नागपूर : एकदिवसीय क्रिकेट सामन्याच्या विश्वचषक स्पर्धेत एकही सामना नागपूरला होणार नसल्याने हा विदर्भावर अन्याय आहे, अशी भावना व्यक्त करीत थेट बीसीसीआयला पत्र पाठवणारे राष्ट्रवादीचे नेते व माजी मंत्री अनिल देशमुख यांना आताच विदर्भ का आठवला, असा सवाल राजकीय वर्तुळातून केला जात आहे. विशेष म्हणजे, त्यांच्याच पक्षाचे युवा नेते व आमदार रोहित पवार यांनी बीसीसीआयची बाजू घेत ‘क्रीडा क्षेत्रात भेदभाव नसतो’ असे प्रतिउत्तर देऊन एकप्रकारे देशमुख यांची कोंडीच केली आहे.
अनिल देशमुख यांचा मतदारसंघ नागपूर जिल्ह्यातील काटोल. त्यांचे राजकीय वर्चस्वही याच तालुक्यापुरते मर्यादित. परंतु पक्षाचे विदर्भाचे नेते म्हणून त्यांची ओळख. ज्या तत्परतेने त्यांनी क्रिकेटचा मुद्दा विदर्भावरील अन्यायाशी जोडला तशीच तत्परता यापूर्वी त्यांनी या भागातील प्रश्नांवर का दाखवली नाही, अशी टीका त्यांच्यावर होऊ लागली आहे. कारण विदर्भ विकासाच्या दृष्टीने विदर्भ वैधानिक विकास मंडळ अस्तित्वात येणे आवश्यक आहे. त्याला मुदतवाढ न देण्याचा निर्णय महाविकास आघाडी सरकारचाच. परंतु त्यात मंत्री असूनही त्यांनी यासाठी पत्रव्यवहार केला नाही. भाजपची सत्ता आल्यावरही मंडळांचे पुनर्जीवन वर्षभरापासून रखडले. तरी त्यांनी केंद्र किंवा राज्य सरकारकडे पत्र पाठवले नाही.
योग्य पाऊस न झाल्याने शेतकऱ्यांच्या पेरण्या खोळंबल्या आहेत. दुबार पेरणीची वेळ आली तर शेतकऱ्यांसाठी काय उपाययोजना शासनाने केली याबाबतही विचारणा करणारे पत्र पाठवले नाही, मात्र केवळ क्रिकेटच्या निमित्ताने त्यांना विदर्भावरील अन्यायाचा मुद्दा का आठवला, असा सवाल राजकीय वर्तुळातून केला जात आहे. दरम्यान, त्यांच्याच पक्षाचे युवा नेते आमदार रोहित पवार यांनी ट्विट करत बीसीसीआयच्या भूमिकेचे समर्थन केल्याने त्यांची अडचण झाली आहे.
हेही वाचा – जमाखर्च : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, तारेवरची कसरत
‘विदर्भावरील अन्याय’ हा मुद्दा विदर्भातील सर्वपक्षीय नेत्यांचा आवडीचा असून प्रत्येकाने त्याचा राजकीय सोयीसाठी वापर केल्याचेच आजवरचे चित्र आहे. भाजपने काँग्रेस विरोधात या मुद्याचा पद्धतशीर वापर करून विदर्भात निवडणुका जिंकल्या. या भागातील काँग्रेस नेत्यांनीही पक्षाच्या पश्चिम महाराष्ट्रातील नेत्यांविरुद्ध त्याचा वापर करून मंत्रिपदे मिळवली. देशमुखांनाही राष्ट्रवादीकडून आजवर मिळालेली मंत्रिपदे ते विदर्भातील असल्यानेच मिळाली. ही सर्व पार्श्वभूमी लक्षात घेऊनच देशमुखांनी विश्वकप क्रिकेट स्पर्धेतील सामन्याच्या निमित्ताने त्यांचे क्रिकेट व विदर्भप्रेम दाखवले, असे बोलले जात आहे.