गुजरात विधानसभा निवडणूक प्रचारात पंचमहल जिल्ह्यातील पावागडमधील ११ व्या शतकातील कलिका माता मंदिरांच्या नुतनीकरणाचा मुद्दा बराच गाजत आहे. मंदिर परिसरातील गर्भगृहाच्या माथ्यावर असलेला दर्गा सामंजस्याने हलवून या मंदिराचे नुतनीकरण केल्याचा प्रचार भाजपाकडून करण्यात येत आहे. ५०० वर्षांपूर्वी मंदिराचे शिखर तोडून याठिकाणी आक्रमणकर्त्यांनी दर्गा बांधल्याचा इतिहास आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींपासून केंद्रीय गृहमंत्री अमित शाह, उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्यासह स्टार प्रचारकांच्या भाषणात या मंदिराचा मुद्दा केंद्रस्थानी आहे.
पावागड हे मोदींच्या नेतृत्वाखालील केंद्र सरकारच्या काळात भारताच्या सांस्कृतिक आणि धार्मिक पुर्नस्थापनेचे उदाहरण असल्याचा प्रचार भाजपाकडून केला जात आहे. पावगडमधील कलोल येथील सभेत बोलताना पंतप्रधान नरेंद्र मोदींनी या मंदिरावरून काँग्रेसवर निशाणा साधला. “पूर्वी शिखराशिवाय पावागड मंदिर पाहणे हा हृदय पिळवटून टाकणारा अनुभव असायचा. आक्रमणकर्त्यांनी ५०० वर्षांपूर्वी केलेला हा अपमान होता. पावागड बदलण्याची मी प्रतिज्ञा केली होती. काँग्रेसच्या काळात पावागड अस्तित्वात नव्हता का? पण मला दिसणारी या शक्तीपिठाची ताकद त्यांना दिसली नाही. गुजराती लोकांच्या श्रद्धेचा अपमान थांबवण्यासाठी आम्ही एक मोहीम हाती घेतली”, असे मोदी या सभेत म्हणाले.
आनंद जिल्ह्यातील पावागड मंदिराबाबत बोलताना मोदी यांनी शुक्रवारी नव्याने हल्ला चढवताना काँग्रेसची गुलामगिरीची मानसिकता असल्याचा आरोप केला. “काँग्रेसची मानसिकता गुलामगिरीची असल्याचे अनेक उदाहरणं आहेत. त्यातील एक म्हणजे पावागडमधील कालिका मंदिर जे ५०० वर्षांपूर्वी आक्रमणकर्त्यांनी उद्ध्वस्त केले होते. त्यांनी महाकाली मंदिर फोडून त्याचे शिखर नष्ट केले होते. ५०० वर्षे शिखराची पुनर्बांधणी झाली नाही, शिवाय ध्वजही फडकवण्यात आला नाही. स्वातंत्र्यानंतर काँग्रेसने या मंदिरांची पुनर्बांधणी करायला नको होती का? गुलामगिरीची त्यांची मानसिकता त्यांना देशाच्या धर्माबद्दल अभिमान बाळगण्याची परवानगी देत नाही”, असा हल्लाबोल मोदींनी यावेळी केला.
अहमदाबाद येथील आर्किटेक्ट आशिष सोमपुरा यांनी हे मंदिर आणि येथील दर्गा पुन्हा बांधला आहे. सोमपुरा हेच अयोध्येतील राम मंदिराची निर्मितीही करत आहेत. पूर्वी महाकाली मंदिराच्या गर्भगृहाच्या माथ्यावर असलेला हा दर्गा याच परिसरात ५० फुटांवर हलवण्यात आला आहे.
कलिका मंदिराचा इतिहास…
चंपानगरातील हे मंदिर पूर्वी सम्राट पृथ्वीराज चौहान यांच्या राजपूत वंशजांच्या पूर्ववर्ती राज्याचा एक भाग होते. १५ व्या शतकात सुल्तान महमूद बेगडाने चंपानेर जिंकुन या ठिकाणी आपली राजधानी स्थापन केली. या सुल्तानाने मंदिराचा शिखर नष्ट केला. दरम्यान, आता या ऐतिहासिक ठिकाणाला युनेस्कोने जागतिक वारसा स्थळ म्हणून घोषित केले आहे.