केंद्रीय संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी राजस्थान आणि मध्य प्रदेशमध्ये सोमवारी (४ सप्टेंबर) दोन वेगवेगळ्या सभांमध्ये बोलत असताना २००४ चे दुःख लोकांसमोर मांडले. आपल्या भाषणात इंडिया आघाडीवर टीका करताना ते म्हणाले, “इंडिया आघाडीची परिस्थिती अशी आहे की, नाव मोठे आणि लक्षण खोटे. त्यांनी आघाडीचे नाव इंडिया ठेवले आहे. पण मी त्यांना सांगू इच्छितो की, हे नाव मोठे भयानक (त्यांनी खतरनाक शब्द वापरला) आहे. बंधूंनो आणि भगिनींनो आम्ही देखील ‘शायनिंग इंडिया’ असा नारा दिला होता, पण आमचा पराभव झाला. आता त्यांनी इंडिया हे नाव धारण केले आहे, म्हणजे त्यांचा पराभव निश्चित आहे.”
केंद्रीय मंत्री राजनाथ सिंह यांनी आपल्या भाषणात २००४ च्या पराभवाचा संदर्भ दिला. तत्कालीन पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांच्या नेतृत्वाखालील सरकारला आपण पुन्हा निवडून येऊ असा आत्मविश्वास होता. २००४ सालच्या निवडणुकीत काँग्रेस सर्वात मोठा पक्ष म्हणून पुढे आला. सत्तास्थापन करण्यासाठी यूपीए आघाडी तयार केली गेली. यूपीएने दहा वर्ष केंद्रात सत्ता उपभोगली.
हे वाचा >> ‘इंडिया’ विरुद्ध एनडीए : विरोधकांच्या आघाडीने ‘यूपीए’ नाव का बदलले?
द इंडियन एक्सप्रेसचे दिवंगत पत्रकार आणि राजकीय भाष्यकार इंगप मल्होत्रा यांनी अटल बिहारी वाजपेयी यांच्या नेतृत्वात लढल्या गेलेल्या निवडणुकांचे विश्लेषण केले होते. १९९८ साली वाजपेयी यांच्या पंतप्रधानपदाच्या कार्यकाळात अणूचाचणी पार पडली होती. त्यानंतर अमेरिकेने भारतावर लादलेले निर्बंध हळूहळू मागे घेण्यास सुरुवात केली होती, तसेच भारत अण्वस्त्र धारण करणारा देश म्हणून जाहीर करण्यात आले होते. तसेच १९९९ साली भारताला कारगिल युद्धात पाकिस्तान विरोधात मोठा विजय मिळाला होता. निवडणुकीच्या आधीच्या वर्षी जीडीपीमध्येही चांगली वाढ पाहायला मिळाली, तसेच २००२ च्या गुजरात दंगलीची पार्श्वभूमी असतानाही भाजपाला पुन्हा निवडणुकीत विजय होईल, याची खात्री होती.
दुसरीकडे काँग्रेसलाही निवडणुकीत फारसे यश मिळेल, याची शक्यता वाटत नव्हती. पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांना लोकांची पसंती होती. भाजपाकडे दिवंगत प्रमोद महाजन यांच्यासारखे नेते होते, ज्यांनी प्रचाराची दिशा ठरविली होती. तसेच त्यांना इंडिया शायनिंग मोहिमेचे शिल्पकार मानले जात होते. मल्होत्रा यांनी त्यावेळी आपल्या लेखात लिहिले होते की, लोकांना त्यांच्या टेलिफोनवर “मै अटल बिहारी वाजपेयी बोल रहा हू” असा व्हॉईस रेकॉर्डेड संदेश पाठविला जात होता. त्यावेळी प्रचाराचे असे तंत्र पहिल्यांदाच वापरले गेले होते.
२००४ च्या निवडणुकांआधी काँग्रेस पक्ष सलग आठ वर्ष सत्तेपासून लांब होता. त्याआधी तत्कालीन पंतप्रधान नरसिंहराव यांच्या नेतृत्वाखाली १९९१-१९९६ या काळात काँग्रेसने सत्ता उपभोगली. नरसिंहराव यांच्या काळात उदारीकरण केल्यानंतर अर्थव्यवस्था खुली झाली होती. मात्र याचा १९९६ च्या निवडणुकीत काँग्रेसला लाभ घेता आला नाही. १९९६ नंतर जनता आघाडीची अल्पजीवी सरकारे पाहायला मिळाली. तसेच वाजपेयी यांच्या नेतृत्वाखालील १३ दिवस आणि १३ महिन्यांचेही सरकार पाहायला मिळाले.
