१८ व्या शतकातील प्रसिद्ध योद्धा राणी अहिल्याबाई होळकर यांच्या ३०० व्या जयंतीनिमित्त महायुती मंत्रिमंडळाची बैठक ६ मे रोजी पश्चिम महाराष्ट्रातील अहिल्यानगर इथे होणार आहे. अहिल्याबाई होळकर यांचे जन्मस्थान याच जिल्ह्यातले आहे. सरकारमधील काही वरिष्ठ सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, मंत्रिमंडळ बैठकीतील चर्चेचे मुद्दे अद्याप निश्चित झालेले नाहीत. तसेच अहिल्यानगर जिल्ह्यासाठी पायाभूत सुविधा प्रकल्पांपासून ते विविध योजनांपर्यंतच्या परिपूर्ण विकासाच्या पॅकेजवर विशेष भर दिला जाण्याची शक्यता आहे. त्यामध्ये ऐतिहासिक वास्तूंच्या नूतनीकरणावर भर देण्यात येईल. “या मंत्रिमंडळाच्या बैठकीत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे व अजित पवार यांच्या नेतृत्वाखालील महायुतीतील तिन्ही पक्षांचे सर्व ४२ मंत्री उपस्थित राहतील”, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे. सुरुवातीला २९ एप्रिल रोजी निश्चित केली गेलेली ही बैठक ६ मे रोजी होणार आहे. प्रशासनाला पुरेशी तयारी करण्यासाठी जास्तीची वेळ देण्यासाठी बैठकीची तारीख पुढे ढकलण्यात आली आहे.

मंत्रिमंडळाने अहिल्यानगरची निवड का केली?
दर आठवड्याला राज्य मंत्रिमंडळाची बैठक ही मुंबईत पार पडते. याआधीही काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस सरकार आणि शिवसेना-भाजपा सरकारने छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात मंत्रिमंडळ बैठका घेतल्या होत्या. अशा मागासलेल्या आणि दुष्काळग्रस्त भागाच्या विकासासाठी प्रयत्न करीत असल्याचे दाखवण्याचा पक्षांचा हा प्रयत्न होता. महायुती मंत्रिमंडळाची अहिल्यानगर येथी ल बैठक महत्त्वाची मानली जात आहे. अहिल्याबाई होळकर यांच्या जयंतीच्या त्रिशताब्दीनिमित्तच्या कार्यक्रमाचे औचित्य यावेळी आहे. महाराष्ट्रातील कोणत्याही पक्षाच्या किंवा युतीच्या सरकारने आतापर्यंत या जिल्ह्यात आयोजित केलेली ही पहिलीच बैठक आहे. २०२३ मध्ये तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील महायुती सरकारने राणी होळकरांच्या सन्मानार्थ अहमदनगर जिल्ह्याचे नाव बदलून अहिल्यानगर असे केले.

अहिल्याबाई होळकर यांच्याविषयी…
अहिल्याबाई होळकर यांचा जन्म मे १७२५ मध्ये अहिल्यानगरमधील चोंडी इथे झाला. त्यांचे वडील पाटील मानकोजी शिंदे हे धनगर कुळातील होते. ऐतिहासिकदृष्ट्या धनगर हा एक मेढपाळांचा समुदाय होता. त्यांनी मराठ्यांच्या उदयात महत्त्वाची भूमिका बजावली. अहिल्याबाईंचा विवाह १२ व्या वर्षी सुभेदार मल्हारराव होळकर यांचे पुत्र खंडेराव होळकर यांच्याशी झाला. ते मराठा साम्राज्याचे एक प्रमुख राजे होते. १७५४ मध्ये त्यांचे पती खंडेराव आणि नंतर १७६६ मध्ये त्यांचे सासरे मल्हारराव यांच्या अकाली निधनानंतर तीव्र विरोधाला तोंड देत अहिल्याबाई सिंहासनावर विराजमान झाल्या. त्यांनी सक्षम महिला शासक म्हणून त्यांचा असाधारण ठसा उमटवला. त्यांनी केलेल्या सार्वजनिक कल्याणकारी प्रयत्नांमुळे आणि प्रार्थनास्थळांच्या नूतनीकरण आणि बांधकामात केलेल्या योगदानामुळे राज्य नव्याने उभे राहिले. त्यांनी होळकर प्रदेशात रस्ते, विहिरी, घाट, मंदिरे आणि धर्मशाळादेखील बांधल्या. लग्नानंतर त्यांचे संपूर्ण आयुष्य आणि होळकर साम्राज्याच्या शासक म्हणून नंतरचा काळ त्यांनी मध्य प्रदेशातील इंदूर इथे घालवला. त्यांच्या ३०० व्या जयंतीनिमित्त महायुती सरकार चोंडी येथे मंत्रिमंडळाची बैठक घेणार आहे.

