नागपूर : सक्रिय राजकारणात प्रवेश करण्यापूर्वी संघाचे अनेक वर्ष प्रचारक राहिलेले पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना अखेर संघाच्या भेटीचा मुहूर्त गवसला. पंतप्रधानपदाची सूत्रे स्वीकारल्यानंतर मोदींनी अनेकदा नागपूर आणि नजिकच्या परिसरात अनेक कार्यक्रमांना हजेरी लावली. दीक्षाभूमीलाही त्यांनी भेट दिली. परंतु, संघ मुख्यालय किंवा रेशीमबागच्या स्मृतीमंदिराकडे पंतप्रधानांचा ताफा कधी वळलाच नाही. अखेर संघ परिवारातील माधव नेत्रालयाच्या नवीन इमारतीच्या भूमिपूजन सोहळ्यानिमित्त पंतप्रधान मोदी ३० मार्चला स्मृतीमंदिराला भेट देणार आहेत. त्यामुळे पंतप्रधान झाल्यावर मोदींना अकरा वर्षांनंतर संघाच्या भेटीची आठवण का झाली? अशी चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे.
भाजप आणि संघात अतूट नाते आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या मुशीतून तयार झालेले अनेक स्वयंसेवक नंतर भाजपमधून राजकारणात सक्रिय झाले. आजही भाजपचा संघटन मंत्री हा संघाकडून दिला जातो. खुद्द पंतप्रधान नरेंद्र मोदी अनेक वर्षे संघ प्रचारक होते. परंतु, पंतप्रधान झाल्यावर मोदींनी विविध धार्मिक आणि सामाजिक कार्यक्रम आणि संस्थांना भेटी दिल्या असल्या तरी नागपूरच्या संघ मुख्यालयाच्या भेटीपासून काहीसा दुरावा ठेवला होता. दर तीन वर्षांनी संघाच्या नागपुरात होणाऱ्या प्रतिनिधी सभेला गृहमंत्री अमित शहा, भाजप अध्यक्ष जे.पी. नड्डा यांच्यासह अनेकांनी भेट दिली आहे. विजयादशमी उत्सव आणि तृतीय वर्ष संघ शिक्षावर्गाचा समारोपीय कार्यक्रम हे संघाचे वर्षातील दोन महत्त्वाचे कार्यक्रम असतात. या दोन्ही कार्यक्रमांना राजकीय, उद्योग, सामाजिक आणि अन्य क्षेत्रातील अनेक नामवंतांनी हजेरी लावली. परंतु, पंतप्रधान झाल्यापासून नरेंद्र मोदींनी संघाचे कार्यक्रम किंवा संघ मुख्यालयापासून दुरावा ठेवला होता.
नागपूर आणि नजिकच्या परिसरातील विविध कार्यक्रमाला मोदी येत तेव्हा ते स्मृतीमंदिराला भेट देतील का? अशी चर्चा प्रसारमाध्यमांमध्ये रंगत होती. दोन वर्षांपूर्वी त्यांनी दीक्षाभूमीलाही भेट दिली होती. परंतु, त्यांनी स्मृतीमंदिराला भेट देणे टाळले होते. अखेर त्यांनी या चर्चांना पूर्णविराम दिला.
गुढीपाडव्याच्या दिवशी माधव नेत्रालयाच्या नवीन इमारतीच्या भूमिपूजन सोहळ्यानिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि सरसंघचालक डॉ. मोहन भागवत एका व्यासपीठावर येणार आहेत. या कार्यक्रमापूर्वी मोदी रेशीमबागेतील स्मृतिमंदिर येथील डॉ. केशव हेडगेवारांच्या समाधीस्थळाचे दर्शन घेणार आहेत. स्मारक समितीच्यावतीने भैय्याजी जोशी पंतप्रधानांचे स्वागत करतील. या घटनेमुळे मोदी हे नागपूरच्या संघस्थानी जाणारे पहिले पंतप्रधान ठरणार आहेत. संघाचे हे शताब्दी वर्ष असल्याने मोदींची ही भेट फार महत्त्वाची ठरणार असली तरी मोदींना इतक्या वर्षांनी संघाची आठवण का झाली? हा राजकीय वर्तुळात चर्चेचा विषय झाला आहे.
नड्डांचे वक्तव्य आणि सरसंघचालकांची अप्रत्यक्ष टीका
लोकसभा निवडणुकीदरम्यान इंडियन एक्सप्रेसला दिलेल्या मुलाखतीत जे.पी. नड्डा यांनी एका प्रश्नाला उत्तर देताना भाजप आता स्वयंपूर्ण झाला असून आपला कारभार स्वतंत्रपणे करतो, असे भाष्य केले होते. सुरुवातीच्या काळात संघाची गरज पडत होती. आज आम्ही मोठे झालो आहोत. सक्षम आहोत असे नड्डा म्हणाले होते. यानंतर सरसंघचालक डॉ. भागवत यांनी आपल्या भाषणातून अनेकदा अप्रत्यक्षरित्या भाजपला आरसा दाखवण्याचा प्रयत्न केला होता. त्यामुळे संघ आणि भाजपमध्ये काहीसा दुरावा आल्यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदींना स्मृतीमंदिराची आठवण झाल्याचीही चर्चा आहे.
स्मृतीमंदिर संघ स्वयंसेवकांचे प्रेरणास्थान
रेशीमबाग येथील स्मृतीमंदिर परिसरात आद्य सरसंघचालक डॉ. केशव हेडगेवार आणि द्वितीय सरसंघचालक गोळवलकर गुरुजी त्यांची समाधी आहे. त्यामुळे नागपूरला येणारे स्वयंसेवक स्मृतीमंदिराला भेट देऊन या समाधीस्थळांचे दर्शन घेतात. स्वयंसेवकांसाठी हे प्रेरणास्थान आहे.