भाजपाने दिल्लीत दोनदिवसीय राष्ट्रीय परिषदेचे आयोजन केले आहे. या बैठकीच्या पहिल्या दिवशी पंतप्रधान मोदींसह भाजपाचे सर्वच राष्ट्रीय नेते उपस्थित होते. यावेळी भाजपाने ‘विकसित भारत- ही मोदींची हमी’ असा ठरावही मंजूर केला. तसेच आगामी लोकसभा निवडणुकीनंतर पंतप्रधान मोदी हे तिसऱ्यांदा पंतप्रधान होतील, असा विश्वासही भाजपाच्या नेत्यांनी व्यक्त केला.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

महत्त्वाचे म्हणजे यावेळी पंतप्रधान मोदी यांनी पक्षाचे पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना संबोधित केले. यावेळी बोलताना त्यांनी आगामी लोकसभा निवडणुकीत ३७० जागा जिंकण्याचे लक्ष्य ठेवल्याचेही सांगितले. तसेच ३७० ही केवळ संख्या नव्हे, तर ही जनसंघाचे संस्थापक श्यामा प्रसाद मुखर्जी यांना वाहिलेली श्रद्धांजली आहे, असेही ते म्हणाले. श्यामा प्रसाद मुखर्जी यांनी जम्मू-काश्मीरमधील कलम ३७० च्या विरोधात आंदोलन करीत हे कलम रद्द करण्याची मागणी केली होती.

हेही वाचा – झारखंड मुक्ती मोर्चाच्या नव्या चेहऱ्याचा उदय; बसंत लोकसभा निवडणुकीत पक्षाचे नेतृत्व करणार

पंतप्रधान मोदी पुढे म्हणाले, “पक्षाच्या प्रत्येक कार्यकर्त्याने आता बूथनिहाय नियोजन करायला हवे. प्रत्येकाने आपल्या बूथवर लक्ष केंद्रित करणे आवश्यक आहे. भाजपा सरकारने १० वर्षांत केलेला विकास आणि सरकारच्या विविध योजनांची माहिती घरोघरी पोहोचवावी. प्रत्येक बूथवरील भाजपाच्या उमेदवाराला ३७० मते जास्त कशी पडतील याचा विचार करावा.”

पंतप्रधान मोदी यांच्यासह भाजपाचे अध्यक्ष जे. पी. नड्डा आणि संरक्षणमंत्री तथा भाजपाचे ज्येष्ठ नेते राजनाथ सिंह यांनीही कार्यकर्त्यांना संबोधित केले. यावेळी भाजपाचे अध्यक्ष जे. पी. नड्डा म्हणाले, “१९५१ पासून आजपर्यंत आपल्या वैचारिक भूमिकेवर ठाम राहणारा भाजपा हा देशातील एकमेव पक्ष आहे. २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत भाजपाने ३०० पेक्षा जास्त जागा जिंकत दणदणीत विजय मिळवला होता. या वेळीही भाजपाने ३७० जागा जिंकण्याचे लक्ष्य ठेवले आहे.”

पुढे बोलताना ते म्हणाले, “२०१४ पूर्वी भाजपाने अनेक पराभव बघितले. आणीबाणीच्या काळातील संघर्षाही बघितला. मात्र, गेल्या १० वर्षांत भाजपाने यशाचे शिखर पार केले आहे. यामागे हजारो कार्यकर्त्यांची मेहनत आहे.” यावेळी बोलताना त्यांनी भाजपाच्या गेल्या चार लोकसभा निवडणुकांतील कामगिऱ्यांचाही उल्लेख केला, ”२००९ मध्ये भाजपाला केवळ १८ टक्के मते मिळाली होती. ती २०१४ मध्ये वाढून ३१ टक्के इतकी झाली. तर, २०१९ मध्ये ती वाढून ३७ टक्क्यांवर पोहोचली.”

त्याबरोबरच त्यांनी भाजपाने गेल्या काही वर्षांत विधानसभा निवडणुकांमध्ये केलेल्या कामगिऱ्यांचेही कौतुक केले. नुकत्याच तेलंगणामध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीत भाजपाने चांगले प्रदर्शन केले. भाजपाच्या मतांची टक्केवारी सातवरून १४ टक्क्यांवर पोहोचली. म्हणजे दुप्पट झाली, असे ते म्हणाले. यावेळी त्यांनी पंतप्रधान मोदी यांचेही कौतुक केलं. अतिशय व्यग्र कार्यक्रमातही पंतप्रधान मोदी पक्षाला प्राधान्य देतात. भाजपाला अधिकाधिक उंचीवर कसे नेता येईल, याचा सतत विचार करीत असतात, अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली.

यावेळी नड्डा यांनी, मोदी सरकारने जाहीर केलेल्या योजनांचीही माहिती दिली. ते म्हणाले “महिलांना राजकीय आरक्षण मिळवून देणारा कायदा तीन दशकांपासून रोखून धरला होता; मात्र मोदी सरकारने तीन दिवसांत तो मंजूर केला. त्याशिवाय पंतप्रधान मोदींनी जम्मू-काश्मीरमधील कलम ३७० ही रद्द केले. तसेच भाजपाचे अयोध्येत राम मंदिर बांधण्याचे देशवासीयांना दिलेले आश्वासनही मोदी सरकारने पूर्ण केले.” भाजपा मंदिर बांधण्याचे आश्वासन देते; मात्र त्याची तारीख सांगत नाही, असे म्हणत विरोधकांनी अनेक वर्षं खिल्ली उडवली. मात्र, ज्यावेळी मंदिर बांधण्याची तारीख निश्चित झाली, त्यावेळी खिल्ली उडविणारे नेते श्रीरामाच्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्यालाही उपस्थित नव्हते. असा टोलाही त्यांनी विरोधकांना लगावला.

हेही वाचा – महाराष्ट्राच्या माजी मुख्यमंत्र्यांनंतर आता मध्यप्रदेशचे माजी सीएम कमलनाथही भाजपाच्या वाटेवर? राजकीय चर्चांना उधाण!

पुढे बोलताना त्यांनी राम मंदिरासाठी लालकृष्ण अडवाणी यांनी दिलेले योगदान अमूल्य असल्याचे म्हणत, त्यांना दिलेल्या ‘भारतरत्न’साठी मोदी सरकारचे आभार मानले. तसेच त्यांनी चौधरी चरणसिंग, कर्पूरी ठाकूर, पी. व्ही. नरसिंह राव व एम. एस. स्वामीनाथन यांनाही भारतरत्न देण्याच्या निर्णयाचे कौतुक केले.

मराठीतील सर्व सत्ताकारण बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Why pm narendra modi said bjps target to win 370 seat will be tribute to syama prasad mookerjee spb