मंत्रिमंडळ बैठकीचे महत्त्व काय?
महाराष्ट्राच्या विधानसभेत फडणवीस यांनी विविध क्षेत्रांतील अहिल्याबाईंच्या कामगिरीची रूपरेषा मांडली आहे. राज्य विधान परिषदेचे अध्यक्ष राम शिंदे, जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे-पाटील आणि इतर विभागांसह अनेक नेते मंत्रिमंडळ बैठकीच्या तयारीवर देखरेख करीत आहेत. चोंडी येथे बैठकीची व्यवस्था करण्यासाठी आणि मूलभूत पायाभूत सुविधा उभारण्यासाठी सार्वजनिक बांधकाम विभागाने १.५ कोटी रुपयांची निविदा जारी केली आहे. अहिल्याबाई या सर्व जाती आणि समुदायांमध्ये अत्यंत आदरणीय असल्या तरी सध्याचे होळकर धनगर समुदायाचे नेतृत्व करतात. राज्याच्या लोकसंख्येच्या नऊ टक्के इतका असलेला हा समुदाय एक महत्त्वाची व्होट बँक मानला जातो. निवडणुकांच्या अनुषंगाने सात ते नऊ लोकसभा जागांमध्ये आणि ३५ ते ४० विधानसभा मतदारसंघांमध्ये धनगर समाज निर्णायक भूमिका बजावतो.

२०१२-१३ मध्ये भाजपाने धनगरांना अनुसूचित जमाती (एसटी)अंतर्गत आरक्षण देण्याचे आश्वासन दिले होते, जे अद्याप पूर्ण झालेले नाही. धनगरांना सध्या भटक्या जमाती (क) या यादीत समाविष्ट केले गेले आहे. त्यांना सरकारी नोकऱ्या आणि शैक्षणिक संस्थांमध्ये ३.५ टक्के आरक्षण देण्यात आले आहे. असे असताना ते एसटी या वर्गांतर्गत आरक्षणासाठी आंदोलन करीत आहेत. गेल्या अनेक वर्षांत फडणवीस सरकारने २०१४ ते २०१९ या त्यांच्या पहिल्या कार्यकाळात आणि २०२४ पासूनच्या सध्याच्या कार्यकाळात धनगर समाजासाठी कल्याणकारी योजना आणि निधी राखून ठेवला आहे. १९८० च्या दशकाच्या सुरुवातीपासूनच भाजपा धनगर समुदायाचा विश्वास संपादन करू पाहत आहे. भाजपाचे वसंत भागवत राज्यातील प्रमुख इतर मागासवर्गीय आणि आदिवासी समुदायांमध्ये आपला पाय घट्ट रोवण्याचा प्रयत्न करीत आहेत. त्यासाठी त्यांनी माळी, धनगर आणि वंजारी असा ‘माधव फॉर्म्युला’ स्वीकारला होता.

अहमदनगरचे नाव का बदलले?
२०२४च्या लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीआधी महायुती सरकारने अहमदनगर जिल्ह्याचे नाव अहिल्यानगर असे केले. हिंदू व धनगर या दोघांनाही आकर्षित करण्याच्या आणि मुघल शासकांविरुद्ध त्यांची भूमिका स्पष्ट करण्याच्या त्यांच्या धोरणाचा हा एक भाग होता.

विरोधी पक्षाची भूमिका
या मंत्रिमंडळ बैठकीवर केल्या जाणाऱ्या निधीवरून विरोधी पक्षांनी सरकारवर बोट उचलले आहे. याआधी सरकारने अहिल्यानगरमध्ये मंत्रिमंडळ बैठकीसाठी १५० कोटी रुपयांच्या विकासकामांची निविदा काढली होती. त्यामुळे काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी सरकारवर टीका केली.

“हेलिपॅड, मंडप, स्वच्छतागृहे उभारण्यासाठी प्रचंड निधी खर्च केला जात आहे. अशा वेळी अहिल्यानगरमध्ये मंत्रिमंडळ बैठक घेण्याची गरज आहे कुठे, असा प्रश्न सपकाळ यांनी उपस्थित केला आहे. “सर्व दिखावा करण्यासाठी एका मंत्रिमंडळ बैठकीकरिता १५० कोटी रुपये खर्च केले जात आहेत. तेही अशा वेळी जेव्हा सरकार दिवाळखोरीत सापडले आहे आणि त्यांच्याकडे ज्येष्ठ नागरिक तीर्थयात्रा सुरू ठेवण्यासाठी पैसे नाहीत. लाडकी बहीण योजनेचे पैसे दीड हजारावरून २१०० रुपये करण्यासाठीही निधी नाही”, असेही त्यांनी म्हटले.

विरोधकांनी निधीबाबत प्रश्न उपस्थित केल्यानंतर पीडब्ल्यूडीने यावर स्पष्टीकरण दिले आहे. “१५० कोटी रुपयांची निविदा चुकून जारी करण्यात आली, ती १.५ कोटी अशी आहे. सपकाळ यांच्यासारखे वरिष्ठ नेते बिनबुडाचे आरोप करीत आहेत”, असे भाजपा प्रदेशाध्यक्ष व महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी म्हटले आहे.