शुभांगी खापरे
पंतप्रधान मोदी यांनी आठ महिन्यांपूर्वीच अनावरण केलेला मालवणच्या राजकोट किल्ल्यावरील छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळल्याची घटना काही दिवसांपूर्वीच घडली होती. या घटनेनंतर महाराष्ट्रासह देशभरातील शिवप्रेमींकडून संताप व्यक्त केला जातो आहे. यावरून राज्यातील राजकीय वातावरणही तापलं आहे. या घटनेमुळे महायुतीवर टीका करण्यासाठी विरोधकांनीही भावनिक मुद्दा मिळाला आहे.
राज्यात कोणताही शासकीय कार्यक्रम असो किंवा राजकीय सभा असो, शिवाजी महाराजांचा फोटो हा त्या कार्यक्रमाच महत्त्वाचा भाग राहिला आहे. अरबी समुद्रातील प्रस्तावित शिवाजी महाराजांचा पुतळ्यावरूनही राज्यात मोठं राजकारण रंगलं आहे. गेल्या दोन दशकांपासून हा मुद्दा राजकारणाच्या केंद्रस्थानी आहे. राजकीय मतमतांतरं असतानाही प्रत्येक राजकीय पक्षाच्या निवडणूक जाहीरनाम्यात हा या मुद्द्याचा समावेश करण्यात आला आहे. विधानसभा असो, किंवा विधान परिषद असो, दोन्ही सभागृहात यावर दीर्घ चर्चाही झाली आहे.
राज्यात २००४ च्या विधानसभा निवडणुकीपूर्वी काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेसचे सरकार असताना पहिल्यांदा त्यांनी अरबी समुद्रात शिवाजी महाराजांचा पुतळा उभारण्याची घोषणा केली होती. २००९ च्या निवडणूक जाहीरनाम्यातही त्यांनी हा पुतळा बांधण्याचे आश्वासन दिले होते. २०१४ मध्ये राज्यात भाजपा-शिवसेनेची सत्ता आल्यानंतर तत्कालिन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या प्रकल्पाच्या कामाला वेग देण्याचा प्रयत्न केला. तसेच या प्रकल्पाचे काम ४० महिन्यांत पूर्ण करण्याचे आश्वासनही त्यांनी दिल होतं. मात्र, अद्यापही या पुतळ्याचे काम पूर्ण झालेले नाही.
खरं तर राज्यातील ३६ जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यात शिवाजी महाराजांचा पुतळा पाहायला मिळेल अशी परिस्थिती आहे. तरीही गेल्या दोन दशकात राजकीय नेत्यांनी पुतळे उभारण्यावर भर दिला आहे. विशेष म्हणजे एकीकडे सिंधुदुर्गमधील घटना घडल्यानंतर वाद सुरु असतानाही दुसरीकडे पुणे महानगर पालिकेने शहर सौंदर्यीकरण प्रकल्पांतर्गत शिवाजी महाराजांचा २० फूट उंच पुतळा उभारण्याला मंजुरी दिली आहे.
हेही वाचा – गोवा महामार्गाच्या मुख्यमंत्र्यांच्या पाहणी दौऱ्यात बांधकाममंत्री रविंद्र चव्हाण बेदखल ?
केवळ पुतळेच नाही, गेल्या दोन दशकांत राज्यातील अनेक ठिकाणांची नावे बदलून त्याला छत्रपती शिवाजी महाराजांचे नाव देण्यात आलं आहे. मार्च १९९६ मध्ये राज्य सरकारने व्हिटोरिया टर्मिनसचं नाव बदलून त्याला छत्रपती शिवाजी टर्मिनस असं नाव देण्यात आलं. त्यानंतर तीन वर्षांनी मुंबई विमानतळालाही छत्रपती शिवाजी विमानतळ असं नाव देण्यात आला. पुढे २०१७ दोन्ही ठिकाणांच्या नावात बदल करून ‘महाराज’ या शब्दाचा समावेश करण्यात आला.
नाव आणि पुतळेच नाही, छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जन्म तारखेवरूनही अनेकदा वाद झाला आहे. यासाठी शिवसेनेसारखे पक्ष रस्त्यावर उतल्याचे बघायला मिळालं आहे. छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती ही तिथीनुसार साजरी करावी, अशी मागणी त्यांनी केली आहे. मात्र, सरकारने तारखेनुसारच जयंती साजरी करण्यावर भर दिला आहे.