-मोहन अटाळकर

संत गाडगेबाबांनी मांडलेली दशसूत्री ही कोणत्याही कल्याणकारी राज्यात आदर्शवत ठरावी, असे असताना सरकार बदलले म्हणून ही दशसूत्री अडचणीची ठरू शकते का, असा प्रश्न आता विचारला जात आहे.महाविकास आघाडी सरकारने मंत्रालयाच्या प्रवेशद्वारावर लावलेला दशसूत्रीचा फलक हटविण्यात आल्यानंतर विदर्भातून तीव्र प्रतिक्रिया उमटल्या. दशसूत्रीत नेमके काय आहे, याचीही चर्चा सुरू झाली आहे.

संत गाडगेबाबांच्या दशसूत्रीत मानवतावाद सामावलेला आहे. भुकेलेल्यांना अन्न; तहानलेल्यांना पाणी; उघड्यानागड्यांना वस्त्र; गरीब मुलामुलींना शिक्षणासाठी मदत; बेघरांना निवारा, आश्रय; अंध, पंगू, रोग्यांना औषधोपचार; बेरोजगारांना रोजगार; पशुपक्षी, मुक्या प्राण्यांना अभय; गरीब तरुण तरुणींचे लग्न; दुःखी व निराशांना हिम्मत या बाबी दशसूत्रीमध्ये नमूद आहेत.

हेही वाचा : गाडगेबाबांच्‍या दशसूत्रीचे शिंदे-फडणवीस सरकारला वावडे

यातील कोणत्या बाबी सरकारला खटकल्या, अशी विचारणा होऊ लागली आहे. संत गाडगेबाबांनी लोकांना सोप्या भाषेत स्वच्छतेचे महत्त्व पटवून दिले. दिवसभर गाव स्वच्छ केल्यानंतर रात्री कीर्तनाच्या माध्यमातून जनजागृती करत. अंधश्रद्धा दूर सारण्यासाठी त्यांनी प्रयत्न केले. ‘देवळात जाऊ नका, मूर्तिपूजा करू नका, सावकाराकडून कर्ज काढू नका, अडाणी राहू नका, पोथी-पुराण, तंत्र-मंत्र, चमत्कार यावर विश्वास ठेवू नका’, अशी त्यांची शिकवण होती. देव दगडात नसून तो माणसांत आहे, हे त्यांनी लोकांच्या मनावर ठसवण्याचा प्रयत्न केला. संत गाडगेबाबांची जन्मभूमी अमरावती जिल्हा असला, तरी कर्मभूमी संपूर्ण महाराष्ट्र होती. अज्ञान, अंधश्रद्धा, अस्वच्छता यांचे उच्चाटन हेच गाडगेबाबांचे ध्येय होते. दुर्बल, अनाथ, अपंगांची ते नेहमी सेवा करीत. लोकांकडून मिळालेल्या पैशांतून त्यांनी गावोगावी शाळा, धर्मशाळा आणि जनावरांसाठी निवारा बांधला.

मूलभूत गरजांचा उल्लेख गाडगेबाबांच्या दशसूत्रीत –

शिंदे-फडणवीस सरकारला गाडगेबाबांचे कोणते विचार अडचणीचे ठरू लागले, अशी विचारणा विदर्भातील राजकीय, सामाजिक कार्यकर्ते करू लागले आहेत. मूलभूत गरजांचा उल्लेख गाडगेबाबांच्या दशसूत्रीत आहे, सोबतच शिक्षण, अपंग कल्याण, दारिद्र्य निर्मूलन असे विषय देखील अंतर्भूत आहेत. लोकांनी अंगिकारावी अशी दहा सूत्रे मांडून गाडगेबाबांनी हाच खरा धर्म आणि हीच खरी ईश्वरभक्ती असल्याचे सांगितले आहे.

हेही वाचा : वैद्यनाथ साखर कारखान्याच्या निमित्ताने मुंडे बंधु-भगिनीत राजकीय चकमक

एकीकडे, महागाईमुळे गरीब कुटुंबांची उदरनिर्वाह करताना होणारी ओढाताण, वाढती बेरोजगारी असे अनेक प्रश्न राज्यात आ वासून आहेत. दुसरीकडे धार्मिक आधारावर धृवीकरणाचे प्रयत्न केले जात आहेत. त्यामुळे गाडगेबाबांचे पुरोगामी विचार शिंदे-फडणवीस सरकारसाठी गैरसोयीचे ठरू लागले का, असा सवालही उपस्थित झाला आहे.

हेही वाचा : नव्या मित्रांच्या भूमिकेमुळे पुण्यात शिवसेनेची फरपट

संत गाडगेबाबा यांच्या दशसूत्रीनुसार आपले सरकार काम करेल, असे अभिवचन तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दशसूत्रीच्या मार्बल शिळेत कोरलेल्या फलकाच्या अनावरण प्रसंगी दिले होते. मंत्रालयाच्या मुख्य प्रवेशद्वाराजवळ हा फलक २०२० मध्ये लावण्यात आला होता. सरकार बदलल्यानंतर उद्धव ठाकरेंना विरोध करणे वेगळे, पण गाडगेबाबांच्या शिकवणीचे वावडे का, असा प्रश्न आता लोक सत्ताधाऱ्यांना विचारू लागले आहेत.

Story img Loader