तेलंगणाचे के. चंद्रशेखर राव किंवा तमिळनाडूचे स्टॅलिन या दोन मुख्यमंत्र्यांचे पुत्र त्यांच्या मंत्रिमंडळात मंत्री आहेत. उद्धव आणि आदित्य ठाकरे यांची जोडी होतीच. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे पुत्र डॉ. श्रीकांत शिंदे हे खासदार आहेत. या सर्व आजी-माजी मुख्यमंत्र्यांच्या मुलांच्या राजकीय महत्त्वाकांक्षेपोटी वडील अडचणीत आल्याची उदाहरणे आहेत. खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या अति राजकीय महत्त्वाकांक्षेपोटीच सध्या शिवसेनेच्या शिंदे गटाचे ठाणे जिल्ह्यात भाजपशी बिनसले आहे. ही कटुता एवढी टोकाला गेली की, श्रीकांत शिंदे यांनी मला उमेदवारी दिली नाही तरी… अशी भाषा वापरावी लागली.
‘मुलाचे पाय पाळण्यात दिसतात’ ही प्रचलीत म्हण राजकीय नेत्यांच्या मुलांबाबत लागू पडते. स्टॅलिन, अशोक चव्हाण, ओमर अब्दुल्ला, मेहबुबा मुफ्ती, हेमंत सोरेन, जगन मोहन रेड्डी, कुमारस्वामी आदी जुन्या काळातील नेत्यांच्या मुलांना मुख्यमंत्रिपद भूषविण्याची संधी मिळाली. महाविकास आघाडीचे सरकार असताना आदित्य ठाकरे यांना अधिकचे महत्त्व मिळत असे. त्यांच्या खात्यांना झुकते माप दिले जायचे. अगदी ते पालकमंत्री होते त्या मुंबई उपनगर जिल्ह्याच्या वार्षिक योजनेत भरीव वाढ करण्यात आली होती. आदित्य ठाकरे यांची जागा घेण्याचा सध्या डॉ. श्रीकांत शिंदे प्रयत्न करीत आहेत. सत्ताबदल झाल्यावर सुरुवातीला श्रीकांत शिंदे हे पडद्यामागून महत्त्वाची भूमिका बजावित होते. पण गेल्या तीन-चार महिन्यांपासून ते अधिक सक्रिय झालेले दिसतात. शिंदे गटाचे मंत्री, आमदार व अन्य नेते त्यांच्या मतदारसंघात श्रीकांत शिंदे यांचे दौरे आयोजित करीत आहेत.
हेही वाचा – औरंगजेबाच्या कबरीवरून एमआयएम आणि ठाकरे गट समान पातळीवर
मुंबईत पक्ष संघटना वाढविण्यासाठी खासदार श्रीकांत शिंदे विविध भागांना भेटी देत आहेत. ठाकरे गटाने सत्तेत असताना काहीही केले नाही, असे जनतेसमोर सातत्याने अधोरेखित करीत आहेत. पण कार्यक्षेत्रात सध्या त्यांना विरोधकांशी नव्हे तर मित्र पक्षांशी दोन हात करावे लागत आहेत.
कल्याण या लोकसभेच्या मतदारसंघावर भाजपचा डोळा आहे. श्रीकांत शिंदे यांनी ठाण्यातून निवडणूक लढवावी व कल्याण मतदारसंघ भाजपला मिळावा, असा भाजपच्या नेतेमंडळींचा प्रयत्न आहे. श्रीकांत शिंदे कल्याण मतदारसंघात जास्तच आक्रमक झाले. त्यातून त्यांचे भाजपच्या नेतेमंडळींशी खटके उडत गेले. सार्वजनिक बांधकाममंत्री व डोंबिवलीचे आमदार रविंद्र चव्हाण व शिंदे पिता-पुत्रांचे संबंध आधीपासूनच फार काही सलोख्याचे नव्हते. आपल्या आड येणाऱ्यांना ‘सरळ’ करण्यावर शिंदे पिता-पुत्रांचा भर दिसतो. राष्ट्रवादीचे जितेंद्र आव्हाड हे सध्या ते अनुभवत आहेत. रविंद्र चव्हाण हे भाजपच्या शिर्षस्थ नेतृत्वाचे लाडके. यामुळेच शिंदे यांना चव्हाण यांना सरळ करणे जमलेले दिसत नाही.
खासदार शिंदे व भाजपमध्ये चांगलेच बिनसले. वास्तविक एकनाथ शिंदे यांच्यामुळे महाविकास आघाडीचे सरकार पडले. एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांचे एकदमच सख्य आहे. भाजपच्या वरिष्ठ नेत्यांशी शिंदे हे चांगले संबंध ठेवून आहेत. तरीही डोंबिवलीवरून शिंदे व भाजपमध्ये चांगलेच बिनसले आहेत. शिंदे यांना विरोध करण्याची भूमिका भाजपच्या मंडळींनी घेताच शिंदे यांनी राजीनामा देण्याची भाषा सुरू केली. तसेच कोणत्याही पदाची लालसा नाही व उमेदवारी दिली नाही तरीही… असा पवित्रा घेतला.
श्रीकांत शिंदे सध्या भाजपवर रागावले आहेत. श्रीकांत शिंदे यांच्या माध्यमातून एकनाथ शिंदे यांच्यावर कुरघोडी करण्याचा राज्यातील भाजप नेत्यांचा प्रयत्न असू शकतो, अशी एक चर्चा आहे. गेल्याच आठवड्यात शिंदे यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेतल्यावर राज्यात भाजप आणि शिंदे शिवसेनेने एकत्र निवडणुका लढविण्याचे जाहीर केले होते. तरीही शिंदे यांचे पुत्र भाजपवर चिडले आहेत. ‘श्रीकांत शिंदे को गुस्सा क्यू आया’ असाच प्रश्न सध्या राजकीय वर्तुळात चर्चेचा विषय ठरला आहे. एकनाथ शिंदे बेरजेचे राजकारण करीत असताना त्यांचे पुत्र श्रीकांत यांची पावले नेमकी उलट्या दिशेने पडत आहेत.