Tripura Assembly Election 2023: त्रिपुरा विधानसभेचे निवडणूक निकाल जाहीर झाल्यानंतर भाजपाला स्पष्ट बहुमत मिळाले आहे. विधानसभा निवडणुकांमध्ये काँग्रेस आणि डाव्या पक्षाने आघाडी केली होती. त्यांना या निकालाचा चांगलाच धक्का बसला आहे. त्रिपुरामध्ये आजवर प्रतिस्पर्धी असलेल्या या दोन पक्षांनी भाजपाचा पराभव करण्यासाठी आणि त्रिपुरामध्ये लोकशाही आणि संविधानाचे राज्य आणण्यासाठी एकत्र येण्याचा निर्णय घेतला. मोठा गाजावाजा करत आघाडी केलेल्या माकपला ११ जागा तर काँग्रेसला केवळ तीन जागा मिळवता आल्या आहेत. ६० जागांच्या विधानसभेत भाजपला ३२ जागा मिळाल्या असून स्पष्ट बहुमत लाभले आहे. तर यंदा टिपरा मोथा या नव्या पक्षाने प्रचारात चांगलीच रंगत भरली होती, टिपरा मोथाला १३ जागा मिळाल्या असून तो विधानसभेतला प्रमुख पक्ष बनला आहे.
काँग्रेसच्या बाबतीत बोलायचे झाल्यास २०१८ च्या निकालापेक्षा यंदा त्यांची स्थिती बरी अशीच म्हणावी लागेल. २०२२ साली सुदीप रॉय बर्मन यांनी काँग्रेसला सोडचिठ्ठी देऊन भाजपामध्ये प्रवेश केला होता. त्यांची काँग्रेसमध्ये घरवापसी झाल्यानंतर काँग्रेसला एक जागा आणखी मिळवण्यात यश आले. मात्र माकपसाठी हा निकाल निराशाजनक लागला असे म्हणावे लागेल. २०१८ मध्ये पक्षाच्या १६ जागा निवडून आल्या होत्या. यावर्षी ही संख्या ११ वर घसरली. तसेच माकपच्या एकूण मतांमध्येही मोठी घसरण झाली. २०१८ साली माकपला ४२.२२ टक्के मतं मिळाली होती. यावर्षी ही मतदानाची टक्केवारी घसरून २४.६२ टक्के एवढी झाली. काँग्रेस मात्र मतदानाच्या टक्केवारीत फायद्यात आहे. काँग्रसची मतदानाची टक्केवारी दोन टक्क्यांवरून ८.५६ टक्क्यांवर गेली आहे.
राजकीय जाणकारांच्या मतानुसार डाव्यांच्या मतांचा फायदा काँग्रेसला झालेला दिसतो. पण त्या प्रमाणात काँग्रेसची मते डाव्यांकडे गेलेली दिसत नाहीत. डाव्यांचे म्हणणे आहे की, भाजपाच्या जागा अतिशय कमी मतांच्या फरकाने निवडून आलेल्या आहेत. तसेच भाजपाने निवडणुकीत मोठ्या प्रमाणावर पैसा खर्च केल्यामुळे त्यांचा फायदा झाला.
इंडियन एक्सप्रेसशी बोलताना त्रिपुरा डाव्या आघाडीचे संयोजक आणि ज्येष्ठ माकप नेते नारायण कार म्हणाले की, सामान्य माणूस, विशेषतः गरीब आणि आदिवासी नागरिक हे निवडणुकीआधी पैशांच्या प्रभावाखाली आले. तसेच त्यांनी दावा केला की, शहरातील मध्यमवर्गीय लोकसंख्या जी आजवर माकपची मतदार नव्हती, त्यांनी मात्र आपले मत काँग्रेक-डाव्या आघाडीला दिले. पण ग्रामीण भागातील गरीब जनता आणि आदिवासींची मतदान आम्हाला मिळू शकले नाही.
ज्या आदिवासींचा कैवार घेऊन डाव्यांनी त्रिपुरामध्ये आपली राजकीय कारकीर्द सुरू केली. तसेच १९४० पासून प्रभाव असलेल्या शाही परिवाराचे वर्चस्व कमी केले, त्या आदिवासींनी डाव्यांना का नाकारले? असा प्रश्न विचारला असता कार म्हणाले की, शाही परिवाराचे सदस्य प्रद्योत देवबर्मा यांनी टिपरा मोथा पक्षाची स्थापना करून आदिवासी जागांवर त्यांचे उमेदवार उभे केले. आदिवासी मतदार हे अनेक वर्ष डाव्यांचे प्रामाणिक मतदार होते. यावेळी त्यांनी टिपरा मोथाला मतदान करून एकप्रकारे भाजपाला मदत केली. निकाल जाहीर होण्याच्या दिवशी दक्षिण त्रिपुरामधील बेलोनिया आणि हृष्यमुख विधानसभा मतदारसंघात अनेक ठिकाणी मतमोजणी करणारे कर्मचारी आणि उमेदवारांना मारहाण करण्यात आली, असाही आरोप माकप नेत्याने केला.
