तृणमूल काँग्रेसच्या खासदार महुआ मोईत्रा यांच्यावर लोकसभेत प्रश्न विचारण्यासाठी एका उद्योगपतींकडून पैसे घेतल्याचा आरोप करण्यात आला आहे. भाजपाचे खासदार निशिकांत दुबे यांनी हा आरोप केला असून या प्रकरणाची चौकशी होत नाही तोपर्यंत मोईत्रा यांची खासदारकी रद्द करावी, अशी मागणी त्यांनी केली आहे. अर्थातच महुआ मोईत्रा यांनी हे आरोप फेटाळून लावले आहेत. महुआ मोईत्रा आणि भाजपा यांच्यामध्ये वाद होण्याची ही पहिलीच वेळ नाही. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर हल्लाबोल करण्यापासून ते भाजपा खासदारांवर त्यांनी आरोप केले आहेत. २०१९ ला प्रथम प्रकाशझोतात आलेल्या महुआ मोईत्रा यांनी भाजपाला वारंवार लक्ष्य का केलं? चार वर्षांमध्ये त्यांनी भाजपावर कोणते आरोप केले ? ‘कॅश-फॉर-क्वेरी’ प्रकरण काय आहे? हे जाणून घेणे महत्त्वाचे ठरेल.
भाजपाचे खासदार निशिकांत दुबे यांनी मोईत्रा यांच्यावर ‘कॅश-फॉर-क्वेरी’ अंतर्गत अनेक आरोप केले आहेत. संसदेत प्रश्न विचारण्याच्या बदल्यात हिरानंदानी यांनी महुआ मोईत्रा यांना रोख रक्कम आणि भेटवस्तू दिल्या होत्या, तसेच हिरानंदानी यांनी निवडणूक लढवण्यापासून अनेक गोष्टींसाठी मोईत्रा यांना साहाय्य केले होते, त्यांच्या सरकारी बंगल्याची डागडुजीदेखील केली होती, असे अनेक आरोप दुबे यांनी केले आहेत. पण, मोईत्रा यांच्यावर हे आरोप होण्याची पहिली वेळ नाही. भाजपा आणि मोईत्रा यांच्यातील वाद २०१९ पासून सुरू आहेत. पश्चिम बंगालमधील तृणमूल काँग्रेसच्या खासदार महुआ मोईत्रा या त्यांच्या विधानांमुळे कायम चर्चेत राहिल्या. २५ जून, २०१९ मध्ये लोकसभेतही भाषणात असंसदीय भाषा वापरल्यामुळे त्या प्रथम प्रकाशझोतात आल्या.
हेही वाचा : दक्षिण राजस्थानमध्ये आदिवासींची मते काँग्रेस-भाजपसाठी निर्णायक ठरणार का ?
भाजपा आणि महुआ मोईत्रा यांच्यातील वाद
भाजपा आणि महुआ मोईत्रा यांच्यामध्ये अनेक वेळा खटके उडालेले आहेत. महुआ मोईत्रा यांनी खासदारकीच्या पहिल्याच भाषणात फॅसिझमच्या सुरुवातीच्या सात लक्षणांवर भाषण करून संसदेत सर्वांचे लक्ष वेधून घेतले होते. त्या भाषण करत असताना सत्ताधारी पक्षाने व्यत्यय आणण्याचा प्रयत्न केला होता, पण मोईत्रा यांनी ठामपणे आपले मुद्दे मांडले. त्यांच्या भाषणाची माध्यमांनी विशेष करून दखल घेतली. विरोधात बोलण्याची रोखठोक शैली, स्पष्टवक्तेपणा, स्वतंत्र विचार, ठासून बोलण्याची शैली यामुळे भाजपासोबत त्यांचे खटके उडणार हे निश्चित झाले होतेच.
