संतोष प्रधान

सरकारी पातळीवरून पडणारी पावले लक्षात घेता यंदा शिवसेनेचा दसरा मेळावा दादरच्या शिवाजी पार्क मैदानात होण्याची शक्यता कमीच आहे. काहीही करून दसरा मेळावा हा शिवाजी पार्कमध्येच होईल, असा निर्धार शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी केलेला असला तरी शिंदे सरकार शिवसेनेला सहजी परवानगी देणार नाही हे स्पष्टच दिसते आहे.

शिवसेना, दसरा मेळावा आणि शिवाजी पार्क हे वेगळेच समीकरण आहे. शिवसेनेच्या स्थापनेपासूनच दसऱ्याच्या दिवशी मेळावा घेण्याची पद्धत रूढ झाली. विचारांचे सोने लुटण्यासाठी या, असे शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे शिवसैनिकांना भावनिक आवाहन असायचे. बाळासाहेबांचे विचार ऐकण्याकरिता राज्याच्या कानाकोपऱ्यातून शिवसैनिक दादरमध्ये दाखल होत असत. दसरा मेळाव्यातील शिवसेनाप्रमुखांच्या भाषणाची उत्सुकता असायची. बाळासाहेब सुमारे तासभराच्या भाषणात शिवसैनिकांना भविष्यातील राजकीय घडामोडींबाबत उपदेश करायचे. मंत्रालयावर भगवा फडकविणारच अशी घोषणाही शिवसेनाप्रमुखांनी दसरा मेळाव्यातूनच केली होती. दसरा मेळाव्यात कधीही खंड पडला नव्हता. शिवसेनाप्रमुख दहशतवाद्यांच्या हिट लिस्टवर असताना पोलिसांच्या सूचनेनुसार दसरा मेळावा एकदा सकाळी पार पडला होता. कारण रात्रीच्या वेळी मेळावा घेऊ नये, असा गुप्तचर विभागाचा अहवाल होता. दसरा मेळाव्यात बाळासाहेब ठाकरे काय बोलणार याची राजकीय तसेच विविध क्षेत्रांमध्ये उत्सुकता असायची. दोन वर्षे करोनामुळे दसरा मेळावा झालाच नाही. २००७च्या महापालिका निवडणुकीपूर्वी पावसाने मैदान निसरडे झाल्याने दसरा मेळावा झाला नव्हता. विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराच्या काळात दोनदा दसरा मेळावा झाला नव्हता.

हेही वाचा : संवर्धनाचा इतिहास : सिंह, वाघ, चित्ता आणि राजकारण

यंदा दसरा मेळाव्याच्या माध्यमातून एकनाथ शिंदे यांचे बंड, भाजपची भूमिका यावर उद्धव ठाकरे समाचार घेण्याची शक्यता होती. तसेच आगामी मुंबई महानगरपालिका निवडणुकीचे रणशिंग फुंकले जाणार होते. शिवसेनेवर कुरघोडी करण्यासाठीच शिंदे सरकारने परवानगी नाकारल्याचा आरोप शिवसेना प्रवक्ते व खासदार अरविंद सावंत यांनी केला आहे.

राज ठाकरे वा नारायण राणे यांचे बंड शिवसेनेने लीलया पेलले. शिवसेनेवर काही प्रमाणात परिणाम झाला पण शिवसेनेच्या धोरणांत काहीही बदल झाला नाही. ‘जे येतील ते बरोबर’ अशी बाळासाहेब ठाकरे यांची पहिल्यापासूनच भूमिका होती. एकनाथ शिंदे यांचे बंड शिवसेनेच्या मुळावरच येऊ लागले आहे. शिंदे यांच्या बंडामुळे उद्धव ठाकरे यांचे मुख्यमंत्रीपद गेले. आता शिवसेनेवर वर्चस्व कोणाचे हा वाद सर्वोच्च न्यायालयात प्रलंबित आहे. शिवसेनेच्या चिन्हावरही शिंदे गटाचा डोळा आहे. आता तर शिवसेनेचा वार्षिक दसरा मेळावाही धोक्यात आला आहे.

हेही वाचा : पुण्यात पावसाचेही राजकारण !

दुसरीकडे खरी शिवसेना आमचीच, असा दावा करून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटाने स्वतंत्र दसरा मेळावा घेण्याची तयारी सुरू केली आहे. दसरा मेळाव्यासाठी शिवसेनेला परवानगी नाकारल्यास पुढे काय, असा प्रश्न उपस्थित होतोच. सरकारचा बंदी हुकूम मोडून शिवाजी पार्कमध्ये मेळावा घेणे कठीणच असेल. वांद्रे-ुकर्ला संकुलातील मैदान शिंदे गटाने आधीच राखीव करून ठेवले आहे. जाहीर सभांसाठी असलेली दोन्ही मोठी मैदाने शिवसेनेला उपलब्ध झाली नाही तर शिवसेनेसाठी तो मोठा धक्का असेल. करोना काळात दसरा मेळावा ऑनलाईन पद्धतीने झाला होता. शिवसेनेची कोंडीच झाली अणि मैदानच मिळाले नाही तर या वर्षीही ऑनलाईन दसरा मेळाव्याची तयारी शिवसेनेने केली आहे.