शेवटी १९९९ साली लोकसभा निवडणुकीत भाजपाने सरकार स्थापन करण्यात यश मिळवले. १८२ जागांवर विजय आणि २३.७५ टक्के मतदान घेऊन भाजपा सर्वात मोठा पक्ष म्हणून पुढे आला. काँग्रेसने ११४ जागांवर विजय मिळवला होता. त्यांनी २८.३० टक्के मतदान मिळवले होते. भाजपाने घटक पक्षांना सोबत घेऊन सत्ता स्थापन केली. राजनाथ सिंह त्यावेळी वाजपेयी सरकारमध्ये कॅबिनेट मंत्री झाले.
इंडिया शायनिंग प्रचार मोहीम
१९९९ साली सप्टेंबर-ऑक्टोबर महिन्यात लोकसभेच्या निवडणुका पार पडल्या होत्या. त्यामुळे २००४ साल सुरू होताच भाजपाने सहा महिने आधीच लोकसभा निवडणुका घेण्याची घोषणा केली. त्याआधी संपन्न झालेल्या विधानसभा निवडणुकीत भाजपाला चांगले यश मिळाल्यामुळे वाजपेयी सरकारचा आत्मविश्वास दुणावला होता. एप्रिल-मे २००४ रोजी नियोजित वेळापत्रकाच्या सहा महिने आधीच लोकसभा निवडणुका पार पडल्या.
२००४ च्या निवडणुकीत भाजपाने त्यावेळची सर्वात आघाडीची जाहीरात कंपनीला (ग्रे वर्ल्डवाइड) निवडणुकीच्या प्रचाराचे काम दिले होते. प्रचारापोटी या कंपनीवर जवळपास १५० कोटी खर्च केल्याचा अंदाज वर्तविण्यात आला. राजकीय जाणकारांच्यामते, भारतात झालेल्या निवडणुकांपैकी हा तोपर्यंतचा सर्वात मोठा प्रचार होता.
भाजपाचे दिवंगत नेते प्रमोद महाजन यांचे निकटवर्तीय सुधांशू मित्तल यांनी त्यानंतर इंडिया टुडेशी बोलताना सांगितले होते की, भव्य दिव्य प्रचार मोहीम राबविण्यामागे भाजपाचा एक विचार होता. एकतर पक्षाची आंतरराष्ट्रीय प्रतिमा उंचावणे, भारत पुढे जात आहे, असे चित्र रंगवून आंतरराष्ट्रीय गुंतवणूक मिळवणे, असा यामागे हेतू होता.
परंतु, प्रचारात ग्रामीण भागातील पार्श्वभूमीकडे डोळेझाक करून शहरांच्या प्रगतीवर आधारीत एकतर्फी प्रचारावर लक्ष केंद्रीत केल्यामुळे सदर मोहिमेची छाप मतदारांवर पडली नाही.
इंडिया शायनिंग मोहिमेला उत्तर देण्यासाठी काँग्रेसनेही व्यावसायिक कंपन्यांची मदत घेतली होती. भाजपाच्या प्रचाराचा प्रतिरोध करण्यासाठी काँग्रेसकडून भाजपाच्या दाव्यांना एका ओळीत प्रश्न विचारण्यात आला होता. तो म्हणजे, “सामान्य माणसाला काय मिळाले?” (आम आदमी को क्या मिला). काँग्रेसनेही आपल्या जाहीराती मोठ्या खुबीने केल्या होत्या. काँग्रेसच्या जाहीरातींच्या फलकांवर मुद्दमहून रंग वापरण्यात आलेले नव्हते. बाजारातील विश्लेषक सांगतात की, काळ्या – पांढऱ्या रंगातील चित्राखाली घोषवाक्य होते, “काँग्रेस का हात, गरिबों के साथ”
मतदानानंतर एनडीए आघाडीला केवळ १८८ जागा मिळवता आल्या. भाजपाला १३८ जागांवर समाधान मानावे लागले. काँग्रेस आणि यूपीए आघाडीने २१९ जागा मिळवल्या. त्यात काँग्रेसचा एकट्याचा वाटा १४५ एवढा होता. ५३ जागा जिंकणाऱ्या डाव्या पक्षांच्या पाठिंब्यावर काँग्रेसने सरकार स्थापन केले. विशेष बाब म्हणजे, प्रचारात शहरी भागावर लक्ष दिले तरी भाजपाला शहरांमधून फारसा प्रतिसाद मिळाला नाही.