निकाल जाहीर झाल्यानंतर सायंकाळी माकपच्या प्रदेश कार्यकारिणीने एक निवेदन काढून भाजपाचा निषेध केला. पंतप्रधान आणि केंद्र सरकारचा वापर करून भाजपाने प्रशासनावर दबाव आणला. तसेच निवडणुकीत फायदा उचलण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप माकपने केला. जनतेने दिलेला कौल आम्ही मान्य करतो. जनतेच्या हितासाठी सुरू केलेली आमची चळवळ यापुढे कायम राहिल, लोकशाहीला पुनर्स्थापित करण्यासाठी तसेच कष्टकरी, कामगार यांचा जीविताचा अधिकार अबाधित राखण्यासाठी आम्ही संघर्ष करत राहू, अशी भूमिकाही त्यांनी मांडली. मतांची टक्केवारी कमी झाल्याबाबत माकपने काँग्रेसला जबाबदार धरलेले नाही. आम्ही या निकालाचे विश्लेषण करत आहोत. काँग्रेसचे मतदान मिळाले की नाही? याबाबत आताच काही मत प्रदर्शित करणे घाईचे ठरेल. आमच्या कॉम्रेड्सनी काँग्रेससाठी काम केले, तसेच काम काँग्रेसकडूनही झाले. या निकालांचे आम्ही नक्कीच विश्लेषण करू आणि भविष्यात लोकांसोबत काम करत राहू, असे माकपने म्हटले आहे.
दरम्यान काँग्रेसच्या गोटात निकालाबाबत संभ्रमाचे वातावरण आहे. आमचे नक्की काय चुकले याचा आढावा आम्ही घेऊ. त्रिपुरामध्ये बहुमत मिळवण्यासाठी काँग्रेस-डावी आघाडी कुठे कमी पडली. याचाही आम्ही विचार करू, अशी प्रतिक्रिया काँग्रेसकडून आली आहे. इंडियन एक्सप्रेसशी बोलत असताना काँग्रेसचे नेते माजी मंत्री, आमदार सुदीप रॉय बर्मन म्हणाले की, आमची अपेक्षा होती की, डावे आणि काँग्रेस एकत्र येऊन आरामात बहुमत प्राप्त करतील. मात्र असे होऊ शकले नाही. आमचे नक्की काय चुकले हे शोधण्याचा आम्ही प्रयत्न करू. जिथे कमतरता होत्या, त्या भरून काढण्याचाही आमचा प्रयत्न असेल. त्यांनी असेही सांगितले की, डावे आणि काँग्रेसची आघाडी लोकांच्या पसंतीस उतरली आहे. जागा वाटपावरून आमच्यात कोणतेही वाद नाहीत.
बर्मन असेही म्हणाले की, दोन्ही पक्षांनी एकमेकांना मतदान केलेले आहे, याची मला पूर्ण खात्री आहे. पण काही ठिकाणी संघटनात्मक स्तरावर आम्हाला अपयश आले, हेदेखील सत्य आहे. सध्या आम्ही यावर भाष्य करू इच्छित नाही. ज्याठिकाणी वाद झाले, त्याठिकाणची माहिती घेऊन पुढील निर्णय घेतला जाईल. त्यानंतरच त्यावर आम्ही भाष्य करू. त्रिपुरामध्ये प्रचार करण्यासाठी काँग्रेसचे ज्येष्ठ नेत्यांची फारशी उपस्थिती नव्हती. राहुल गांधी, प्रियांका गांधी आणि सोनिया गांधी प्रचारात दिसल्या नाहीत. तसेच पक्षाचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे, मुकुल वासनिक आणि सलमान खुर्शीद हे मेघालयच्या प्रचारात व्यस्त होते.
बर्मन यांनी मात्र हा दावा फेटाळून लावला. पुढील काळात डावे आणि काँग्रेस एकत्र बसून या निकालाचे चिंतन करतील. यामध्ये उमेदवारांना आणि स्थानिक नेत्यांनादेखील सामावून घेतले जाईल. अतिशय कमी मतांच्या फरकाने आमचे उमेदवार पराभूत झाले. त्यावर मंथन करण्यात येईल. तसेच आमच्या आघाडीचे १३ आमदार विधानसभेत एक प्रभावी विरोधी पक्ष म्हणून काम करतील, असेही ते म्हणाले.