संतोष प्रधान
मराठवाडा मुक्ती संग्राम दिनानिमित्त विविध मंत्र्यांना मराठवाड्यातील जिल्हे वाटून देण्यात आले आहेत. औरंगाबादमध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते झेंडावंदन झाले. नांदेडला फडणवीस यांच्या उपस्थितीमुळे वेगळा सूर उमटू लागला आहे. नांदेड हा माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांचा बालेकिल्ला. राज्यात काँग्रेस संघटना कमकुवत झालेली असली तरी नांदेडमध्ये अशोक चव्हाण यांच्यामुळे काँग्रेसचे वर्चस्व कायम आहे. गेल्या वर्षी झालेल्या विधानसभा पोटनिवडणुकीत भाजपने सारी ताकद लावूनही अशोकरावांमुळे काँग्रेसला विजय मिळाला होता. नांदेड महानगरपालिकेत काँग्रेसची एकहाती सत्ता आहे. जिल्ह्याच्या राजकारणावर काँग्रेस किंवा चव्हाण यांचा प्रभाव आहे.
नांदेडमुळे शेजारील हिंगोलीत त्याचे राजकीय पडसाद उमटतात. लातूरमध्ये विलासराव देशमुख यांची पुण्याई अद्याप तरी कायम आहे. यामुळे जिल्ह्याच्या राजकारणात काँग्रेसचा दबदबा कायम आहे.नांदेडमध्ये काँग्रेसचे प्राबल्य मोडून काढणे हे भाजपचे मुख्य उद्दिष्ट आहे. गेल्या लोकसभा निवडणुकीत अशोक चव्हाण यांचा नांदेड मतदारसंघात पराभव झाला होता. पण नंतर झालेल्या विधानसभा निवडणुकीत अशोक चव्हाण यांनी काँग्रेसला जिल्ह्यात यश मिळवून दिले होते. महाविकास आघाडी सरकारमध्ये सार्वजनिक बांधकाम हे महत्त्वाचे खाते त्यांच्याकडे होते.
हेही वाचा : पालकमंत्र्यांना पर्याय असू शकतो का? कोणता?
नांदेडमध्ये काँग्रेसमध्ये फूट पाडण्याचा प्रयत्न भाजपने केला होता. काही नेत्यांना गळाला लावले होते. पण त्याचा भाजपला काहीच उपयोग झाला नाही. या साऱ्या घडामोडींमध्ये अशोक चव्हाण हे भाजपमध्ये प्रवेश करणार अशी चर्चा सुरू झाली. अशोकरावांनी त्याचा वारंवार इन्कार केला असला तरी भाजप प्रवेशाच्या वावड्या उठत राहतात. एकनाथ शिंदे सरकारवरील विश्वासदर्शक ठरावावरील मतदानाच्या वेळी अशोक चव्हाण व त्यांचे पाच ते सहा समर्थक आमदार अनुपस्थित राहिल्याने चर्चेला अधिकच धार आली. विलंबाने पोहचल्याने सभागृहात पोहचू शकलो नाही, असा दावा अशोक चव्हाण यांनी केला असला तरी काही काही अदृश्य हातांनी मदत केल्याचा टोला तेव्हा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी लगावल्याने संशयात भरच पडली. त्यातच गणेशोत्सवात भाजप पदाधिकारी आशीष कुळकर्णी यांच्या निवासस्थानी अशोक चव्हाण आणि देवेंद्र फडणवीस हे समोरासमोर आल्याने पुन्हा चर्चा सुरू झाली. ‘माझी फडणवीस यांच्याशी दुश्मनी थोडीच आहे’ अशी प्रतिक्रिया चव्हाण यांनी व्यक्त केल्याने काही तरी काळेबेरे असल्याचा अर्थ काढला जाऊ लागला.
राहुल गांधी यांच्या यात्रेपूर्वी धक्कातंत्र ?
राहुल गांधी यांच्या भारत जोडो यात्रेला राज्यात नांदेडपासून नोव्हेंबरच्या पहिल्या आठवड्यात सुरुवात होत आहे. तत्पूर्वी काँग्रेसला धक्का देण्याची फडणवीस व भाजपची योजना आहे. या दृष्टीने फडणवीस यांच्या नांदेड दौऱ्याला महत्त्व आले आहे. ‘थांबा व वाट पहा’ अशी बोलकी प्रतिक्रिया भाजपमधून व्यक्त केली जात आहे. यामुळे नक्की काय होणार याची उत्सुकता असेलच.