२०२१ मध्ये माहिती व तंत्रज्ञान विभागाच्या संसदीय स्थायी समितीची बैठक रद्द झाल्यामुळे महुआ मोईत्रा यांनी दुबे यांना ‘बिहारी गुंड’ म्हटले असल्याचा त्यांच्यावर आरोप करण्यात येत आहे. झारखंडमधील गोड्डा येथील खासदार निशिकांत दुबे यांनी तृणमूल काँग्रेसच्या सर्वेसर्वा आणि पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांना टॅग करत एक्सवर (ट्विटर) म्हटले की, मोईत्रा या उत्तर भारतातील लोकांना, विशेषतः बिहारींना ‘गुंड’ असे शब्दप्रयोग करत शिवीगाळ करतात.
हेही वाचा : राजस्थान : काँग्रेसमधील अंतर्गत मतभेदामुळे उमेदवारांची पहिली यादी जाहीर होण्यास उशीर?
पेगासस सॉफ्टवेअर वादावर आयोजित बैठकीला भाजपा सदस्यांनी हजेरी पत्रकावर स्वाक्षरी करण्यास नकार दिल्याने, मोईत्रा यांनी बैठकीसंदर्भात पोस्ट केले. दुबे यांनी या प्रकारावर बोलताना सांगितले की, काँग्रेस खासदार शशी थरूर या समितीचे प्रमुख होते. यांच्या विरोधात विशेषाधिकार प्रस्तावाची नोटीस देण्यात येईल. कारण, त्यांनी बैठकीचा अजेंडा सार्वजनिक केला आहे.
२०२१ मध्ये पुन्हा एकदा निशिकांत दुबे आणि भाजपाचे खासदार पी. पी. चौधरी यांनी मोईत्रा यांच्या विरोधात विशेषाधिकार भंगाची नोटीस बजावली. मोईत्रा यांनी भारताचे माजी सरन्यायाधीश रंजन गोगाई यांच्यावर सभागृहात टिपण्णी केल्यामुळे संविधानाच्या कलम १२१ चे उल्लंघन केल्याचा आरोप त्यांच्या विरोधात करण्यात आला. मोईत्रा यांनी एक्स (ट्विटर)वर पोस्ट करत म्हटले की, ”मला विशेषाधिकाराच्या नोटिसा देऊन गप्प बसवण्याचा प्रयत्न होत आहे. पण, मी गप्प बसणार नाही.” लोकसभेतही असंसदीय वर्तन केल्यामुळे आचार समितीने त्यांना दोषी ठरवले होते.
गुरुवारी निशिकांत दुबे यांनी मोईत्रा यांच्यावर अनेक आरोप केले. संसदेत प्रश्न विचारण्याच्या बदल्यात हिरानंदानी यांनी महुआ मोईत्रा यांना रोख रक्कम आणि भेटवस्तू दिल्या होत्या. तसेच दर्शन हिरानंदानी यांनी २०१९ ची निवडणूक लढण्यासाठी मोईत्रा यांना ७५ लाख रुपये दिले होते. त्याचबरोबर मोईत्रा यांना महागडे आयफोनही दिले होते. महुआ मोईत्रा यांना देण्यात आलेल्या सरकारी बंगल्याची डागडुजीदेखील केली होती, असे आरोप केले. तृणमूल काँग्रेस पक्षाच्या सर्वेसर्वा ममता बॅनर्जी साधी साडी आणि चप्पल वापरतात, यातून त्या साध्या राहणीमानाचा आदर्श घालून देत असताना दुसरीकडे त्यांच्या पक्षाच्या खासदार मात्र महागड्या भेटवस्तूंचा आग्रह आपल्या मित्रांकडून करत असतात, असा टोमणा निशिकांत दुबे यांनी गुरुवारी (१९ ऑक्टोबर) लगावला.
महुआ मोईत्रा यांनीही भाजपाला अनेक वेळा लक्ष्य केले आहे. २०२१ मधील बंगाल विधानसभा निवडणुकीनंतर एका टीव्ही चॅनेलवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर टीका करताना त्या म्हणाल्या, ” बंगालमध्ये आमच्याकडे ‘रॉक-एर छेले’ असतात. म्हणजे रस्त्याच्या बाजूला बसलेले रिकामटेकडे लोक होय. ते असे प्रत्येक स्त्रीला ‘ओ दीदी’ अशी हाक मारत असतात. हेच काम आपले पंतप्रधान करत आहेत.” पश्चिम बंगालच्या विधानसभा निवडणुकीच्या वेळी २०२१ साली पंतप्रधान मोदी यांनी ममता बॅनर्जी यांना दीदी ओ दीदी असे संबोधले होते.
