नागपूर : महाविकास आघाडीत वादाचा मुद्दा ठरलेली दक्षिण नागपूरची जागा शिवसेनेसाठी (ठाकरे) महत्वाची का ? असा सवाल राजकीय वर्तुळात चर्चीला जात आहे. राज्याच्या उपराजधानीत किमान एक तरी जागा शिवसेनेने लढवावी तसेच संघ मुख्यालय असलेल्या दक्षिण नागपुरात सेनेचा भगवा फडकावून भाजपला जशास तसे उत्र द्यावे हा हेतू शिवसेनेच्या आग्रहामागे असल्याचे समजते.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

दक्षिण नागपूर या मतदारसंघात बहुतांश जुन्या नागपूरचा व काही नव्या नागपूरमधील वस्त्यांचा समावेश होतो. राष्ट्रीय स्वंयसेवक संघाचे मुख्यालयही याच मतदारसंघात येते. कुणबी, माळींसह बहुसंख्येने असलेला इतर मागासवर्गीय समाज तसेच दलित समाज या मतदारसंघात आहे. भाजपची एकसंघशिवसेनेशी युती असतानाही शिवसेनेने दक्षिण नागपूरची मागणी केली होती. पण भाजपने ती फेटाळली होती. त्यानंतर स्वतंत्रपणे शिवसेना या मतदारसंघात लढली. शिवसेनेचे नेटवर्क या भागात आहे. या पक्षाचे नेते प्रमोद मानमोडे या मतदारसंघातून शिवसेनेकडून लढण्यास इच्छुक आहे. ते कुणबी समाजाचे प्रतिनिधीत्व करतात. सहकारी संस्था , सहकारी बँक आणि इतरही संस्थांचे त्यांनी जाळे विणले असल्याने त्यांचा या मतदारसंघात चांगला जनसंपर्क आहे. अनेक वर्षांपासून ते सामाजिक क्षेत्रात काम करीत आहे. यापूर्वी त्यांनी येथून निवडणूक लढवली आहे. शिवसेनेसाठी ही जागा सुटली तर मानमोडे हेच सेेनेचे उमेदवार असतील , असे सांगितले जाते.

हेही वाचा : ‘अहेरी’च्या जागेवरून युती-आघाडीत पेच? आत्राम राजघराण्यात टोकाचा राजकीय संघर्ष

राज्याची राजधानी मुंबईत शिवसेनेचा दबदबा आहे. त्याच प्रमाणे उपराजधानीत या पक्षाला आपले अस्तित्व कायम ठेवायचे आहे. त्यामुळे त्यांनी नागपूरमध्ये सहापैकी फक्त एका जागेची (दक्षिण नागपूर) मागणी केली आहे. भाजपला रोखायचे असेल तर त्याची सुरूवात नागपूरमधूनच करावी हा यामागे शिवसेनेचा हेतू असल्याचे या पक्षाचे नेते सांगतात. नागपूर जिल्ह्यातील रामटेक लोकसभा मतदारसंघ हा शिवसेनेचा बालेकिल्ला म्हणून ओळखला जात होता. २०२४ मध्ये शिवसेनेने ही जागा काँग्रेसच्या आग्रहास्तव सोडली.तेथे सध्या काँग्रेसचा खासदार आहे. त्यामुळे काँग्रेसने आता शिवसेनेसाठी नागपूर शहरातील एक जागा सोडावी, असे शिवसेनेचे म्हणणे आहे. हीच मागणी उद्धव ठाकरे यांनी त्यांच्या नागपूर दौऱ्यात केली होती आणि हीच भूमिका संजय राऊत यांनी जागा वाटपाच्या बैठकीत मांडली होती. मात्र कॉंग्रस ही जागा सोडायला तयार नाही. दहा वर्षापासून या मतदारसंघात भाजपचा उमेदवार विजयी होत आहे. काँग्रेस सातत्याने येथे पराभूत होत आहे. त्यामुळे काँग्रेसचा या जागेवरचा आग्रह संयुक्तिक नाही, असे शिवसेना नेत्यांचे म्हणणे आहे.

मराठीतील सर्व सत्ताकारण बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Why uddhav thackeray shivsena interested to contest nagpur south assembly constituency print politics news css