‘भारत जोडो न्याय यात्रे’त दाखल झालेले भाजपाचे कार्यकर्ते श्रीमंत शंकरदेव यांच्या बाट्राद्राव थान येथे जाण्यास नाकारलेली परवानगी तसेच गुवाहाटी पोलिसांबरोबर झालेला संघर्ष यासह अनेक अडचणींचा सामना आसाममध्ये राहुल गांधी यांच्या भारत जोडो न्याय यात्रेला करावा लागतो आहे. यावरून मुख्यमंत्री हिमंत बिस्वा सरमा आणि राहुल गांधी यांच्यात शाब्दिक युद्धही रंगले आहे. मात्र, आश्चर्याची गोष्ट म्हणजे, इंडिया आघाडीतील अखिलेश यादव आणि सीपीआय नेते डी. राजा वगळता इतर कोणत्याही पक्षाच्या नेत्याने यासंदर्भात प्रतिक्रिया दिलेली नाही. त्यामुळे इंडिया आघाडीत पक्षांमध्येच मतभेद आहे की काय, अशी चर्चा सध्या राजकीय वर्तुळात रंगू लागली आहे.
राहुल गांधी यांची भारत जोडो न्याय यात्रा आसामनंतर पश्चिम बंगालमध्ये दाखल होणार आहे. मात्र, पश्चिम बंगालमध्येही इंडिया आघाडीतील पक्षांमध्ये मतभेद असल्याचे उघड आहे. तसेच बिहारमध्येही इंडिया आघाडीत सर्व काही ठीक नसल्याचे चित्र आहे. मात्र, इंडिया आघाडीसाठी दिलासादायक बाब म्हणजे मुख्यमंत्री नितीश कुमार आणि उपमुख्यमंत्री तेजस्वी यादव भारत जोडो यात्रेत सहभागी होणार असल्याची माहिती आहे. महत्त्वाचे म्हणजे या सर्व घटना अशावेळी घडत आहेत, ज्यावेळी भाजपाने राम मंदिर प्राणप्रतिष्ठा सोहळ्याद्वारे विरोधकांसमोर मोठं राजकीय आव्हान उभं केलं आहे.
हेही वाचा – राहुल गांधी अन् सरमा यांच्यातील वादाला जुनी किनार? सरमा काँग्रेसमध्ये असताना नेमकं काय घडलं होतं?
सोमवारी माध्यमांशी बोलताना, पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी सीपीआय इंडिया आघाडीच्या बैठकांवर नियंत्रण ठेवत असल्याचा आरोप केला, तर सीपीआयनेही ममता बॅनर्जी या भाजपाला फायदा होईल, अशा प्रकारे राजकारण करत असल्याची टीका केली होती. तसेच सीपीआयने टीएमसीबरोबर जागावाटप शक्य असल्याचे म्हटले होते.
विशेष म्हणजे काँग्रेस नेते राहुल गांधी यांना अजूनही अपेक्षा आहे की, मुख्यमंत्री ममता बॅनर्जी इंडिया आघाडीबरोबर राहतील. आसाममध्ये या संदर्भात पत्रकारांशी बोलताना ते म्हणाले, ”तृणमूल काँग्रेसबरोबर आमचे संबंध चांगल्या स्थितीत आहेत, थोड्या फार गोष्टी होत राहतात. त्यांचे नेते काही बोलताना, त्यावर आमच्या नेत्यांकडून उत्तर दिलं जातं. मात्र, असं असलं तरी याचा आमच्या मैत्रीवर कोणताही परिणाम होणार नाही.”
या संदर्भात ”द इंडियन एक्स्प्रेस’शी बोलताना सीपीआय (एम) नेते सीताराम येच्युरी म्हणाले, ”ममता बॅनर्जी यांच्या आरोपांना उत्तर देणं मला योग्य वाटत नाही. त्यांनी काही दिवसांपूर्वी आम्हाला अतिरेकी म्हटले होते. पण, मुळात इंडिया आघाडीतील प्रत्येक निर्णय सर्वानुमते घेतला जातो. त्यामुळे या बैठकीला नियंत्रित करण्याचा प्रश्नच उद्भवत नाही.” विशेष म्हणजे यावेळी बोलताना तृणमूल काँग्रेस भारत जोडो न्याय यात्रेत सहभागी होणार असेल, तर सीपीआय या यात्रेत सहभागी होणार नाही, असे संकेतही त्यांनी दिले. तसेच ”काँग्रेसला पश्चिम बंगालमधील भारत जोडो यात्रेचे नियोजन कसे असेल या संदर्भातील माहिती विचारली आहे. मात्र, ती माहिती आम्हाला अद्यापही मिळालेली नाही. पण, आम्ही आसाममध्ये या यात्रेत सहभागी झालो होतो. काँग्रेसने बिहारमध्ये इंडिया आघाडीला सहभागी होण्याचे निमंत्रण दिले आहे. आम्हीसुद्धा या आघाडीचा भाग आहोत,” अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली.
हेही वाचा – राम मंदिरामुळे देशातील राजकारण बदलणार? विरोधकांपुढे आव्हान काय?
पश्चिम बंगालमध्ये इंडिया आघाडीतील पक्षांमध्ये मतभेद असताना उत्तर प्रदेश आणि महाराष्ट्रातील आघाडीतील जागावाटपाबाबत फारशी प्रगती झालेली नाही. जेडीयूदेखील जागा वाटपावर लक्ष ठेऊन आहे. जेडीयू नेते जागा वाटपाबाबत होणाऱ्या विलंबाला काँग्रेसला जबाबदार धरत आहेत. काही राज्यांमध्ये काँग्रेसकडून जागा वाटपाबाबत होणारी अवास्तव मागणी याला कारणीभूत असल्याचे जेडीयू नेत्यांचं म्हणणं आहे. याबरोबरच इंडिया आघाडीचा नेता कोण असेल याविषयी अद्यापही औपचारिक घोषणा झालेली नाही. यावरून असे लक्षात येते की, इंडिया आघाडीत एक तर समन्वयाचा अभाव आहे किंवा कोण्या एका नावावर पक्षातील नेत्यांचे एकमत झालेलं नाही.