फेब्रुवारी २०२२ मध्ये, लोकसभेतील राष्ट्रपतींच्या अभिभाषणाच्या आधी मोइत्रा यांनी पोस्ट केले, ” आज संध्याकाळी राष्ट्रपतींचे अभिभाषण आहे. भाजपाला काही काल्पनिक मुद्द्यांवर बोलावे लागेल, त्यासाठी चालना मिळण्यासाठी त्यांनी काही गौमूत्र प्यावे.” संसदेमध्ये एकदा भाषण करत असताना मोईत्रा यांनी अमेरिकेतील फ्रिडम हाऊसच्या अहवालाचा दाखला दिला, ज्यात भारत हा ‘मुक्त’ देश नसून ‘अंशत: मुक्त’ देश असल्याचे म्हटले होते. तसेच भारतातील माध्यमांना स्वातंत्र्य नसून पत्रकारांसाठी हा देश धोकादायक असल्याचे या अहवालाचा आधार घेऊन मोईत्रा यांनी सांगितले. यावेळी पीठासीन अधिकारी म्हणून अध्यक्षपदाच्या खुर्चीवर बसलेल्या रमा देवी यांनी मोईत्रा यांना शांतपणे आणि आक्रमक न होता भाषण करण्याची सूचना केली. मात्र, मोईत्रा यांनी सभागृहाच्या बाहेर माध्यमांशी बोलताना पीठासीन अधिकाऱ्यांनी त्यांच्या भाषणात व्यत्यय आणल्याचा आरोप केला. ज्यामुळे दुसऱ्या दिवशी लोकसभा अध्यक्षांनी सर्व खासदारांना सभागृहात आणि सभागृहाबाहेर संसदीय सभ्यतेचे पालन करावे, अशा कानपिचक्या दिल्या.
फेब्रुवारी २०२३ मध्ये मोइत्रा यांनी भाजपाचे खासदार रमेश बिधुरी यांच्याबाबत काही शब्दप्रयोग केले. त्यांनी केलेल्या या वक्तव्यामुळे संसदेमध्ये वाद निर्माण झाला. पण, मोइत्रा यांनी याविषयी थंड भूमिका घेत ”मी सफरचंदाला सफरचंदच म्हणेन” असे सांगितले. ”बिधुरी हे स्वत: वादग्रस्त विधाने केल्यामुळे सध्या चर्चेत आहेत. बसपा खासदार दानिश अली यांच्या विरोधात केलेल्या टिप्पणीबद्दल त्यांना विशेषाधिकार समितीकडून नोटीस बजावण्यात आली आहे”, असे मोइत्रा यांनी सांगितले.
काही दिवसांपूर्वी मोईत्रा यांचे काँग्रेस नेते शशी थरूर यांच्यासह एका पार्टीतील वाइन घेताना आणि सिगार ओढतानाचे फोटो व्हायरल झाले होते. याबद्दल मोईत्रा यांनी भाजपाच्या ट्रोल आर्मीला जबाबदार धरले. “भाजपा ट्रोल सेनेने माझे खासगी फोटो व्हायरल केल्याचे पाहून मला त्यांची किव करावीशी वाटते. मला पांढर्या ब्लाऊजपेक्षा हिरव्या रंगाचे कपडे आवडतात, त्यात गैर काय. बंगाली महिला स्वतःचे आयुष्य मनाप्रमाणे जगतात, खोट्याचा आधार घेऊन त्या जगत नाहीत. भाजपा नेहमी महिलांवर कमरेखालचे वार करते, त्यामुळेच त्यांचा पश्चिम बंगालच्या प्रत्येक निवडणुकीत पराभव होतो.”