Himani Narwal : हिमानी नरवाल या तरुणीचा मृतदेह रोहतक या ठिकाणी एका बॅगेत बेवारस अवस्थेत आढळून आला होता. शनिवारी या घटनेने हरियाणातलं रोहतक हादरलं. त्यानंतर या मृतदेहाची ओळख पटवण्यासाठी दुपार झाली. दरम्यान या प्रकरणात आता आरोपीला अटक झाली आहे. शनिवारपासून पुढच्या ७२ तासांमध्ये काय काय घटना घडल्या जाणून घेऊ.
रविवारी काय घडलं?
हरियाणातल्या रोहतक या ठिकाणी शनिवारी सकाळी ११ च्या दरम्यान बस स्थानकावर लोकांची गर्दी जमा झाली होती. त्यावेळी अचानक एकाने निळ्या रंगाच्या सुटकेसकडे पाहिलं. ही सुटकेस रस्त्याच्या कडेला अशीच ठेवण्यात आली होती. कुतुहल असल्याने काही लोक जवळ गेले, मात्र त्यांना काहीसा संशय आल्याने त्यांनी तातडीने पोलिसांना याबाबत माहिती दिली. दरम्यान पोलीस आले आणि त्यांनी ही सूटकेस उघडली तेव्हा त्यांनाही धक्काच बसला कारण या सूटकेसमध्ये एका तरुणीचा मृतदेह होता. हातावर मेहंदी, गळ्यात काळ्या रंगाची ओढणी, पांढरा टॉप आणि लाल रंगाची पँट. या युवतीचा मृतदेह पाहून असं वाटत होतं की गळा दाबून तिला ठार करण्यात आलं आहे त्यानंतर मृतदेह सूटकेसमध्ये ठेवून फेकला आहे. पोलिसांनी तातडीने या ठिकाणी फॉरेन्सिक पथकाला बोलवलं. शनिवारी दुपारपर्यंत ही तरुणी कोण हे समजलं नव्हतं. मात्र नंतर हा मृतदेह काँग्रेसच्या महिला कार्यकर्त्या हिमानी नरवाल (Himani Narwal ) यांचा असल्याची माहिती समोर आली.
ओळख कशी पटली?
काही लोकांनी मृतदेहाचा फोटो सोशल मीडियावर पोस्ट केला. ज्यानंतर तो व्हायरल झाला. याबाबतची माहिती रोहतकचे आमदार बीबी बात्रा यांना मिळाली. त्यांनी या तरुणीची ओळख पटवली आहे. हिमानी नरवाल ही काँग्रेसमध्ये सक्रीय होती. पक्षाच्या प्रत्येक कार्यक्रमात, आंदोलनात हिरीरीने सहभाग घेत होती. हिमानीने राहुल गांधींच्या भारत जोडो यात्रेतही अनेकदा सहभाग घेतला होता. राहुल गांधींबरोबरचे तिचे फोटोही सोशल मीडियावर व्हायरल झाले होते. याच हिमानी नरवाल ( Himani Narwal ) यांचा मृतदेह रोहतक या ठिकाणी बॅगेत आढळून आल्याने खळबळ उडाली आहे. या प्रकरणी उच्चस्तरीय चौकशी झाली पाहिजे अशी मागणी काँग्रेस पक्षाने केली आहे.
हिमानीच्या आईने काय आरोप केला आहे?
“माझ्या मुलीने काँग्रेससाठी खूप त्याग केला. काँग्रेस पक्षाचे सदस्य आमच्या घरी यायचे. पक्षातील काही लोक या हत्येत सहभागी असू शकतात. कारण हिमानीच्या वाढत्या राजकीय कारकिर्दीमुळे त्यांना धोका वाटला असावा. २७ फेब्रुवारी रोजी आपल्या मुलीशी शेवटचं बोलणं झालं. तसेच हिमानी एका दिवसानंतर भूपिंदर सिंग हुडा यांच्या रॅलीत सहभागी होणार होती. मात्र, दुसऱ्या दिवशी हिमानीला फोन करण्याचा प्रयत्न केला असता तिचा फोन बंद होता. गेल्या १० वर्षांपासून हिमानी काँग्रेसबरोबर काम करत होती. भारत जोडो यात्रेदरम्यान काँग्रेसचे खासदार राहुल गांधी यांच्याबरोबर हिमानीने सहभाग घेतला होता. तिला स्वच्छ राजकारण करायचं होतं. पण काही लोक तिला अडचणीत अडकवू इच्छित होते.”
