काँग्रेसच्या राष्ट्रीय सरचिटणीस प्रियांका गांधी वाड्रा या केरळ जिल्ह्याच्या वायनाड लोकसभा मतदारसंघातून निवडून आल्या आहेत. राहुल गांधी दोन वेळा याच मतदारसंघातून निवडून आले होते. वायनाडमध्ये काँग्रेसचे संघटन मजबूत असल्याचे बोलले जाते. मात्र, वायनाडचे स्थानिक काँग्रेस नेते एन. एम. विजयन आणि त्यांचा ३८ वर्षांचा मुलगा जिजेशने आत्महत्या केल्यानंतर काँग्रेससमोर संकट उभे राहिले आहे. राज्यातील मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष (सीपीआय-एम) आणि भाजपाने या आत्महत्येचा संबंध ‘कॅश फॉर जॉब’ घोटाळ्याशी लावला आहे. सहकारी बँकेत नोकरी मिळवून देण्याचे खोटे आश्वासन देत वरिष्ठ काँग्रेस नेत्यांनी घोटाळा केल्याचा आरोप केला जात आहे.
सीपीआय (एम)चे जिल्हा सचिव के. रफिक यांनी या प्रकरणाची मुळापासून चौकशी करण्याची मागणी केली आहे. काँग्रेसचे आमदार आय. सी. बाळकृष्णन आणि काँग्रेसच्या इतर नेत्यांवर आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी गुन्हा दाखल झाला पाहिजे, असे ते म्हणाले. “काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांनी सहकारी बँकेत नोकरी देण्याच्या बदल्यात अनेकांकडून रोख रक्कम घेतली; मात्र त्यांना नोकरी दिली नाही. त्यामुळेच विजयन यांच्याकडून उमेदवार पैसे परत देण्याची मागणी करीत होते. या दबावामुळे विजयन आणि त्यांच्या मुलाने आत्महत्या केली”, असाही आरोप रफिक यांनी केला.
हे वाचा >> प्रियांका गांधी लोकसभेत; गांधी घराण्याचा संसदीय इतिहास जाणून घ्या
कोण आहेत विजयन?
विजयन हे वायनाडमधील काँग्रेसचे ज्येष्ठ नेते होते. त्यांनी सुलतान बथरी पंचायतीचे अध्यक्षपद आणि नंतर नगरसेवक पदही भूषविले होते. वायनाड जिल्हा काँग्रेसचे खजिनदार ७८ वर्षीय विजयन आणि त्यांचा मुलगा जिजेश यांनी मंगळवारी विष प्राशन केले. शुक्रवारी दोघांचा कोझिकोड येथील सरकारी रुग्णालयात मृत्यू झाला. सुलतान बथरी जिल्ह्याचे पोलीस उपअधीक्षक के. के. अब्दुल शरीफ यांनी सांगितले की, आत्महत्येप्रकरणी कोणतीही सुसाईड नोट आढळून आलेली नाही किंवा कुटुंबाकडूनही कुणी तक्रार केलेली नाही. विजयन कुटुंबीयांच्या जवळच्या व्यक्तीने सांगितले की, विजयन यांच्या पत्नीचा मृत्यू काही वर्षांपूर्वी झाला. तेव्हापासून ते एकाकी होते. तसेच त्यांचा मुलगा जिजेश याला अपघात झाल्यापासून तोही अंथरुणाला खिळला होता. जिजेशही याच सहकारी बँकेतील कर्मचारी होता; मात्र अपघातानंतर त्याने नोकरी सोडली होती.
केरळचे भाजपा प्रदेशाध्यक्ष के. सुरेंद्रन यांनी मागणी केली की, बाळकृष्णन यांना अटक करायला हवी. सहकारी बँकेत झालेल्या घोटाळ्यात पिता-पुत्र बळी पडले आहेत. ज्या लोकांनी नोकरीसाठी पैसे दिले, त्यांच्या तक्रारींनुसार गुन्हा दाखल केला पाहिजे, असेही ते म्हणाले.
नेमका घोटाळा काय आहे?
सुलतान बथरी जिल्ह्यातील सहकारी बँकेवर काँग्रेसचे नियंत्रण आहे. या बँकेवर २०१९ पासून भ्रष्टाचाराचा आरोप होत आहे. सीपीआय (एम) आणि भाजपाने आरोप केला की, काँग्रेस नेत्यांच्या सांगण्यावरून विजयन यांनी भ्रष्टाचाराची रक्कम उमेदवारांकडून स्वीकारली. या आरोपांबाबत कधीही औपचारिक तक्रार दाखल करण्यात आली नव्हती. मात्र, विजयन यांनी स्वाक्षरी केलेले एक पत्र समोर आल्यानंतर काँग्रेसच्या अडचणी वाढल्या.
आमदार बाळकृष्णन यांचे नाव असलेल्या पत्रात म्हटले आहे की, सुलतान बथरी येथील सहकारी बँकेत नोकरीसाठी ३० लाख रुपये देण्यात आले. तसेच विजयन यांनी जिल्ह्याचे पक्षाचे कोषाध्यक्ष या नात्याने त्यांनी पैसे स्वीकारले. तसेच नोकरी न दिल्यास उमेदवाराला पैसे परत देण्याचे आश्वासन यात दिले गेले होते.
काँग्रेसने आरोप फेटाळले
भाजपा आणि कम्युनिस्ट पक्षाने केलेले आरोप काँग्रेसचे आमदार बाळकृष्ण यांनी फेटाळून लावले. ते म्हणाले की, सदर पत्र खोटे आहे. चौकशीनंतर खरे काय ते समोर येईल. मी बँकेचा अध्यक्ष असताना भ्रष्टाचाराच्या विरोधात कडक पावले उचलली होती. माझ्यापर्यंत एकही उमेदवार आलेला नाही. मी या आरोपांच्या विरोधात पोलिसांत तक्रार दाखल करणार आहे. पोलीस चौकशीतून खरे गुन्हेगार समोर येतील.
वायनाडचे विद्यमान काँग्रेस अध्यक्ष एन. डी. अप्पाचन म्हणाले की, राज्य सरकारने या घटनेची आणि संबंधित आरोपांची चौकशी करावी, अशी मागणी आम्ही करीत आहोत. तसेच काँग्रेस पक्षही आपल्या स्तरावर या आत्महत्येची चौकशी करणार आहे. शेवटी सत्य बाहेर येणे हे पक्षासाठीही महत्त्वाचे आहे.