Vinesh Phogat, Bajrang Punia Join Congress: हरियाणामध्ये ५ ऑक्टोबर रोजी विधानसभेसाठी मतदान होणार आहे. भाजपाकडून सत्ता हिसकाविण्यासाठी काँग्रेस जोरदार तयारी करत आहे. आम आदमी पक्षाशी आघाडीची चर्चा केल्यानंतर आता ऑलिम्पियन कुस्तीपटू विनेश फोगट आणि बजरंग पुनिया यांना काँग्रेसमध्ये प्रवेश देण्यात आला आहे. आगामी विधानसभा निवडणुकीत दोघांना उमेदवारी दिली जाणार असल्याची घोषणा आज करण्यात आली. दोन्ही कुस्तीपटू जाट समुदायाचे प्रतिनिधित्व करतात. शेतमालाला किमान आधारभूत किंमत मिळावी, यासाठी शेतकऱ्यांचे २०० दिवसांहून अधिक काळ शंभू बॉर्डरवर आंदोलन सुरू आहे. यामध्ये जाट समुदायाच्या शेतकऱ्यांचा मोठा भरणा आहे. तसेच हरियाणामध्येही जाट समुदायाचा मोठा प्रभाव आहे. या अनुषंगाने हरियाणा विधानसभेत काँग्रेसला कसा लाभ होणार याचा घेतलेला आढावा.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

काँग्रेसला कसा लाभ होणार?

फोगट आणि पुनिया यांना पक्षात प्रवेश दिल्यामुळे जाट समुदायाच्या पाठिंब्यासह महिला, क्रीडापटू आणि युवकांचा काँग्रेसला पाठिंबा मिळू शकतो. हरियाणाचे काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष दीपक बाबरीया यांनी नुकतेच सांगितले होते की, विनेश फोगटची उमेदवारी लवकरच जाहिर केली जाईल. काँग्रेसकडून जुलना आणि बदली या दोन मतदारसंघाची चाचपणी करण्यात येत आहे. दोन्ही मतदारसंघात जाट समुदायाचे प्राबल्य आहे. बदली मतदारसंघाचे प्रतिनिधित्व सध्या काँग्रेसचे कुलदीप वत्स करत आहेत. तर जुलना विधानसभेत जननायक जनता पक्षाचे (JJP) अमरजीत ढांडा आमदार आहेत. दिल्लीमधील काँग्रेसच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार विनेश फोगट जुलना किंवा दादरी आणि बजरंग पुनिया बदली मतदारसंघातून निवडणूक लढवू शकतात.

हे वाचा >> Vinesh Phogat : “आम्हाला रस्त्यावरुन फरफटत नेत होते तेव्हा..”, विनेश फोगटने सांगितलं काँग्रेस प्रवेशाचं कारण

नुकत्याच झालेल्या पॅरिस ऑलिम्पिक स्पर्धेत ५० किलो वजनी गटाच्या अंतिम फेरीत विनेश फोगटने धडक मारली होती. अंतिम फेरी गाठणारी ती पहिलीची महिला कुस्तीपटू ठरली होती. मात्र केवळ १०० ग्रॅम वजन अधिक भरल्यामुळे तिला स्पर्धेतून बाद करण्यात आले आणि विनेशचे सुवर्णपदक थोडक्यात हुकले. १९ ऑगस्ट रोजी विनेश फोगट भारतात परतल्यापासून काँग्रेसच्या नेत्यांनी तिला पाठिंबा दिला होता. दिल्ली विमानतळावर काँग्रेसचे खासदार दिपेंदर हुडा यांनी तिचे स्वागत केले. तर हरियाणा विधासभेतील विरोधी पक्षनेते भूपिंदर सिंह हुडा यांनी जाहिर केले की, जर पुरेसे संख्याबळ मिळाले तर आम्ही विनेशला राज्यसभेत पाठवू.

भाजपासाठी चिंतेची बाब कोणती?

कुस्तीपटूंनी काँग्रेसमध्ये प्रवेश केल्याबरोबरच शेतकरी आंदोलनालाही पाठिंबा दिला आहे. नुकतेच विनेश फोगटने शंभू बॉर्डर येथे आंदोलनाला बसलेल्या शेतकऱ्यांची भेट घेतली होती. त्यामुळे भाजपाच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे. भाजपाचे माजी खासदार आणि भारतीय कुस्ती महासंघाचे माजी अध्यक्ष ब्रिजभूषण शरण सिंह यांच्या विरोधात लैंगिक अत्याचाराचे आरोप केल्यानंतर त्याचे नेतृत्व फोगट आणि पुनिया यांनी केले होते. ब्रिजभूषण सिंह यांच्यावर भाजपाने कारवाई केली नाही, याबद्दल काँग्रेसनेही भाजपाला घेरण्याचा प्रयत्न केला होता.

विनेश फोगटने शेतकरी आंदोलनाला पाठिंबा दिला असून शंभू बॉर्डरवर आंदोलकांची भेट घेतली. (Photo – PTI)

हरियाणाच्या राजकारणात क्रीडापटूंची कामगिरी कशी?

हरियाणाच्या राजकारणात याआधीही अनेक क्रीडापटूंनी नशीभ अजमावले आहे. मात्र त्यांना प्रभाव पाडता आलेला नाही. कुस्तीपटू योगेश्वर दत्त आणि बबिता फोगट यांना भाजपाकडून २०१९ च्या विधानसभा निवडणुकीत उमेदवारी देण्यात आली होती. मात्र बरोडा आणि चरखी दादरी या दोन्ही जागांवर दोघांचाही पराभव झाला. योगेश्वर दत्त यावेळी गोहाना मतदारसंघातून निवडणूक लढण्यासाठी इच्छूक आहे.

क्रीडापटूंपैकी भारतीय हॉकी संघाचे माजी कर्णधार संदीप सिंह यांना पेहवा विधानसभेतून विजय मिळविता आला होता. त्यानंतर त्यांना मनोहर लाल खट्टर यांच्या मंत्रिमंडळात क्रीडा मंत्री म्हणून जबाबदारी देण्यात आली होती. परंतु कालांतराने त्यांच्यावर लैंगिक छळाचे आरोप झाल्यामुळे मुख्यमंत्री नायब सिंह सैनी यांनी त्यांना मंत्रिमंडळातून वगळले.

आंतरराष्ट्रीय बॉक्सर विजेंदर सिंहने २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत काँग्रेसच्या तिकीटावर दक्षिण दिल्ली मतदारसंघातून निवडणूक लढविली होती. मात्र तो तिसऱ्या स्थानावर राहिला. काही महिन्यांपूर्वीच त्याने भाजपामध्ये प्रवेश केला आहे. यावेली हरियाणा विधानसभा निवडणूक लढविण्यासाठी तो आग्रही असल्याचे समजते. भिवानी जिल्ह्यातील कलुवास या मुळ गावी जाऊन राजकीय नशीब अजमावण्याचा त्याचा प्रयत्न आहे.

मराठीतील सर्व सत्ताकारण बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Why getting vinesh phogat and bajrang punia on board is a major win for congress kvg