नगर : नगर लोकसभा मतदारसंघातून भाजपने खासदार डॉ. सुजय विखे यांना पुन्हा उमेदवारी जाहीर केल्यानंतर जिल्ह्यात विखेविरोध एकवटला जाऊ लागला होता. त्यातून निर्माण होणारे धोके व अडचणी लक्षात घेऊन अखेर आता उमेदवार सुजय यांचे वडील व राज्यातील मातब्बर नेतृत्व म्हणून ओळख असलेले महसूल मंत्री राधाकृष्ण विखे यांनी पक्षांतर्गत सुसंवाद साधायला सुरुवात केली आहे. मुलाच्या विजयासाठीच विखे-पाटील यांनी सुसंवादावर भर दिल्याचे स्पष्टच आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

नगर लोकसभा निवडणुकीसाठी उमेदवारी जाहीर झाल्यानंतर पक्षाची पहिलीच बैठक काल, सोमवारी नगरमध्ये आयोजित करण्यात आली होती. या बैठकीत अचानकपणे खासदार सुजय विखे यांनी आपला माफीनामा पक्षाच्या कार्यकर्त्यांसमोर सादर केला. त्या पाठोपाठ सायंकाळी महसूल मंत्री राधाकृष्ण विखे यांनी पक्षांतर्गत विरोधक माजीमंत्री आमदार राम शिंदे यांच्या निवासस्थानी जाऊन तब्बल दीड तास बंद खोलीत चर्चा केली. लागोपाठ घडलेल्या या घटना योगायोग निश्चितच नाही. ही चर्चा केवळ नगर मतदारसंघापूरतीच होती की विखे यांच्या कार्यपद्धतीचा फटका बसलेल्या इतर विधानसभा मतदारसंघासाठी सुद्धा होती, या प्रश्नाचे उत्तर अद्याप उघड झालेले नाही.

हेही वाचा : नाशिकमध्ये भाजप-राष्ट्रवादीकडून शिंदे गटाची कोंडी

खासदार विखे यांना अचानक आपला माफीनामा सादर करावा वाटणे आणि मंत्री विखे यांनी पक्षांतर्गत विरोधक आमदार शिंदे यांच्याशी बंद दरवाज्याआड चर्चा करण्याची गरज का भासली? ही गरज केवळ पुत्राच्या लढतीसाठी होती की पक्षाच्या वरिष्ठांनी दिलेल्या सूचनेनुसार होती की विरोधी संभाव्य उमेदवार आमदार निलेश लंके यांच्यामागे एकवटू पाहणाऱ्या विरोधातून जाणवली याचे गौडबंगाल यथावकाश उलगडेलच.

यापूर्वीही काँग्रेसमध्ये असताना, त्यानंतर शिवसेनेत गेल्यानंतर आणि आता भाजपमध्ये आल्यानंतरही विखे यांच्या कार्यपद्धतीत फारसा बदल घडलेला नाही. या तिनही पक्षात असताना जिल्ह्यातील निवडणूक सार्वत्रिक असो की सहकारातील, विखेविरोधी इतर सारे, असे परिस्थिती वारंवार निर्माण झाली. मात्र या सर्व परिस्थितीतही बाळासाहेब विखे असोत की राधाकृष्ण विखे, यांच्याकडून वादावर पडदा पाडण्याचे प्रयत्न कधी झाले नव्हते. विखे कुटुंबियातील नेतृत्वाने विरोधकांना मग ते पक्षांतर्गत असोत विरोधी पक्षातील, नेहमीच शिंगावर घेतले. परंतू आता त्यांच्याकडून तसे प्रयत्न सुरु झाले आहेत. ही बाब जिल्ह्यासाठी नवीन आहे.

हेही वाचा : साताऱ्यातून आजी-माजी सैनिक, माथाडी कामगारांचे नेतेही इच्छुक

विखे यांच्या कार्यपध्दतीचा फटका बसलेल्या गेल्या विधानसभा निवडणुकीतील पराभूतांनी एकत्रितपणे विखेविरोधात तक्रार केली होती. यातील शिवाजी कर्डिले यांचा अपवाद वगळता लोकसभा निवडणुकीच्या निमित्ताने एकत्र येण्यास सुरुवात झाली होती. त्यासाठी आमदार शिंदे यांनी पुढाकार घेत दबाव निर्माण करण्यास सुरुवात केली होती. त्यांना संभाव्य विरोधी उमेदवार आमदार निलेश लंके यांचाही आधार मिळू लागला होता. पक्षातील निष्ठावानांचा गटही त्यांच्याशी अंतर ठेवून होता. या अडचणी लक्षात घेत मंत्री विखे यांनी सुसंवादासाठी पाउले टाकण्यास सुरुवात केली. त्यांचे चिरंजीव उमेदवार असणाऱ्या नगर लोकसभा मतदारसंघापूरतीच ही सुसंवादाची (डॅमेज कंट्रोल) मोहीम मर्यादित राहणार की पक्षांतर्गत इतरही विरोधकांशी ते सुसंवाद साधणार, याची स्पष्टता अद्याप झालेली नाही.

हेही वाचा : कोल्हापूरसाठी सांगलीचा बळी नको, काँग्रेस नेत्यांचे नेतृत्वाकडे आर्जव

विखे यांच्या यांच्या या प्रयत्नांचा धक्का आमदार निलेश लंके यांच्या संभाव्य उमेदवारीलाही बसणारा आहे. भाजप अंतर्गत विखेविरोधी गटाचे सहाय मिळवण्याचे त्यांचे प्रयत्न होतेच. विखे यांच्या मोहीमेमुळे त्याला खीळ बसू शकते. त्यातूनच आता त्यांच्या भूमिकेकडे आता लक्ष राहील. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विखे-शिंदे यांच्यातील वादाला ‘चहाच्या पेल्यातील वादळ’ असे संबोधले होते. मात्र हे वादळ नंतर जिल्हाभर घोंगावू लागले होते. त्याची झळ जिल्हा भाजपला बसली. आता लोकसभा निवडणुकीच्या निमित्ताने अनेक तडजोडी घडू पाहतील. त्याची सुरुवात विखे-शिदे यांच्या बंद खोलीतील चर्चेने झाली आहे. त्यातून जिल्ह्याचे राजकारण आगामी काळात वेगळे वळण घेण्याची शक्यता नाकारता येणारी.

मराठीतील सर्व सत्ताकारण बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Why did bjp leader radhakrishna vikhe patil communicated with his opponents within the bjp print politics news css
Show comments