बिहारच्या राजकारणात सध्या राजकीय घडामोडींना वेग आला आहे. संयुक्त जनता दलाचे सर्वेसर्वा नितीश कुमार लवकरच भाजपाशी हातमिळवणी करण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. ते आपल्या मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा देऊन एनडीएच्या पाठिंब्यावर पुन्हा एकदा मुख्यमंत्रिपदावर विराजमान होणार आहेत, असे सांगितले जात आहे. दरम्यान, नितीश कुमार यांनी आपला मित्रपक्ष बदलण्याची ही पहिलीच वेळ नाही. २०२२ च्या अगोदर नितीश कुमार आणि भाजपा यांच्यात युती होती. मात्र, त्यांनी भाजपाची साथ सोडत राष्ट्रीय जनता दलाशी (राजद) युती केली होती.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

नितीश कुमार भाजपाशी युती करण्याची शक्यता

भाजपा आमच्या पक्षात फूट पाडण्याचा प्रयत्न करीत आहे, असा आरोप करीत नितीश कुमार यांनी ऑगस्ट २०२२ मध्ये भाजपाशी असलेली युती तोडून राजदशी हातमिळवणी केली होती. त्यांनी राजद, काँग्रेस आणि डाव्या पक्षांशी आघाडी करीत बिहारमध्ये महाआघाडीच्या सरकारची स्थापना केली होती. त्यानंतर आगामी निवडणुकीचे नेतृत्व राजदचे तेजस्वी यादव करतील, असे नितीश कुमार म्हणाले होते. मात्र, त्याआधीच महायुतीतून बाहेर पडून नितीश कुमार भाजपाशी हातमिळवणी करण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

तेजस्वी यादव उनुपस्थित

काही दिवसांपासून जदयू आणि राजद या पक्षांत तणावाची स्थिती होती. सध्या नितीश कुमार भाजपासोबत जाणार असल्याचे म्हटले जात आहे. असे असतानाच प्रजासत्ताक दिनानिमित्त पाटण्यातील कार्यक्रमात तेजस्वी यादव उनुपस्थित राहिले. त्यामुळे या दोन्ही पक्षांत सर्व काही आलबेल नसल्याचे पुन्हा एकदा अधोरेखित झाले.

२०२२ मध्ये नितीश कुमार एनडीएतून बाहेर का पडले?

नितीश कुमार यांनी ऑगस्ट २०२२ मध्ये इंडिया आघाडीतून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला होता. भाजपामुळे जदयू पक्षाचा विस्तार होत आहे. भाजपा जदयूला संपवण्याचा प्रयत्न करीत आहे, असा आरोप तेव्हा नितीश कुमार यांनी केला होता. नितीश कुमार यांच्या जदयू पक्षाचे २०१५ सालच्या विधानसभा निवडणुकीत एकूण ७१ उमेदवार निवडून आले होते. मात्र, ही संख्या २०२० च्या निवडणुकीत ४३ पर्यंत खाली आली होती; तर दुसरीकडे भाजपाच्या जागा ५३ वरून ७४ पर्यंत वाढल्या होत्या. याच कारणामुळे नितीश कुमार भाजपावर नाराज होते.

भाजपाने विरोधात प्रचार केल्याचा केला होता आरोप

नितीश कुमार यांनी तेव्हा भाजपावर अनेक आरोप केले होते. जदयूचे उमेदवार निवडून येऊ नयेत म्हणून भाजपाने लोक जनशक्ती पार्टीच्या (एलजेपी) उमेदवारांना ताकद दिली होती, त्यामुळे जदयूच्या उमेदवारांचा अनेक जागांवर पराभव झाला, असा आरोप जदयू आणि नितीश कुमार यांनी केला होता.

