चिन्मय पाटणकर
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या अधिसभेसाठी पदवीधर गटातील निवडणुकीत महाविकास आघाडीचा पराभव झाला. महाविकास आघाडीला केवळ एकाच जागेवर विजय मिळवता आला. महाविकास आघाडीतून काँग्रेस फुटण्यासह प्राधान्यक्रम पद्धतीने होणाऱ्या या निवडणूक प्रक्रियेचा अभ्यास, पुरेशी तयारी आणि नियोजनाचा अभाव अशा आघाड्यांवर कमी पडल्याने महाविकास आघाडीला पराभवाला सामोरे जावे लागले. आगामी महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडीसाठी विद्यापीठ निवडणूक ही रंगीत तालमीसारखी होती. मात्र या निवडणुकीत महाविकास आघाडीला आलेले अपयश पाहता महापालिका निवडणुकीची समीकरणे कशी जुळवली जाणार हा प्रश्न आहे.
हेही वाचा… तेजस्वी बारब्दे : ग्रामविकासाचा ध्यास
विद्यापीठ अधिसभा निवडणूक दर पाच वर्षांनी होते. आतापर्यंत या निवडणुकीला उघडपणे राजकीय स्वरुप कधीच नव्हते. मात्र यंदा पहिल्यांदाच राजकीय पक्षांनी उघडपणे या निवडणुकीत पॅनेल करून उमेदवार उतरवल्याने ही निवडणूक राजकीय झाली. त्यात भाजपशी संबंधितांचा विद्यापीठ विकास मंच, राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) यांच्या महाविकास आघाडीचे सावित्रीबाई फुले पॅनेल, काँग्रेसने पाठिंबा दिलेले छत्रपती शाहू महाराज परिवर्तन पॅनेल, हिंदू महासंघ आदी पक्ष-संघटनांचे एकूण ३७ उमेदवार १० जागांसाठी रिंगणात होते. राज्यपातळीवरील महाविकास आघाडीत राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) आणि काँग्रेस हे घटक पक्ष होते. मात्र या निवडणुकीत आघाडी करण्याबाबत संवाद नसल्याने काँग्रेस महाविकास आघाडीतून फुटली. या फुटीचा महाविकास आघाडीला पहिला झटका बसला.
हेही वाचा… भाजपकेंद्री धोरण समितीमुळे वस्रोद्योगात अपेक्षांना धुमारे
भारतीय जनता पक्षाशी संबंधितांच्या विद्यापीठ विकास मंचाकडून गेले वर्षभर अधिसभा निवडणुकीची तयारी करण्यात येत होती. त्यात मतदारनोंदणी, संपर्क अभियान, निवडणुकीसाठी उमेदवार आदींचा समावेश होता. मात्र ही निवडणूक लढवायला हवी याची उपरती महाविकास आघाडीला अर्ज भरण्याची मुदत संपण्याच्या दोन-चार दिवस आधी झाली. त्यामुळे पॅनेलची जुळवाजुळव, उमेदवार कोण हे करण्यातच घाई झाली. प्राधान्यक्रम पद्धतीची ही निवडणूक असल्याने त्यासाठी विशेष अभ्यास, मतदारांपर्यंत पोहोचण्यासाठीचे सूक्ष्म नियोजन, मतदार नोंदणी, उमेदवारांचे अचूक प्राधान्यक्रम ठरवणे आवश्यक असते. महाविकास आघाडी या बाबतीत कमी पडली. या निवडणुकीसाठी महाविकास आघाडीने विशेष अशी मतदार नोदणी केली नव्हती. मतदानाच्या दिवशी आयत्यावेळी प्राधान्यक्रमांमध्ये बदल करण्यात आले. त्याच काँग्रेसही सोबत नसल्याने मतांचे विभाजन झाले. या सगळ्याचा परिणाम मतदानावर झाला. महाविकास आघाडीचे उमेदवार विजयी होण्यासाठी आवश्यक मतांचा कोटा पूर्ण करू शकले नाहीत. महाविकास आघाडीतील शिवसेनेचे बाकेराव बस्ते हे एकमेव उमेदवार अटीतटीची लढत होऊन विजयी झाले. स्वाभाविकपणे विद्यापीठातील अधिसभा, व्यवस्थापन परिषदेवर असलेला राष्ट्रवादी काँग्रेसचा प्रभाव आता मोठ्या प्रमाणात कमी झाला आहे. या निवडणुकीत भाजपशी संबंधितांचे नऊ उमेदवार निवडून आले, तर महाविकास आघाडीला एकच जागा मिळाली.
हेही वाचा… कोणता झेंडा घेऊ हाती? माजी मंत्री जयदत्त क्षीरसागरांपुढे राजकीय पेच
येत्या काही महिन्यांत महापालिकेच्या निवडणुकीचे पडघम वाजणार आहेत. त्या पार्श्वभूमीवर भाजपला आव्हान देण्यासाठी महाविकास आघाडीसाठी विद्यापीठ अधिसभा निवडणूक महत्त्वाची होती. मात्र, विसंवाद, तयारी आणि नियोजनाच्या अभावामुळे झालेला पराभव पाहता आता महापालिका निवडणुकीसाठी सुसंवाद ठेवून, नियोजनपूर्वक जुळवाजुळव महाविकास आघाडीतील तीन पक्ष कशा पद्धतीने करतात ही उत्सुकतेची बाब ठरणार आहे.