चंद्रशेखर बोबडे

नागपूर : सर्व जाती धर्मांना सोबत घेऊन राजकारण करणाऱ्या राष्ट्रवादी काँग्रेसने पक्षाची पाळेमुळे विदर्भात रुजवण्यासाठी सातत्याने प्रयत्न केले. मात्र अजूनही या पक्षाला लोकसभा व विधानसभा निवडणुकीत अपेक्षित यश मिळवता आले नाही. त्यामुळे आगामी महापालिका निवडणुकीत पक्षाची कामगिरी कशी असेल याचा अंदाज राजकीय विश्लेषक बांधू लागले आहेत.

पक्ष स्थापनेनंतर झालेल्या लोकसभा निवडणुकीत राष्ट्रवादीला विदर्भात फक्त भंडाऱ्याची जागा फक्त एकदा (२००९) सार्वत्रिक निवडणुकीत तर एकदा पोटनिवडणुकीत जिंकता आली, तीही काँग्रेसशी युती असल्याने. १९९९ ते २०१९ या दरम्यान झालेल्या विधानसभा निवडणुकीत पक्षाचे संख्याबळ फक्त दोन वेळाच दहाच्यावर गेले. १९९९ मध्ये १२, २००४ मध्ये ११, २००९ मध्ये, २०१४ मध्ये फक्त १ आणि २०१९ मध्ये ६ जागा मिळाल्या. विदर्भात विधानसभेच्या एकूण ६२ जागा आहेत हे येथे उल्लेखनीय.

हेही वाचा… म्हाडा अधिकाऱ्यांमुळेच राऊत अडचणीत?

विदर्भात नागपूर, अमरावती, अकोला आणि चंद्रपूर अशा चारही महापालिकांमध्ये राष्ट्रवादीला स्वबळावर सत्ता मिळवता आली नाही.

पक्ष विदर्भात वाढावा म्हणून राष्ट्रवादीच्या नेतृत्वाने जाणीवपूर्वक प्रयत्न केले. सर्व जाती-धर्मांचे लोक सोबत घेतले. त्यांना सत्तेत संधी दिली. इतर पक्षातील नेत्यांना पक्षात घेऊन पदे दिली. पण पक्षाची ताकद काही वाढली नाही. कारण ज्यांच्या हाती पक्षाने सूत्रे दिली त्यांनी त्याचा वापर फक्त घर, कुटुंब,मतदारसंघापर्यंत मर्यादित ठेवला. नेते मोठे झाले. पक्ष वाढला नाही.

हेही वाचा… VIDEO: कोण होते सायरस मिस्त्री? गिरीश कुबेर यांच्याकडून जाणून घ्या

खरे तर राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांना मानणारा मोठा वर्ग विदर्भात आहे. या भागातील कॉंग्रेसच्या अनेक नेत्यांशी त्यांचे सलोख्याचे संबंध आहेत. शिक्षणसम्राट, सहकारसम्राट आजही पवारांसोबत आहेत. तरीही राष्ट्रवादीच्या घड्याळाचे या भागात संथ गतीने फिरत आहेत.

संघर्ष करणाऱ्या नेत्याचा अभाव हे कारण राष्ट्रवादी या भागात न वाढण्यासाठी आहे, असे राजकीय विश्लेषक सांगतात. अनिल देशमुख काटोल पुरते तर प्रफुल्ल पटेल भंडारा जिल्ह्यापुरते मर्यादित आहेत. पटेल यांना त्याच्या गोंदियात नगरपालिका, जिल्हा परिषद निवडणूक जिंकता आली नाही. पण ते पक्षाचे राष्ट्रीय नेते आहेत. पश्चिम विदर्भात अमोल मिटकरी यांच्या निमित्ताने नवे व लढवय्ये नेतृत्व या पक्षाला मिळाले. तसे पूर्व विदर्भात मिळाले नाही. या भागात दरबारी नेते व नेत्यांच्या मागे धावणारे कार्यकर्ते आहेत. रस्त्यावर उतरून आंदोलन करणारे कमीच. प्रस्थापितांच्या ओझ्याखाली राष्ट्रवादीची वाढ खुंटली असे याच पक्षातील कार्यकर्ते सांगतात.

Story img Loader