प्रशासकीय पातळीवर अनेक अडचणी

भाजपासोबत सत्तेत असताना नितीश कुमार मुख्यमंत्री; तर भाजपाच्या नेत्या रेणू देवी आणि
तारकिशोर प्रसाद हे दोन नेते उपमुख्यमंत्री होते. नितीश कुमार आणि या दोन्ही उपमुख्यमंत्र्यांत फारसे जमत नव्हते. ज्या पद्धतीने सुशील कुमार मोदी आणि नितीश कुमार यांच्यात चांगले संबंध होते, त्या पद्धतीने देवी आणि प्रसाद यांच्याशी नितीश कुमार यांचे संबंध नव्हते. त्यामुळेदेखील राज्यकारभार हाकताना नितीश कुमार यांना अनेक पातळ्यांवर अडचणी येत होत्या. त्यामुळेदेखील नितीश कुमार यांनी ऑगस्ट २०२२ मध्ये एनडीएतून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला होता.

नितीस कुमार पुन्हा एनडीएत का जात आहेत?

काही दिवसांपासून नितीश कुमार आणि राजद, काँग्रेस आणि इंडिया आघाडीशी यांच्यात मुद्द्यांवर मतभेद निर्मात झाले आहेत. तसेच सध्याची राजकीय परिस्थिती पाहता, भाजपासोबत जाणे हे योग्य होईल, असे नितीश कुमार यांना आता वाटत असावे.

नितीश कुमार यांना पक्षफुटीची भीती

जदयू पक्षात कधीही फूट पडू शकते, असा दावा काही दिवसांपासून केला जात होता. मिळालेल्या माहितीनुसार- जदयूचे सात खासदार भाजपाच्या संपर्कात होते. २०१९ साली जदयू हा एनडीएचा घटक पक्ष होता. त्यामुळे हे जदयूच्या अनेक नेत्यांनी लोकसभेची निवडणूक जिंकली होती. मात्र, सध्या नितीश कुमार हे इंडिया आघाडीचा भाग आहेत. त्यामुळे २०२४ सालच्या लोकसभा निवडणुकीबाबत हेच खासदार साशंक आहेत. तसेच भाजपाशी युती केल्यावर फायदा होईल, असे राजीव रंजन सिंह वगळता जदयूच्या बहुसंख्य नेत्यांना वाटत आहे. म्हणूनच नितीश कुमार यांनी भाजपाशी हातमिळवणी करण्याचा निर्णय घेतला असावा, असे सांगितले जात आहे.

मोदींच्या नेतृत्वाखाली निवडणूक लढवल्यास फायदा?

२०१९ सालच्या निवडणुकीत एनडीएचा भाग असताना जदयूने एकूण १७ जागा लढवल्या होत्या. त्यातील १६ जागांवर जदयूचा विजय झाला होता. जदयूने केलेल्या अंतर्गत सर्वेक्षणानुसार नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली २०२४ सालची निवडणूक लढवल्यास पक्षाला फायदा होऊ शकतो, असे समोर आले आहे. अयोध्येतेतील राम मंदिरामुळे भाजपाच्या लोकप्रियतेत वाढ झालेली आहे. त्यामुळे मोदींच्या नेतृत्वाखाली निवडणूक लढवणे हे फायद्याचे ठरेल, असे जदयूला वाटत आहे.

इंडिया आघाडीतील मतभेदांमुळे निर्णय

दुसरीकडे काही दिवसांपासून इंडिया आघाडीत अनेक मुद्द्यांवरून नितीश कुमार यांचे आणि इतर नेत्यांत मतभेद निर्माण झाले आहेत. नितीश कुमार हे मुख्यमंत्रिपदाच्या उमेदवारीसाठी प्रयत्न करीत होते; मात्र त्याला अपेक्षित यश आलेले नाही. नितीश कुमार यांना समन्वयक पद देण्यावरही एकमत नाही. दुसरीकडे इंडिया आघाडीतील घटक पक्षांत पंजाब, पश्चिम बंगाल, उत्तर प्रदेश या राज्यांत मतभेद आहेत. जागावाटपावर योग्य तोडगा निघत नाहीये. या कारणामुळेही नितीश कुमार भाजपाशी हातमिळवणी करण्याचा विचार करीत असावेत, असे सांगितले जात आहे.

मराठीतील सर्व सत्ताकारण बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Why jdu part away from india in august 2022 why nitish kumar joining hands with bjp once again prd