स्वपक्षीय नेते गजानन कीर्तीकर यांचा केलेला पाणउतारा, मित्र पक्ष भाजपवर शिवसेना संपवित असल्याचा केलेला आरोप, यापूर्वी देवेंद्र फडणवीस यांच्यावर केलेली शेरेबाजी एवढे सारे होऊनही शिवसेना नेते रामदास कदम यांचे द्वितीय पुत्र सिद्धेश कदम यांची महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आल्याने रामदासभाईचे एवढे उपद्रवमूल्य कशामुळे, असा प्रश्न सत्ताधारी महायुतीत केला जात आहे.
उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील महाविकास आघाडी सरकारमध्ये रामदास कदम यांना मंत्रिपदाची संधी मिळाली नव्हती. तेव्हापासून कदम हे नाराजी व्यक्त करू लागले. कधी जाहीरपणे त्यांनी नाराजी व्यक्त केली होती. अलीकडे कदम यांनी पुन्हा एकदा वाद निर्माण केला. मित्र पक्ष भाजपवरच त्यांनी टीका केली. ‘विश्वासघात करीत केसाने गळा कापण्याचा उद्योग करू नका’, अशा शब्दांत रामदास कदम यांनी भाजपला फटकारले. यावरून भाजपमध्येही संतप्त प्रतिक्रिया उमटली. ‘रामदास कदम यांनी सनसनाटी करण्याची अशी जुनीच सवय आहे’ अशा शद्बांत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रत्युत्तर दिले.
हेही वाचा : Loksabha Poll 2024 : ज्येष्ठांवर जबाबदारी, दक्षिणेवर भर- काँग्रेसच्या पहिल्या यादीचे संकेत
काही महिन्यांपूर्वी उत्तर पश्चिम मुंबई मतदारसंघाचे शिवसेनेचेच खासदार गजानन कीर्तीकर यांच्यावर रामदास कदम यांनी आरोप केले होते. किर्तीकर हे पक्षाशी इमान राखणारे नाहीत, अशी शेरेबाजी केली होती. यावरून किर्तीकर यांनीही कदम यांना फटकारले होते. शेवटी या वादात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना मध्यस्थी करावी लागली होती. उत्तर पश्चिम लोकसभा मतदारसंघातून द्वितीय पुत्र सिद्धेश कदम यांना पक्षाने उमेदवारी द्यावी, अशी कदम यांची मागणी होती. यावरून किर्तीकर आणि कदमांमध्ये वाद झाला होता. याच सिद्देश कदम यांची प्रदुषण नियंत्रण मंडळाच्या अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली होती. प्रदुषण नियंत्रण मंडळाच्या अध्यक्षांना या क्षेत्रात काम करण्याचा पूर्वानुभव आवश्यक असल्याची अट आहे. पण कदम पुत्रासाठी नियमांना बगल देण्यात आल्याचा आरोप विधानसभेतील विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी केला आहे.
राज्यात देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली सरकारमध्ये शिवसेना सहभागी असताना रामदास कदम यांनी फडणवीस यांच्यावर आरोप केले होते. रामदास कदम यांची टीका आणि शेरेबाजीमुळे संतप्त झालेल्या फडणवीस यांनी रामदास कदम यांचा पगार किती व बोलतात किती, असे प्रत्युत्तर दिले होते. शिवसेनेचे मंत्री खिशात राजीनामे घेऊन फिरतात असे कदम यांनीच सांगितले होते. त्यावरून शिवसेनेच्या मंत्र्यांना तेव्हा राजीनामे खिशातून बाहेर कधी येणार, असा सवाल केला जात असे.
हेही वाचा : तटकरे यांच्या मतदारसंघावर गोगावले पुत्राचा दावा
नारायण राणे यांच्या बंडानंतर विरोधी पक्षनेतेपदाची संधी शिवसेनेने रामदास कदम यांच्यावर सोपविली होती. २००९च्या विधानसभा निवडणुकीतील पराभवानंतर कदम हे शिवसेने सोडण्याच्या तयारीत असल्याचे प्रसिद्ध झाले होते. रामदास कदम तेव्हा राष्ट्रवादीच्या संपर्कात होते पण राष्ट्रवादीने त्यांना मंत्रिपद देण्यास नकार दिला होता, असेही तेव्हा सांगण्यात येत असे. महाविकास आघाडी सरकारमध्ये मंत्रिपद न मिळाल्याने संतप्त झालेल्या कदम यांनी अनिल परब यांच्यावर आरोप केले होते. किरीट सोमय्या यांना रामदास कदम यांनीच माहिती पुरविल्याची ध्वनिफीतही तेव्हा प्रसिद्ध झाली होती. स्वपक्षीय नेत्यांचा पाणउतारा कर, मित्र पक्षांवर जाहीरपणे आरोप करणे, स्वपक्षीय नेत्यांना अडचणीत आणणे असे उद्योग करणाऱ्या रामदास कदम यांच्याबाबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे एवढे नमते का घेतात, असा सवाल केला जात आहे. रामदासभाईंचे एवढे उपद्रवमुल्य आहे का, असाच शिवसेने नेत्यांना प्रश्न पडला आहे.