

पीटीआय वृत्तसंस्थेशी बोलताना ओमर अब्दुल्ला यांनी बुधवारी (दि. १६ ऑक्टोबर) सांगितले, “काँग्रेस मंत्रिमंडळाच्या बाहेर नाही. हे त्यांच्यावर आहे की, त्यांनी मंत्रिमंडळात कधी सामील व्हावे. आम्ही त्यांच्याशी चर्चा करत राहू. आमची चर्चा सुरू असेपर्यंत मंत्रिमंडळात जागा मोकळी ठेवली जाईल.” काँग्रेसशी काही बेबनाव झाला आहे का? यावर बोलत असताना ते म्हणाले की, नॅशनल कॉन्फरन्स आणि काँग्रेसमध्ये सर्व काही ठीक आहे. तसे नसते तर काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जून खरगे, लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी आणि इतर नेते शपथविधीला हजर राहिले नसते.

विधानसभा निवडणुकीत काँग्रेसला म्हणावी तशी कामगिरी करता आली नाही. विशेषतः जम्मूसारख्या हिंदूबहुल क्षेत्रात आघाडीमधील नॅशनल कॉन्फरन्सने मदत करणे अपेक्षित होते, मात्र या ठिकाणी काँग्रेसला फारशी मते मिळाली नाहीत, हेदेखील सत्तेपासून दूर राहण्याचे कारण मानले जाते. काँग्रेसच्या एका नेत्याने सांगितले, “पक्षाची निवडणुकीतील कामगिरी अपेक्षेप्रमाणे झाली नाही, त्यामुळे अशा परिस्थितीत पक्षाने सत्तेत सहभागी होणे योग्य होणार नाही. आमची कामगिरी कुचकामी ठरल्यामुळे मंत्रिमंडळात बसणे आम्हाला योग्य वाटत नाही.”

तसेच या नेत्याने पुढे सांगितले की, मंत्रिमंडळात काँग्रेसला एक जागा मिळणार आहे, पण जागेसाठी कुणाचे नाव पुढे करायचे हेही ठरलेले नाही. आमच्याकडे सहा आमदार आहेत, त्यापैकी चार जण पूर्वी मंत्रिमंडळात कॅबिनेट मंत्री होते; त्यामुळे यापैकी कुणाला मंत्रि‍पदासाठी निवडायचे हा आमच्यासमोर प्रश्न आहे. सरकारच्या बाहेर राहण्याचे हेही एक कारण आहे. तसेच काँग्रेसला मंत्रि‍पदासाठी हिंदू चेहरा पुढे करायचा होता, मात्र सहा आमदारांपैकी एकही हिंदू आमदार नाही.

काँग्रेसच्या चार माजी मंत्र्यांमध्ये प्रदेशाध्यक्ष तारीक अहमद कर्रा, माजी प्रदेशाध्यक्ष गुलाम अहमद मीर, दुसरे माजी प्रदेशाध्यक्ष पिरझादा मोहम्मद सय्यद आणि निझाम उद्दीन बट हे चार आमदार आहेत.

मराठीतील सर्व सत्ताकारण बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Why congress decides to stay out from jammu and kashmir government kvg
Show comments