पोलिसांनी नेमकी काय माहिती दिली?
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सचिन आणि हिमानी यांची फेसबुकवर ओळख झाली होती. सचिन हिमानीला भेटण्यासाठी अधूनमधून तिच्या घरी येत होता. २७ फेब्रुवारी रोजी रात्री ९ वाजता सचिन हिमानीला भेटण्यासाठी तिच्या घरी आला होता. रात्री तो तिच्याच घरी थांबला. दुसऱ्या दिवशी (२८ फेब्रुवारी) दोघांमध्ये कोणत्या तरी कारणावरून भांडण झाले. भांडण इतके विकोपाला गेले की, सचिनने हिमानीला तिच्याच ओढणीने बांधले आणि त्यानंतर मोबाइल चार्जरने गळा दाबून तिचा खून केला. दोघांच्या झटापटीत सचिनच्या हातालाही दुखापत झाली. त्याच्या रक्ताचे डाग हिमानीच्या घरात आढळून आले आहेत.
हत्येनंतर पुरावे नष्ट करण्याचा प्रयत्न
हत्या झाल्यानंतर सचिनने पुरावे नष्ट करण्याचा प्रयत्न केला होता. ज्या चादरीवर सचिनचे रक्त सांडले होते. त्या चादरीतच हिमानीचा मृतदेह गुंडाळून सुटकेसमध्ये भरण्यात आला. त्याने हिमानीची अंगठी, सोन्याची चैन, मोबाइल, लॅपटॉप, इतर दागिने एका बॅगेत भरले आणि तिची दुचाकी घेऊन तो स्वतःच्या गावी बहादुरगड येथे निघून गेला. रात्री १० वाजता तो पुन्हा हिमानीच्या घरी परतला. तिची दुचाकी घराबाहेर उभी केली आणि एक रिक्षा भाड्याने घेऊन त्यात मृतदेहाची बॅग टाकली. रात्री ११ वाजण्याच्या सुमारास रोहतकच्या सांपला येथे निर्जन स्थळी बॅग फेकून दिली.
१ मार्चला सांपला बस स्टँड असलेली मृतदेह घरात असलेली बॅग आढळली होती
१ मार्च रोजी सांपला बस स्टँड येथे पोलिसांना मृतदेह असलेली बॅग आढळून आली. त्यानंतर पोलिसांनी तात्काळ विशेष तपास पथक नेमून चौकशी सुरू केली. सचिनला दिल्लीतून अटक करण्यात आली. त्याच्याकडून हिमानीच्या सर्व वस्तू हस्तगत करण्यात आल्या. पोलिसांनी सांगितल्यानुसार, आरोपी सचिनच्या हातावर ओरखडण्याच्या आणि चावा घेतल्याच्या जखमा आढळून आल्या आहेत. सचिनच्या अटकेनंतर हिमानीच्या भावाने आरोपीला फाशी देण्यात यावी, अशी मागणी केली आहे. हिमानीचा भाऊ जतीनने म्हटले की, आरोपीला अटक झाल्यानंतर आज आम्ही हिमानीच्या मृतदेहावर अंत्यसंस्कार करत आहोत. माध्यमात बऱ्याच वावड्या उठल्या आहेत. त्यामुळे आमची सर्वांना विनंती आहे की, कृपया चुकीची माहिती पसरवू नका. आम्हाला नक्कीच न्याय मिळेल. आरोपीला फाशी व्हावी, अशी आमची मागणी आहे असं हिमानीच्या भावाने म्हटलं आहे.