राष्ट्रीय राजकारणात दमदार एन्ट्री करण्याची के.चंद्रशेखर राव यांची संधी हुकली असल्याची चर्चा सध्या तेलंगणात आहे. तेलंगणा राष्ट्र समितीचे अध्यक्ष आणि तेलंगणा राज्याचे मुख्यमंत्री के.चंद्रशेखर राव यांना राष्ट्रीय राजकारणात दमदार पाऊल टाकण्याचा मनसुबा रचत होते. भाजप आणि काँग्रेस या दोन प्रमुख राष्ट्रीय पक्षांपासून अंतर राखत राष्ट्रीय राजकारणात स्वतःचे नेतृत्व प्रस्थापित करण्याच्या दृष्टीने पाऊल टाकण्याची संधी राव यांना मिळाली होती. मात्र पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी राष्ट्रपती पदाच्या निवडणुकीच्या निमित्ताने देशातील भाजपा विरोधी राजकीय पक्षांना पत्र लिहीत बैठकीचे आयोजन केले आणि राव यांची संधी हुकल्याचं चित्र बघायला मिळाले. बुधवारी दिल्लीत ममजा बॅनर्जी यांच्या पुढाकाराने बिगर भाजपा राजकीय पक्षांच्या बैठकीत राव यांनी तेलंगणा राष्ट्र समितीचा प्रतिनिधी पाठवला नाही. ममता बॅनर्जी यांच्या भुमिकेत राव स्वतःला अपेक्षित करत होते.
तेलंगणामध्ये राव यांच्या ‘तेलंगणा राष्ट्र समिती’ या पक्षासमोर सर्वात मोठे आव्हान आहे ते काँग्रेसचे. आणि नेमकी काँग्रेस दिल्लीच्या बैठकीत उपस्थित असल्यानेच राव या बैठकीपासून चार हात दूर राहिले. राज्यात प्रमुख विरोधी पक्ष असलेल्या काँग्रेसबरोबर दिल्लीच्या बैठकीत सहभागी होणे राव यांनी टाळले. इंडियन एक्सप्रेसला सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार गेल्या महिन्यात राहुल गांधी हे तेलंगणा दौऱ्यावर होते, तेव्हा त्यांनी राज्य सरकारवर टीका केली होती, त्यामुळे राव हे अस्वस्थ झाले होते. त्या दौऱ्यात एका सभेत राहुल गांधी म्हणाले “मला तेलंगणाच्या जनतेला विचारायचं आहे की तुम्हाला तेलंगणा राष्ट्र समिती सरकारने काय दिलं ? राज्य सरकारच्या दुर्लक्षामुळे राज्यात शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या, त्यांच्या पत्नी इथे बसल्या आहेत. मी एवढंच सांगेन की काँग्रेस सरकारच्या काळात अशी परिस्थिती येणार नाही”.
राष्ट्रपती पदाच्या निवडणुकीत ज्या प्रकारे उमेदवारांची चाचपणी केली जात आहे, शोध सुरु आहे त्या पद्धतीवरही के.चंद्रशेखर राव नाराज आहेत.
के.चंद्रशेखर राव यांनी गेल्या काही महिन्यांपासून राष्ट्रीय पातळीवर विविध राजकीय नेत्यांच्या भेटीगाठी सुरु केल्या तेव्हापासूनच त्यांच्या राष्ट्रीय राजकारणातील प्रवेशाबद्द्ल चर्चा सुरु झाल्या होत्या. एवढंच नाही तर त्यांच्या पक्षाचे नाव ‘भारतीय राष्ट्र समिती’ असे करण्याबाबत शक्यता वर्तवल्या जात होत्या. गेल्या काही महिन्यात जनता दलचे देवगौडा, आपचे अरविंद केजरीवाल, डीएमकेचे स्टॅलीन, झारखंड मुक्ती मोर्चाचे शिबू, शिवसेनेचे उद्धव ठाकरे, जनता दलचे तेजस्वी यादव यांच्या भेटी चंद्रशेखर राव यांनी घेतल्या होत्या. त्याआधी ममता बॅनर्जी, सीताराम येचुरी, माणिक सरकार, डी राजा या नेत्यांनाही राव भेटले होते.
मात्र काही दिवसांपासून हे सर्व थंडावलं असल्याचे चित्र बघायला मिळत आहे. राव यांनी पक्षाचे नाव बदलण्याबाबतही फारशी उत्सुकता दाखवलेली नाही. उलट निवडणुक रणनितीकार प्रशांत किशोर यांच्यासोबत बैठका जोरात सुरु आहेत. असं असलं तरी मुख्यमंत्री राव यांचे विविध संकल्पनांवर काम थांबलं नसल्याचा दावा पक्षाच्या इतर नेत्यांनी केला आहे.