राजेश्वर ठाकरे

नागपूर : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना लक्ष्य करणाऱ्या अमरावतीच्या खासदार नवनीत राणा व त्यांचे पती आमदार रवी राणा यांच्या विरोधात मुंबईत शिवसैनिक आक्रमक झाले होते. पण याच राणा दाम्पत्याच्या नागपुरातील हनुमान चालिसा पठणाच्यावेळी मात्र येथील शिवसैनिक गप्प होते. विशेष म्हणजे, राष्ट्रवादी काँग्रेसने राणा यांच्या विरोधात आंदोलन केले. शिवसैनिक तिकडे फिरकले सुद्धा नाहीत. त्यामुळे येथील शिवसैनिकांच्या गप्प राहण्या मागे कारणे काय? याबाबत राजकीय वर्तुळात तर्कवितर्क लावले जात आहेत.

मुंबईत मातोश्रीवर हनुमान चालिसा पठण करण्याचा इशारा दिल्यानंतर नवनीत राणा आणि आमदार रवी राणा यांच्याविरुद्ध तेथील शिवसैनिकांनी त्यांच्या विरोधात जोरदार आंदोलन केले होते. त्यांनी मातोश्रीवर येऊ नये म्हणून खार येथील त्यांच्या निवासस्थानापुढे हजारो शिवसैनिकांनी ठिय्या दिला होता. यापुढेही जशास तसे उत्तर दिले जाईल, असा संदेश शिवसैनिकांनी दिला होता. या प्रकरणात राणा दाम्पत्याला तुरुंगातही जावे लागले. या सर्व नाट्यमय घडामोडीनंतर राणा दाम्पत्याने जामीन मिळाल्यानंतर दिल्ली गाठली. तेथून मतदारसंघात (अमरावती) परतताना नागपुरात हनुमान चालिसा पठण करण्याची घोषणा केली. त्यामुळे येथे देखील शिवसैनिक मुंबईसारखाच विरोध करतील, असे वाटत होते. परंतु नागपुरात त्यांनी नेमकी उलट भूमिका घेत गप्प राहणे पसंत केले. उलट राष्ट्रवादी काँग्रेसने राणा यांच्या विरोध करण्यासाठी महागाईच्या विरोधात हनुमान चालिसा पठण केले. नागपुरात राष्ट्रवादी व शिवसेनेची ताकद मर्यदितच आहे. पण जी संधी राष्ट्रवादीने साधून माध्यमांचे लक्ष वेधून घेतले तेच शिवसेनेलाही करता आले असते, परंतु एकही शिवसैनिक राणांना विरोध करण्यासाठी आला नाही. विशेष म्हणजे, आंदोलनस्थळी राणा दाम्पत्याने चक्क मुख्ममंत्री आणि शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर कठोर शब्दात टीका केली. याचा साधा निषेध किंवा टीकेला उत्तरही येथील शिवसेना नेत्यांनी दिले नाही. याबाबत आश्चर्य व्यक्त केले जात आहे.

नागपूर शहरात शिवसेनेत गटबाजी आहे. जुने विरुद्ध नवे असा वाद आहे. नव्याने शिवबंधन बांधलेल्यांना शिवसेनेच्या अस्मितेबद्दल फार ममत्व नाही. तर जुने शिवसैनिक अडगळीत पडले आहेत. याची जाणीव झाल्यानंतर पक्ष नेतृत्वाने नेत्यांमधील मतभेद मिटवण्यासाठी संघटनेत काही फेरबदलही केले. शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनीही नागपुरात येऊन पक्षबांधणीत लक्ष घातले आहे होते. परंतु शिवसैनिक म्हणून जी आक्रमकता मुंबईत दिसली, तशी नागपुरात राणा यांच्या दौऱ्यादरम्यान दिसून आली नाही. त्यामुळे शिवसेनेचा राणा दाम्पत्याला असलेला कडवा विरोध मुंबईपुरताच आहे का? अशी शंका घेतली जात आहे.

Story img Loader