अलिबाग : शेकाप सरचिटणीस जयंत पाटील यांचे भाचे आस्वाद पाटील भाजपच्या वाटेवर आहेत. येत्या १६ एप्रिलला त्यांचा मुंबईत पक्षप्रवेश होणार आहे. आगामी जिल्हा परिषद निवडणूकांच्या पार्श्वभूमीवर आस्वाद पाटील यांचा भाजप प्रवेश पक्षासाठी उपयुक्त ठरणार असून, शेकापला हादरा देण्याची भाजपची खेळी यशस्वी होणार आहे.
आस्वाद पाटील हे शेकापच्या माजी आमदार मिनाक्षीताई पाटील यांचे चिरंजीव आहेत. शेकापचे जिल्हा चिटणीस पद त्यांनी प्रदीर्घकाळ संभाळले आहे. सुरवातीला अलिबाग पंचायत समितीचे सभापती पद, त्यानंतर जिल्हा परिषदेचे गट नेते पद, अर्थ व बांधकाम सभापती पद आणि उपाध्यक्षपदी त्यांनी काम केले आहे. त्यामुळे जिल्ह्याच्या राजकारणा अचूक जाण त्यांना आहे. जिल्हा परिषदेच्या प्रशासनावर त्यांची घट्ट पकड राहिली आहे. त्यामुळे भाजपसाठी त्यांचा पक्ष प्रवेश महत्वाचा आहे.
विधानसभा निवडणूकीत पक्षाने तिकीट नाकारल्याने, आस्वाद पाटील नाराज होते. अलिबाग विधानसभेतून त्यांना निवडणूक लढवण्याची इच्छा होती. मात्र शेकाप सरचिटणीस जयंत पाटील आस्वाद पाटील यांना उमेदवारी नाकारली, त्या ऐवजी सून चित्रलेखा पाटील यांना उमेदवारी दिली. पाच वर्ष चित्रलेखा पाटील मतदारसंघ बांधण्यासाठी घेतलेल्या परिश्रमांचा दाखला देण्यात आला. यामुळे पाटील कुटूंबात मात्र वादाची ठिणगी पडली. जयंत पाटील यांच्या या निर्णयामुळे नाराज असलेले त्यांचे बंधू आणि माजी आमदार सुभाष उर्फ पंडीत पाटील आणि भाचे आस्वाद पाटील निवडणूकीतील प्रचारापासून दूर राहिले. त्याचा परिणाम निवडणूक निकालावर झाला. शिवसेनेचे महेंद्र दळवी चित्रलेखा पाटील यांचा पराभव करत पुन्हा आमदार झाले. सलग दुसऱ्यांना बिगर शेकाप आमदार निवडुन येण्याची ही पन्नास वर्षातली पहिलीच वेळ होती.
निवडणूकीनंतर आस्वाद पाटील यांनी पक्षातील पदाधिकाऱ्यांची बैठक घेतली. आणि जिल्हा चिटणीस पद आणि पक्ष सदस्यत्वाचा राजिनामा देत असल्याचे जाहीर केले. तेव्हा पासून ते भाजपच्या वाटेवर असल्याच्या चर्चा सुरू होत्या. भाजपचे जिल्हा संघटक सतिश धारप, जिल्हाध्यक्ष खा. धैर्यशील पाटील आणि प्रदेश कार्याध्यक्ष रविंद्र चव्हाण आस्वाद पाटील यांच्या संपर्कात होते. मात्र पक्षप्रवेश विविध कारणांमुळे पूढे जात होता. आस्वाद पाटील यांचा भाजप प्रवेश होत नसल्याने, त्यांच्या सहकाऱ्यांमध्येही अस्वस्थता निर्माण झाली होती. आता मात्र १६ एप्रिल रोजी आस्वाद पाटील यांचा मुंबईत पक्षप्रवेश होणार असल्याचे निश्चित झाले आहे. भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी या वृत्ताला दुजोरा दिला आहे. त्यामुळे आस्वाद पाटील यांच्या समवेत शेकापचे किती जण भाजपमध्ये प्रवेश करणार हे पाहणे महत्वाचे असणार आहे.
महाड विधानसभा मतदारसंघातून शिवसेना ठाकरे गटाकडून निवडणुक लढविणाऱ्या स्नेहल जगताप या देखील भाजपच्या वाटेवर होत्या. मात्र त्यांच्या पक्षप्रवेशाबाबत भाजपकडून ठोस निर्णय होत नसल्याने, त्यांनी भाजप ऐवजी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. आस्वाद पाटील यांच्याबाबतीतही असेच होणार का याची चर्चा सुरू झाली होती. सुनील तटकरे आणि आदिती तटकरे यांच्याशी आस्वाद पाटील यांचे चांगले संबध आहेत. त्यामुळे ते राष्ट्रवादी काँग्रेस मध्ये कधीही जाऊ शकतील असा कयास राजकीय वर्तुळात बांधला जात होता.
आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आस्वाद पाटील यांचा पक्ष प्रवेश भाजपसाठी महत्वाचा आहे. पनवेल, उरण, अलिबाग आणि पेण मधील शेकापचे काही नेते आणि कार्यकर्ते आस्वाद पाटील यांच्या संपर्कात आहेत. हा गट आस्वाद पाटील यांच्या सोबत भाजप मध्ये दाखल होऊ शकतो. या शिवाय आस्वाद पाटील यांना जिल्ह्याच्या राजकीय परिस्थितीची अचूक जाण आहे. त्यामुळे ग्रामिण भागात शेकापचा असलेला प्रभाव कमी करण्यासाठी त्यांची मदत उपयुक्त ठरू शकते.