संसदेत बोलताना तेलगू देसम पक्षाचे गुंटूरचे खासदार गल्ला जयदेव यांनी पंतप्रधान मोदींचं कौतुक केलं आहे. पंतप्रधान मोदी यांनी त्यांच्या कामाने देशाला एका वेगळ्या उंचीवर नेले असल्याचे ते म्हणाले. विशेष म्हणजे २०१८ पासून सातत्याने केंद्र सरकारवर टीका करणाऱ्या तेलगू देसम पक्षाच्या (टीडीपी) खासदाराने पंतप्रधान मोदींचे कौतुक केल्याने आता विविध राजकीय चर्चांना उधाण आहे.

तेलगू देसम पक्षाचे गुंटूरचे खासदार गल्ला जयदेव यांनी गेल्या आठवड्यात राजकारणातून काही काळासाठी विश्रांती घेत असल्याची घोषणा केली होती. त्यामुळे त्यांनी सोमवारी संसदेत शेवटचे भाषण केले. ते म्हणाले, “अयोध्येत राम मंदिर बांधल्याबद्दल मी पंतप्रधान मोदी यांचे अभिनंदन करतो. हे मंदिर बांधून त्यांनी पुन्हा एकदा भारतीय संस्कृती परिभाषित केली आहे. संपूर्ण देश त्यांचा ऋणी आहे. हिंदूचे ५०० वर्ष जुने स्वप्न साकार झाले आहे.”

हेही वाचा – कार्ती चिदंबरम यांना शिवगंगा मतदारसंघातून हटवण्याची मोहीम; अनेक नेते नाराज, तमिळनाडू काँग्रेसमध्येही पडणार फूट?

ते पुढे बोलताना म्हणाले, “आज भारत जगातील तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था होण्याच्या मार्गावर आहे. पंतप्रधान मोदींनी आपल्या देशाला जी-२० मध्ये सर्वात वेगाने वाढणारी अर्थव्यवस्था बनवली आहे. २५ टक्के लोकांना गरिबीतून बाहेर काढले आहे. तसेच आज ८० टक्के लोकांना मोफत अन्न मिळते आहे. आज देशातील परकीय चलन साठ्यात मोठी वाढ झाली आहे. मोदी सरकारकडून डिजिटल इंडियावर भर दिला जातो आहे. आज जगातील एकूण डिजिटल व्यवहारांपैकी ४६ टक्के व्यवहार भारतात होतात. थेट हस्तांतरण प्रणालीद्वारे जवळपास ३४ कोटी लोकांना फायदा झाला आहे. त्यामुळे भ्रष्टाचारातही घट झाली आहे”

यावेळी बोलताना त्यांनी पोलावरम प्रकल्पासाठीच्या निधीवाटपाला होत असलेला विलंबाबाबत नाराजीही व्यक्त केली. तसेच आंध्र प्रदेशला लवकरात लवकर विशेष राज्याचा दर्जा द्यावा, अशी मागणीही त्यांनी केली. याबरोबर एआयच्या संभाव्य धोक्याबाबत सरकारला सावधही केले.

दरम्यान, गल्ला जयदेव यांनी काही काळासाठी राजकारणातून विश्रांती घेत असल्याच्या निर्णयाचा पुनर्उच्चारही केला. ते म्हणाले, “मी राजकीय नेत्याबरोबरच उद्योपतही आहे. माझ्या मते उद्योगपती हे राजकीय प्रक्रियेचा एक भाग असतात. त्यांच्यामुळे अर्थव्यवस्थेला चालना मिळते. त्यांना आवश्यक असेल तेव्हा सरकार विरोधात मत मांडण्याचे स्वातंत्र्य असले पाहिजे. त्या कारणासाठी त्यांच्यावर कोणतीही कारवाई होणार नाही, हे संसदेने सुनिश्चित केले पाहिजे. सध्या विविध मर्यादांमुळे मी एकाच वेळी राजकारण आणि व्यवसाय करू शकत नाही. त्यामुळे मी काही दिवस राजकारणातून विश्रांती घेण्याचा निर्णय घेतला आहे”

हेही वाचा – उत्तराखंडच्या विधानसभेत UCC विधेयक सादर, काँग्रेसचा विरोध; नियमांचे उल्लंघन केले जात असल्याचा आरोप!

विशेष म्हणजे, गल्ला जयदेव यांनी मोदींच कौतुक अशा वेळी केलंय, जेव्हा तेलगू देसम पक्ष एनडीएमध्ये येण्यास इच्छूक असल्याची चर्चा सुरू आहे. तसेच तेलगू देसम पक्षाचे प्रमुख चंद्राबाबू नायडू यांनी युतीत सहभागी होण्याबाबतचा निर्णय जाहीर करण्यास भाजपा उशीर करत असल्याचा आरोप करत, जनसेना पक्षाबरोबर जागावाटप निश्चित केलं आहे.