नागपूर : नागपुरात महाविकास आघाडीची सभा यशस्वी झाली तरी सभेचे कवित्व अद्याप सुरूच आहे. सभेत शहर काँग्रेसचा मर्यादित सहभाग आणि शहरात सभा असूनही काँग्रेसचे शहर अध्यक्ष विकास ठाकरे यांनी सभेच्या तयारीपासून राखून ठेवलेले अंतर याची सध्या राजकीय वर्तुळात चर्चा आहे.
नागपूरची वज्रमूठ सभा जोरात झाली. त्याची चर्चाही सर्वत्र होत आहे. भाजपने २०१४ पासून सातत्याने पक्षाची ताकद वाढवून विरोधकांना घेरण्याचा प्रयत्न सुरू केला आहे. या पाश्वभूमीवर काँग्रेसमध्ये एकसंघता दिसण्याऐवजी पक्षांतर्गत लाथाळ्यांचेच दर्शन घडत आहे. भाजपच्या विरोधात महाविकास आघाडीची वज्रमूठ घट्ट आहे, असा संदेश देण्यासाठीची नागपुरात काँग्रेसच्याच नेतृत्वात झालेल्या सभेतही काँग्रेसमधील गटबाजी लपून राहिली नाही. विशेष म्हणजे शहर काँग्रेस व संघटनेचे शहर अध्यक्ष विकास ठाकरे यांचा सभेतील मर्यदित सहभाग ही बाब सध्या चर्चेत आहे.
हेही वाचा – Karnataka polls : सिद्धरामय्या-शिवकुमार यांच्यातील संघर्षामुळे काँग्रेसचे नुकसान?
नागपुरातील दर्शन कॉलनीतील सभा यशस्वी झाली. या सभेचे मुख्य संयोजक काँग्रेस नेते सुनील केदार होते. त्यांनी शहर काँग्रेस अध्यक्ष विकास ठाकरेऐवजी आयोजनाची सूत्रे ठाकरे विरोधक नरेंद्र जिचकार, प्रफुल गुडधे, तानाजी वनवे या मंडळीच्या हाती सोपवली. त्यामुळे शहरात सभा असूनही विकास ठाकरे या सभेपासून अंतर राखून होते. त्यांनी प्रदेशाध्यक्षांच्या सांगण्यावरून सभेला एक दिवस शिल्लक असताना दक्षिण नागपुरातील महाकाळकर सभागृहात सभेच्या पूर्व तयारीचा आढावा घेतला. मात्र, ठाकरे एरवी सभा किंवा मोर्चासाठी सक्रिय असतात ती सक्रियता वज्रमूठसाठी दिसली नाही. विकास ठाकरे यांनी सभेच्या पूर्वतयारीच्या मोजक्याच बैठकींना हजेरी लावली, पण प्रत्यक्ष सभास्थळ आणि नियोजनात लक्ष घातले नाही.
दुसरीकडे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी वज्रमूठ सभेचे महत्त्व कमी करण्यासाठी की काय राहुल गांधी व प्रियंका गांधी यांची सभा एप्रिलच्या शेवटच्या आठवड्यात नागपूरमध्ये होणार असल्याचे वक्तव्य केले. पटोले यांचा हा संदेश शहराध्यक्षांसाठी पुरेसा होता. सभेच्या तयारीची सूत्रे पक्षांतर्गत विरोधकांकडे गेल्याने नाराज असलेले ठाकरे यांनी वज्रमूठ सभेऐवजी राहुल गांधी यांच्या सभेसाठी आढावा बैठक देवडिया काँग्रेस भवनात घेतली. त्यातून कार्यकर्त्यांमध्ये चुकीचा संदेश गेला.
हेही वाचा – देवेगौडा यांची घराणेशाही, सात जण पदांवर तरीही वादंग
चौकट
कार्यकर्ते गोळा करण्याची जबाबदारी पार पाडली
महाविकास आघाडीच्या संयुक्त सभेच्या तयारीची जबाबदारी माजी मंत्री सुनील केदार यांच्याकडे होती. शहर काँग्रेसला केवळ कार्यकर्ते गोळा करायचे होते. ही जबाबदारी यशस्वीपणे पार पाडली. सभेला मोठ्या संख्येने कार्यकर्ते उपस्थित होते. तेव्हा फटकून वागण्याचा प्रश्नच येत नाही, असे काँग्रेस शहराध्यक्ष विकास ठाकरे म्हणाले.